तुकोबांची देहू

ह्या आठवड्याचा शनिवार तुकोबामय होता, अजूनही मनात त्याच गोष्टी घोळत होत्या म्हटलं चला एकदा ते सारं उतरून टाकूयात.

आई-दादा,खेडेकर काकू, रुपालीसह नील, भजन शिकणारी छोटी मंडळी समृद्धी, निशांक, निनाद आणि निर्मिती हि सरासरी दुसरी-तिसरीतील छोटी मंडळी. त्यांना संत तुकाराम पाहायचा होताच पण भंडारा हा डोंगर आहे आणि आपल्याला डोंगरावर जायचे आहे म्हणून आतून खूश होती. भंडारा ला ते वारंवार भराडी म्हणत होते. (भराडी नावाचा एक डोंगर आमच्या गावी आहे म्हणून)

जिथे तुकोबांची गाथा बुडविली त्याच ठिकाणी साऱ्यांनी पवित्र भावनेने पाणी पायावर घेतले. जिथे पवित्र गाथा बुडविली, जिथे ती पुन्हा बाहेर आली तिथेच ४-५ देहुकर बाया "तुकारामाशी घेणे-देणे नाही, आमचा धुणं धुण्याशी मतलब" अश्या सामूहिक निर्विकारी भावनेनं गोधड्यांची घाण धुण्याचं कर्म करत होत्या. त्यांमुळे रुपालीने सांगूनही मी पाण्यात उतरलो नाही. दादांनी मुलांना तुकोबरायाची जमेल तसी "बायोग्राफी" सांगायला एव्हाना सुरुवात केलेली होती.

गाथा बुडविल्यानंतर तुकोबराय अन्नपाण्यावाचून १३ दिवस ज्या शीळेवर बसले होते तीही शेजारीच आहे. आता तिथे विठू-माउलीचं छोटंसं मंदिर आहे. "मग गाथा पाण्यात का बुडविल्या? " ह्या मुलांच्या प्रश्नाला मला तितकंसं योग्य उत्तर देता आले नाही पण मी वेळ मारून नेली.

त्याच्या शेजारी ह, भ. प. पांडुरंग घुले यांच्या प्रयत्नातून साकारलेलं "गाथा मंदिर" आहे. मध्यभागी तुकोबरायांचं ६/७ फूट बैठं शिल्प आहे. मंदिरातील दोन्ही मजल्यांवर गाथेतिल अंदाजे ५००० अभंग कोरलेले आहेत. पण ते वाचणारे फारच कमी होते. (एवढे अभंग कोरण्यापेक्षा दृश्य (चित्र, शिल्प) स्वरूपात ते लोकांसमोर ठेवले असते तर ते लवकर आणि जास्त लोकापर्यंत पोहचले असते अशी प्रतिक्रिया मी आमच्यातच नोंदवून दिली). नरसिंहाने फाडलेला हिरण्यकशपू, प्रल्हादावरचे अत्याचार,विष्णू, रामाने सेतू बांधण्यासाठी सागरास केलेले आवाहन ही ३ शिल्पे आहेत.. अप्रतिम आहेत ती. पण ह्या शिल्पांचा इथे काय संबंध असा मूळ प्रश्न कैक जणांच्या मेंदूत येतो, माझ्याही आलाच. ( नरसिंह, राम हे विष्णू अवतार आहेत, विठ्ठल म्हंजे विष्णूचेच एक रूप असा मी साधा संबंध लावला, आणि तो खराही निघाला. ) शिल्पांची इत्थंभूत (मला माहीत होती तेवढी) माहिती इतरांना देण्याच काम मी चोख केले आणि इथून बाहेर पाडण्यापूर्वी नील ने माझ्या पैंटवर "ओला प्रसाद" देऊन मला धन्यवाद देण्याचं काम चोख केलं.

