केविलवाणी राष्टवादी पार्टि. -विधानसभा २००९.


आघाडी व्हावी म्हणून राष्टवादिला आपल्या स्वाभिमानाची सारी कापडे बासनात गुंडाळून कांग्रेसचे उंबरठे झिजवावे लागताहेत. नाहीतरी सत्तेच्या मुजोरपणामुळे त्यांच्या स्वाभिमानाचे घमेंडीत रुपांतर झाले होतेच आणि म्हणूनच २००९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत जनतेने त्यांच्या कपड्यांचे लक्तरात रुपांतर केले.

लोकसभेच्या जागावाटपापुर्वी राष्टवादिने पवारांना पंतप्रधान पदाचे स्वयंघोषित उमेदवार जाहीर करून, कधी स्वबळाची भाषा करत, तर कधी शिवसेनेशी युती करण्याची धमकी देत कांग्रेसची हुर्ये केली होती. तरीही अवघे ८ (वजा १, म्हणजे उदयनराजे भोसले) खासदार असूनही कांग्रेसने परत शरद पवारांना कृषीमंत्री पद + बोनस २ मंत्रिपदे का दिली हे काही कळत नव्हते.
४ महिन्यांवर आलेल्या महाराष्टच्या विधानसभा निवडुनुका डोळ्यांसमोर ठेवून हे मंत्रिपदाचे जाळे शरद पवारांवर कांग्रेसने फेकले होते.
लोखंडाच्या सळईची एक बाजू बिचकुळ्यात अडकवली की दुसरी बाजू पकडून तिला हवे तसे वाकविता येते. पवारांना मंत्रिपदाच्या बिचकुळ्यात पकडून, राष्टवादिला क्यंटिलिव्हर प्रमाणे वाकविता येईल हे गणित जुन्या जाणत्या कांग्रेसच्या अभियंत्यांनी तेव्हाच केले होते हे नक्की. आघाडी नाही केली तर केंद्रातील मंत्रिपदे जाणार आणि केली तर वाट्याला कमी जागा मिळणार. खिंडीत पकडून आपली कोंडी करण्याचा प्रकार होणार हे ह्या जाणत्या राजाला उमगले कसे नाही हेच कळत नाही.? की पदरात पडणाऱ्या मंत्रिपदांच्या गाजर मोहामुळे त्यांना ते उमगलेच नाही, हे तेच जाणो....

त्यावर कहर म्हणून राष्टवादी हा विचारहीन पक्ष, कालबाह्य झालेले बुजगावणे इ. इ. असून त्याचे कांग्रेस मध्ये विलिनीकरण करा असे सल्ले दिग्विजयसिंहा पासून विलासरावापर्यंत साऱ्यांनी यावेळी मुद्दामहून दिले.

वेगळं अस्तित्व टिकविण्याच्या अट्टाहासाठी आर. आर आणि दादांना बरीच शाब्दिक सारवासारव करावी लागली. जेवणाच्या पंक्तीत वाढपे कमी आणि सूचना देणारे जास्त असा हा एकमेव पक्ष. पवारांनी भरमसाठ पुढारी तयार केले, तेही आपल्या अपेक्षांसह बंडखोरी करणारच.

सत्ते साठी लाचार, त्यासाठी घेतलेल्या कोलांट उड्या यामुळे राष्टवादी हा टवाळीचा विषय होवू पाहत आहे.

विदर्भ-मराठवाड्यात लोणच्या पुरताच असलेल्या राष्टवादीचा आता पश्चिम महाराष्टातही टांगा पलटी होवू पाहत आहे. ऊस, साखरसाठा, महागाई, किडका गहू इ. चे खापर पवारांवर फुटले आहेच. त्यात पद्मसिंह पाटलांच्या शौर्याची भर.
कांग्रेस कडून कितीही मानहानी होत असेली तरी "धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होवू नये म्हणून आघाडी व्हावी" असा ढोंगी पवित्रा आर आर आबा घेताहेत..
ज्या स्वाभिमानी मुद्द्यासाठी वेगळा पक्ष स्थापन केला तो मुद्दाच केव्हाच गळून पडला आणि अवध्या १० वर्षात त्यांचा स्वाभिमान पार लीन, मलिन झाला.
.
या साऱ्याचा फायदा कांग्रेस, आपल्यापद्धतिने पवारांवर कुरघोडी करण्यासाठी न करेल तर नवलच. लालू, पासवान, मुलायम यांच्यावरही थोड्याफार फरकाने हा प्रयोग झालाच आहे..... आणि यशस्वी ही झाला आहे.