आणाबाबाच कुत्रं .

पाळीव प्राणी किती बहाद्दर, बिलंदर आणि मोकाट सुटलेला असू शकतो याचा भन्नाट नमुना म्हंजे आणाबाबाचं कुत्रं. (आणाबाबा हे त्याच्या मालकाच नाव). दिसायला काळं आणि रगेल करामती यामुळं ते गावंविख्यात झालं होतं. मळ्यातिल सगळ्यांनाच त्याचे कलागुण कलाविष्कारासह पाहायला, अनुभवायला मिळायचे.

त्यानं त्यांचा सारा श्र्वानबंधुभाव बिघडवलेला होताच, त्यामुळे मळ्यातिल कुत्री त्याला त्यांच्यात घेतच नव्हती. आणि आता मनुष्यजमातीची टवाळी करणे हा नवीन धंदा त्यानं चालवला होता. (कुणी निंदा कुणी वंदा, याची त्याला तमा नव्हती)..

अंधारात दूर ढेकळाच्या वावरात बसून ते रात्री बेरात्री आकाशाकडे त्वांड करून बेसुरा राग आळवायला लागलं की चक्क झोपलेले श्रोतेही टक्क जागे होवून बसायचे. आणि "हाड..हाडये,..... याच्यारं आयला,.... आ..य घातली.. या कुत्र्यानं पार वाट लावली झोपेची, तुज्याऱं आता" अश्या शाब्दिक दादींन बरोबर दगडव्रुष्टी ही व्हायची. भोंगा आणि तुतारी यांच्या मधला नाद म्हणजे आनाबाबाच्या कुत्य्राचा जबडा. एक तुतारी द्या मज आणून फुंकीन ती मी स्वप्राणाने (तुतारी फक्त फुटलेली असावी) असला त्याचा नाद....

पहिल्या पहिल्यांदा गप्पा मारणाऱ्याच्या सायकलवर मुतायचं, नंतर नंतर तर गप्पा मारत उभ्या असणाऱ्याच्या पायजम्यावर तंगडी (जमेल तितकी) वर करून ओला प्रसाद द्यायला लागलं. पायाला गरम ओलाव्याचा भास होवून सावरायच्या आत गडी दूर पसार...

विक्षिप्तपणाचा कळस म्हंजे दुपारच्या वेळी हा गडी शेताकडे निघायचा.... शेतात जेवणं झाल्यावर उरलं सुरलेलं पाटीखाली बाभळीच्या सावलीला झाकून ठेवलेलं असायचं. ज्या वावरात माणसं काम करताना दिसायची त्या वावरात याचा प्रवेश व्हायचा. भल्या मोठ्या मळ्यातही मानसांच्या सुगाव्यानं त्याला पाटी नेमकी सापडायची अन मग ती पाटी ओली केल्याशिवाय हा पुढे जायचा नाही.... कधी कधी जेवायच्या अगोदरच आनाबाबाच्या कुत्र्याचं आगमन-आणि गमणं झालेलं असायचं आणि मग साऱ्या कामगारांची जेवणाची सुट्टी घरी जाऊन जेवण्यासाठी लांबायची... शेतमालक शिव्यांची लाखोळी तर कामगार वरवर मात्र शिव्याच द्यायचे.

मित्राची आंधळी आई पाटाच्या पाण्यावर भांडी धुवत बसायची, त्याचवेळी हे महाशय नेमकं धुतलेल्या भाड्यांवर मुत्रविसर्जन करून ऍटित तिथून रवाना व्हायचे. पारावर गाडलेल्या पाण्याच्या घागरीवर तर याची विशेष नजर, तिच्यातीलच पाणी पिणार आणि त्या थंड उपकाराची परतफेड म्हणून तिच्यावरतीही पाय वर करून ओला आशीर्वाद देणार..., तर कुणाच्या वाळत टाकलेल्या कपड्यावर डाग पाडणार.

त्याला चोपायचं म्हटलं तरी तेही कुना नेमबाज्यांस शक्य नव्हते. दगड किंवा दांडकं कसेही मारा तो ते अगदीच आरामात हुकवायचा वर छद्मीपणे हसत तेथेच थांबायचं जेणेकरून मारेकऱ्याचा रागाचा पारा अजून गरम व्हावा..

अगदी जसपाल राणाच काय घेऊन बसलात पण सुक्ष्मलक्षभेद करून भुंकणाऱ्या कुत्र्याच्या जबड्याचा भेद डोळ्यावर पट्टी बांधून अर्जुनानाने केला होता.. तेव्हा तिथे आणाबाबाचे हे "श्वान" असते तर त्याने अर्जुनास १०१ टक्के धर्नुविद्यापरीक्षेत नापास केले असते. नेमबाजीचा झालेला गर्व अचुकपने धुळीला मिळवून, अर्जुनाच्या डोळ्याची पट्टी सोडायच्या आत आणाबाबाच्या कुत्र्यानं त्याच्याही भरजरी धोतरावर लघुशंका करण्याचा महाभारतिय आनंद लुटला असता.

विन्या, मन्या, आन्या, संत्या, पिंट्या (प्राणी संघटनेच्या भीतीमुळे नावांत बदल केला आहे बरका) यांची भाद्रपदाच्या एका सायंकाळी सदर प्रश्नावर बैठक झाली. राजकीय मुसंड्यांपेक्षाही सरस व्यूहरचना करण्यात आली.

कुत्र्यांच्या प्रणयाचा श्रावणी भाद्रपद असल्याने मळ्यातिल सारेच कुत्रे, कुत्रीभोवतीच लोंढा घोळत असायचे. ठरलं... कुत्रीला रात्रीच्या वेळी दोरीनं शेराच्या झाडाला बांधायचे. साऱ्यांनी दगडं, काठ्या घेऊन चोहोबाजून दबा धरून बसायचं... रात्री ९.३० च्या सुमारास पिठाच्या लोभा पोटी उंदीर जसा पिंजऱ्यात घुसावा तसं आणाबाबाचं कुत्रं चक्रव्यूहात घुसलं आणि कुत्रीशी लघट करायला लागलं... कुत्रीला बांधून ठेवलं म्हणजे नक्कीच काहीतरी काळंबेरं असायला पाहिजे हे त्या गावगुंडाडाच्या ध्यानी आलंच नाही. कामदेवाने त्याला ते सुचू दिलंच नाही.

मुडात यायची वेळ आणि अचानक साऱ्यांनी अकस्मात प्रकट होवून केलेला हल्ला-बोल यानं त्याची पळता भुई थोडी झाली. साऱ्यांनी त्याला पटकन गराडा घालून मग धू धू धुतला आणि बदड बदड बदाडला...

कसं बसं ते वेढ्यातून बाहेर पडलं, तर मागून दगडांचा मारा झाला.

सारी मंडळी दम लागेपर्यंत खाली पडू पडू हसत होती, आणि आणाबाबाच कुत्रं मग दम लागून तोंडाला फेस येइस्तोवर मिळेल त्या दिशेनं, चुकूनही मागं न पाहत जे सन्नाट पळत सुटलं ते परत कुणा मनुष्य जातीच्या जवळ आलंच नाहीच.


सचिन, नारायणगाव, पुणे, ३/६/२००९