गाथा मंदिरानंतर आम्हाला (मला) निळोबाराय भेटले, तुकोबांचे हे आवडते शिष्य मला तुकोबांपेक्षाही सहज भावले. हेच ते निळोबाराय ज्यांच्या साठी तुकोबा पुन्हा धरतीवर आले होते. तुकोबांनी सदेह वैकुंठ गमणं केल्यानंतर, इंद्रायणी काठी जिथे गाथा परत सापडल्या होत्या त्याच ठिकाणी संत निळोबाराय तुकोबांच्या भेटीसाठी अन्नपाण्यावाचून बसले. साक्षात विठ्ठल त्याच्या समोर प्रकट झाले तर " तुला कुणी बोलावले?, मला फक्त माझ्या तुकोबांनाच भेटायचे आहे" म्हणत त्यांनी डोळे बंद केले. आणि शेवटी तुकोबांना यावंच लागलं. तुकोबांपुढे भगवंतालाही डावलणारा, दुय्यम स्थान देणारा हा निस्मिम भक्त मनाला अलगद भिडला.

इंद्रायणीचे पाणी आळंदीपेक्षा इथे मात्र शुद्ध आहे. बोटिंगची सोयही आहे. पण आम्ही ती सोय न वापरता पैसे आणि वेळ वाचवला.

इथुनच खेडेकर काकुंनी नील ला "मायेने" खेळणं घेतलं, दोन दिवस झालेत अजून ते त्याने तोडलं नाहि.

देहुतिल मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील गरूडावर बसलेल्या तुकारामांकडे पाहताना मुलं "आरे हे ह्या गरूडावर बसून गेलते काय? " म्हणून विचारत होती. दर्शन जरा घाईतच झाले, पण तुकाराम आणि शिवराय याची जिथे भेट जाली तिथे मात्र मी आवर्जून थांबलो.

बाजारपेठेकडे पाहताना त्या मुंबाजीचा वाडा आणि वंशज पाहण्याची सुप्त इच्छा जाली होती, पण विचारायचे कसे आणि कुणाला हे कळत नव्हते.

इंद्रायणीचा वन वे ब्रिज पार करून भंडारा गाठला. मध्येच संत जगनाडे महाराज, ज्यांनी तुकोबारायांचे सारे अभंग लिहले त्यांचे सुदुबरे गाव लागले. घाट मस्त आहे. डोंगरमाथ्यावरून पिंपरी-चिंचवड, चाकण आणि मावळ तालुक्याचा मस्त एरिअल देखावा दिसतो. उत्तरेला भाम डोंगरही दिसतो. ह्याच डोंगरांनी तुकोबांना हवा असलेला एकांत दिला होता. ह्या दिवसात तिथे सप्ताह चालू असतो. मंडपात प्रवचनकाराचे आध्यात्मिक डोस चालू होते, मंडपाबाहेर आम्ही भेळ-बिस्किटांचा अल्पोपाहार करत होतो. पूर्वी इथे काळ्या कौलांचा मोठा वाडा होता त्यात तुकोबराय, विट्ठल-रुक्मिणी इ. मुर्त्या होत्या. तो जतन करायच्या ऐवजी सरकारने वाडा पाडून सिमेंट मध्ये बिनकळसाचे मंदिर बांधून आपला आध्यात्मिक दृष्टिकोन दाखवून दिला आहे.

चला.... जीवनातिल अजून एक दिवस सार्थकी लागल्याचा आनद अजुनही आहेच.

कबीर- तेजाचा उत्सव.

संत कबीर आपल्या मुक्तीचा उत्सव प्रकट करताना म्हणताहेत.


लाली मेरे लाल की, जित देखू तित लाल।
लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल ॥


जो अनुभवता येतो पण शब्दात उतरवता येत नाही असा ब्रह्मानंद, कबीर इथे रंग-प्रतिमाच्या माध्यमातून साकारताहेत.

लाल रंग म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा उत्सव!! आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, आत्मा हा परमात्म्याचाच साक्षात्कार आहे. हा अपूर्व सोहळा ते फक्त "लाल" रंगाच्या प्रतिमेतून जिवंत करू पाहताहेत.

परमात्मा, परब्रह्म "तेजाचा संचय" आहे. साहजिकच ते तेज साध्या डोळ्यांनी पाहणे किंवा हदयात साठविणे अशक्यच आहे. आणि म्हणूनच प्रत्येक भक्त ह्या "तेजाला" रंग, रूप, आकार, गूण देऊन आपल्या-आपल्या देवतेच्या रूपात पाहतो. (कुणी त्याला ईश्वर, कुणी बुद्ध, तर कुणी येशूचं नाव देतं). तेजाचा साक्षात्कारही मग आपण याच रूपात अनुभवतो.

तेजाचा अनुभव म्हंजे "शुद्धतेचा अनुभव".

कबीर हे पुर्वजन्मी शुक मुनी होते, त्यामुळे या ज्ञानी संताची सुररवातच निर्गुण साधनेने झाली होती. मुक्ताई, ज्ञानदेव, सौपण, निवृत्ती ह्यांनाही हे ज्ञानपण जन्मताच लाभले होते. हनुमंताने जन्मातच सूर्यबिंबाकडे झेप घ्यावी, उड्डाण घ्यावे असी ही जन्मजात पुण्याई.

अशी हि पुण्याई फार थोड्या महायोग्यांच्या वाट्याला येते. कबीर त्यापैकीच एक. ते प्रभू रामचंद्रांकडे चरित्र, चारित्र्य, गुण यांपुढेही जाऊन एक निखळ ब्रह्मानंद म्हणून पाहायचे.

परमात्म्याचं तेज पाहता पाहता ते स्वतःच त्यात विलीन होताहेत,...... एकरूप होताहेत........ त्या तेजाचाच एक अंश बनून जाताहेत.(हा दोहा मला प. पू. आण्णासाहेब मोरे, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी ह्यांच्या आध्यात्मिक लिखाणातून अर्थासह मिळाला, त्यातला सारांक्ष मी देतो आहे. साध्या शब्दांमागे दडलेला प्रचंड अर्थ असंच मी ह्या दोह्याबददल म्हणेन.)सचिन, नारायणांव, पुणे, १९/१२/२००९

कबीर -बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.

.
मुंड मुंडाए हरी मिले सब कोई ले मुंडाय,
बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.

हा "मुंडणावरिल" अजून एक दोहा आमचे एक मनोगती शरद कोर्डे यांनी अर्थासह सुचवला. मलाही तो खूपच आवडला.
मुंडण (हजामत) करून परमेश्वरप्राप्ती होत असेल तर सर्वांनी मुंडण करावं. (पण लक्ष्यात घ्या) वारंवार केस (लोकर) कापल्याने (कापूनही) मेंढी स्वर्गाला जात नाही.
.
इथेही कबीर साधे, रोखठोक आणि सहज पटणारे उदाहरण देऊन प्रबोधन करताहेत की वैकुंठप्राप्ती साठी असल्या कर्म-कांडांची काडीमात्र गरज नाहीये. त्यात उगाच जीवन व्यर्थ घालवू नका.
.

(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

सचिन, नारायणगांव, १6/१२/२००९.

कबीर- केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार.

केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार

मन को काहे न मुंडिए, जामें विषे विकार.
.

कबीर ह्या दोह्यातून समाजप्रबोधनाबरोबरच तत्कालीन दृष्टचालीरितींवरही टिका करत असावेत असे वाटते.

कबीरजी वेद, कुराण, धर्म ह्या गोष्टी बाजूला ठेवून, निसर्गनियमाला धरून आपल्या स्वतःच्या तर्काने प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायचे. त्यांचा जन्म जरी ज्ञात नसला तरी कालावधी १४४०-१५१८ हा होता. त्याकाळी स्त्री विधवा झाल्यास, भावकीतिल कुणी मृत झाल्यास किंवा कुठल्याही धार्मिक हेतूने मुंडण करणे बंधनकारक होते. चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथातही दीक्षा घेतलेल्या साध्वींना मुंडासे करावे लागते. क्रित्येक भट-भिक्षुकही ज्ञानधारनेसाठी मुंडण करीत. केस अपवित्र झालेत, सुतकी झालेत म्हणून धर्म सांगतो म्हणून आपण त्यांचे मुळासकट उच्चाटन करतो, तेही वारंवार. पुजारीही देवप्राप्तीसाठी सदैव मुंडण करतात. कबीर नेमकेपणाने इथेच बोट ठेवताहेत. तसं पाहिले तर केसांनी शरीराचं काहीही बिघडवलेलं नसते, तरीही आपण आपलं पावित्र्य, इस्वरप्राप्ती, ध्यान-ज्ञान इ. इ. साठी विनाकारण केसांचे उच्चाटन करतो.

पण... त्याच शरीराचा एक भाग असलेलं मन की ज्यात वेळोवेळी दूषित, अपवित्र, विषारी, विषयी (भौतिक) विचार जमा होतात. षड्रिपूंचे वास्तव्य तेथेच असते. अध्यात्माच्या सानिध्यात गेल्याने तात्पुरते हे सारे मनविकार साफ होतातही पण पुन्हा ते जोमाने वाढू लागतातच. आणि म्हणूनच केसांना दोष देत त्यांचे शंभर वेळा मुंडण करण्यापेक्षा ह्या विषारी मनाचे सतत मुंडन व्हायला हवे, मगच तुम्ही पवित्र व्हाल, ईश्वराच्या जवळ जाऊ शकाल.

(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

सचिन, नारायणगांव, ११/१२/२००९.

कबीर - चलती चक्की देखकर ..

चलती चक्की देखकर दिया कबीरा रोए,
दुई पाटन के बीच में शाबुत बचा ना कोए.


कबीर ह्या दोह्यातून निसर्गाचं एक विदारक पण वास्तववादी सत्य मांडताहेत. चक्की म्हंजे जाते, जे जुण्याकाळात धान्य दळण्यासाठी वापरलं जायचं. त्याला दोन पाटे (पाटन किंवा चाके) असतात, एक जमिनीत स्थिर असते तर दुसरे त्यावर गरगर फिरत असते. चलती चक्की प्रमाणे हे जीवन गतिमान आहे, आणि त्यात शाश्वत असे काहीही नाही. सारं काही त्यात भरडले जाणार आहे, असाच साधा अर्थ आपणास कळतो.
पण.....,
कबीरा फिरणारं जातं पाहून रडताहेत कारण..... ..
त्यांना याद्वारे निसर्गातील एक अन्यायकारी सत्याची जाणीव झालीय. पृथ्वी आणि आकाश या निसर्गाच्या दोन चाकांमध्ये जे काही येईल मग सुख- दुःख, प्रेम-राग, न्याय-अन्याय, मान-अपमान सारं काही भरडून निघणार आहे. इथे दुर्जनाबरोबर आणि "दुर्जनांप्रमाणेच" सज्जनाचाही शेवट ठरलेला आहे. (सुक्या बरोबर ओलं ही जळते) दोघांनाही अंतिम न्याय एकच आहे. निसर्गाची गती शाबूत ठेवण्यासाठी हा "बदल" आवश्यकच आहे ह्या अगतिकतेमुळे कबीरांना वाईट वाटते आहे.
.
जीवनातील अश्वाश्वतता आणि गतिशीलता दाखविण्यासाठी सामान्य, साध्या जात्याचं उदाहरण देतात. बऱ्याच वेळा ते बहिणाबाईंसारखेही वाटतात.
.
(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ मी देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

कबीर- तेरा साई तुझमें.

जैसे तिल में तेल है जो चकमक में आग,

तेरा साई तुझमें है तू जाग सके तो जाग.


कैक वर्ष माणूस देव, अंतिम सत्य, आत्मा या गोष्टी शोधू पाहतो आहे, कबीरजीं ह्या दोहयातून भगवंत आहे, आणि त्यापर्यंत पोहचता देखिल येते, हे सत्य सउदाहरण सांगताहेत.

जसं बि (तिल) मध्ये तेल असते, ते आपणास बाहेरून दिसत नाही. तसेच गारगोटी (चकमक) बाहेरून निर्जीव वाटते, पण एकमेकांवर घासल्यास त्यातून आगीच्या ठिणग्या बाहेर पडतात. म्हणजे गारगोटिच्या आतही ऊर्जा, चैतन्य असते आणि तेच अंतिम सत्य आहे.

अगदी त्याचप्रमाणं, तू ज्या ईश्वराला शोधण्यासाठी अहोरात्र, दाहिदिशा फिरतो आहे, तो तुझ्या आतच आहे. आणि म्हणून तू जागा हो, स्वतःच्या मी पणातून बाहेर ये, आणि तुझ्या आत, अंतर्मनात त्याचा शोध घे. तुझं बाह्य रूप म्हणजे तू नाहीसच हे तुला आपसूक उमगेल. हनुमंताने नव्हते का त्याच्या प्रभूला अंतर्मनातच शोधले.

ईश्वर बाहेर सापडणे अशक्य आहे कारण तो आपल्या आतच वास्तव्यास आहे. त्याला इतरत्र शोधण्यात मिळालेलं जीवन वाया घालवू नकोस, अन्यथा तू सदैव असत्याच्या गाढ झोपेतच राहशील अशी "जाग सके तो जाग" म्हणून दाट समजही देताहेत.

चला आपणही दिवसातून कधीतरी, दोन क्षण का होईना अंतर्मनातील ईश्वराला शोधण्या साठी नक्की देऊयात.

(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ मी देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

नील - वय वर्षे ६ महिने.

नील, आता सहा महिन्याचा झालाय. सहा महिने चिमणपाखरासारखे कसे भुरकणं निघून गेले हे कळलेच नाही. तो या जगात प्रवेशीत व्हायच्या अगोदरच आम्ही त्याचं नाव ठरवून ठेवलं होतं, कसे कुणास ठाऊक पण रुपालीला (प्रत्येक स्त्री प्रमाणे) मनोमन वाटायचं की मुलगाच होणार म्हणून. आमच्या घरातील साऱ्या मुलांची नावे "नि" ने चालणारीच आहेत, म्हणजे निशांक, निनाद, निर्मिती...... आणि आता नील.
.
नील म्हंजे निळा किंवा एक रत्न असा साधा अर्थ माझ्या मनी होताच. त्याच बरोबर नल-नील ह्या रामायणातील व्यक्तिरेखाही आहेत. पुराण काळात भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ज्ञ होते. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते होते. प्रभू श्रीरामाला लंकेत प्रवेश करण्यासाठी "रामसेतू" बांधण्याची संकल्पना पुढे आली. रामसेतू बांधण्याचं कार्य नल आणि नील या वास्तुतज्ञांनी विश्वकर्माच्या मार्गदशनाखाली केलं होतं. स्वर्गाचा अधिपती इंद्र याच्या कानातील मण्याला "नीलमणी" किंवा "नील" असही म्हटले जाते.
हनुमंताने संजीवनी वनस्पती साठी द्रोणागिरी पर्वत उचलून नेताना त्याचा काही भाग खाली पडला, तो पडलेला भाग म्हंजे "पुरंदर" किल्ला. पुरंदर म्हंजे इंद्राचेच एक नाव. पुराणात या किल्ल्याचा उल्लेख "इंद्र नीलपर्वत" असाच आहे. पुराणकालीन संदर्भ असल्याने आम्ही हेच नाव फिक्स केलं. तसेच नील आर्मस्ट्रॉग, नील मुकेश हि आलिकडची नावेही माहीत होतीच.
.
३ किलो असलेला नील आज ७ किलोचा झाला आहे. सुरवातीला तो नुसताच प्रकाशाच्या दिशेने टक लावून पाहायचा, आवाज झाला की जागीच हालायचा. आता मात्र आवाजाचा दिशा हि तो ओळखतो आहे. आपल्याला "नील" म्हणतात हेही तो ओळखतो, कारण नील म्हटलं की तो नक्की वळून पाहतोच आणि हलकंसं हसून किंवा हुंकार देत प्रतिक्रियाही देतो. एकटाच छताकडे पाहत खेळत बसतो,रडणं अगदीच कमी. पण आता हळूहळू हट्टी व्हायला लागलाय, त्याच्या हातातील वस्तू, खेळणं काढून घेतलं की त्याला प्रचंड राग येतो. बाहेर, टेरेसवर फिरायला नेलं की येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट-टेललाईट त्या दिसेनाश्या होईपर्यंत पाहत राहतो. आई त्याला कसली तरी बडबड गीतं (स्वतःच्या रचना) एकवीत असते. म्हंजे "कावू, कावू ये ये, नीलला खाऊ दे दे वैगेरे वगैरे. तसा तो ओळख विसरत नाही, परवाच माझे वडील २ आठवड्यांनातर आले होते, त्यांच्याकडे कित्येक वेळ विचित्र नजरेनं पाहत होता, ओळख आठवण्याचा प्रयत्न करीत होता, ओळखल्या नंतर मात्र बाबांशी जाम हसायला, खेळायला लागला. कानाजवळ हलूच आवाज केला तर लहान मुलं झोपेत देखिल हसतात हे एक नवलच आहे.
.
ऑफिस मधून घरी गेल्यावर मी त्याला झोपेतून हमखास जागा करतो, आणि मग त्याची झोप मोड केली म्हणून त्याच्या आईचा शाब्दिक मार खातो.