तुकोबांची देहू

ह्या आठवड्याचा शनिवार तुकोबामय होता, अजूनही मनात त्याच गोष्टी घोळत होत्या म्हटलं चला एकदा ते सारं उतरून टाकूयात.

आई-दादा,खेडेकर काकू, रुपालीसह नील, भजन शिकणारी छोटी मंडळी समृद्धी, निशांक, निनाद आणि निर्मिती हि सरासरी दुसरी-तिसरीतील छोटी मंडळी. त्यांना संत तुकाराम पाहायचा होताच पण भंडारा हा डोंगर आहे आणि आपल्याला डोंगरावर जायचे आहे म्हणून आतून खूश होती. भंडारा ला ते वारंवार भराडी म्हणत होते. (भराडी नावाचा एक डोंगर आमच्या गावी आहे म्हणून)

जिथे तुकोबांची गाथा बुडविली त्याच ठिकाणी साऱ्यांनी पवित्र भावनेने पाणी पायावर घेतले. जिथे पवित्र गाथा बुडविली, जिथे ती पुन्हा बाहेर आली तिथेच ४-५ देहुकर बाया "तुकारामाशी घेणे-देणे नाही, आमचा धुणं धुण्याशी मतलब" अश्या सामूहिक निर्विकारी भावनेनं गोधड्यांची घाण धुण्याचं कर्म करत होत्या. त्यांमुळे रुपालीने सांगूनही मी पाण्यात उतरलो नाही. दादांनी मुलांना तुकोबरायाची जमेल तसी "बायोग्राफी" सांगायला एव्हाना सुरुवात केलेली होती.

गाथा बुडविल्यानंतर तुकोबराय अन्नपाण्यावाचून १३ दिवस ज्या शीळेवर बसले होते तीही शेजारीच आहे. आता तिथे विठू-माउलीचं छोटंसं मंदिर आहे. "मग गाथा पाण्यात का बुडविल्या? " ह्या मुलांच्या प्रश्नाला मला तितकंसं योग्य उत्तर देता आले नाही पण मी वेळ मारून नेली.

त्याच्या शेजारी ह, भ. प. पांडुरंग घुले यांच्या प्रयत्नातून साकारलेलं "गाथा मंदिर" आहे. मध्यभागी तुकोबरायांचं ६/७ फूट बैठं शिल्प आहे. मंदिरातील दोन्ही मजल्यांवर गाथेतिल अंदाजे ५००० अभंग कोरलेले आहेत. पण ते वाचणारे फारच कमी होते. (एवढे अभंग कोरण्यापेक्षा दृश्य (चित्र, शिल्प) स्वरूपात ते लोकांसमोर ठेवले असते तर ते लवकर आणि जास्त लोकापर्यंत पोहचले असते अशी प्रतिक्रिया मी आमच्यातच नोंदवून दिली). नरसिंहाने फाडलेला हिरण्यकशपू, प्रल्हादावरचे अत्याचार,विष्णू, रामाने सेतू बांधण्यासाठी सागरास केलेले आवाहन ही ३ शिल्पे आहेत.. अप्रतिम आहेत ती. पण ह्या शिल्पांचा इथे काय संबंध असा मूळ प्रश्न कैक जणांच्या मेंदूत येतो, माझ्याही आलाच. ( नरसिंह, राम हे विष्णू अवतार आहेत, विठ्ठल म्हंजे विष्णूचेच एक रूप असा मी साधा संबंध लावला, आणि तो खराही निघाला. ) शिल्पांची इत्थंभूत (मला माहीत होती तेवढी) माहिती इतरांना देण्याच काम मी चोख केले आणि इथून बाहेर पाडण्यापूर्वी नील ने माझ्या पैंटवर "ओला प्रसाद" देऊन मला धन्यवाद देण्याचं काम चोख केलं.

गाथा मंदिरानंतर आम्हाला (मला) निळोबाराय भेटले, तुकोबांचे हे आवडते शिष्य मला तुकोबांपेक्षाही सहज भावले. हेच ते निळोबाराय ज्यांच्या साठी तुकोबा पुन्हा धरतीवर आले होते. तुकोबांनी सदेह वैकुंठ गमणं केल्यानंतर, इंद्रायणी काठी जिथे गाथा परत सापडल्या होत्या त्याच ठिकाणी संत निळोबाराय तुकोबांच्या भेटीसाठी अन्नपाण्यावाचून बसले. साक्षात विठ्ठल त्याच्या समोर प्रकट झाले तर " तुला कुणी बोलावले?, मला फक्त माझ्या तुकोबांनाच भेटायचे आहे" म्हणत त्यांनी डोळे बंद केले. आणि शेवटी तुकोबांना यावंच लागलं. तुकोबांपुढे भगवंतालाही डावलणारा, दुय्यम स्थान देणारा हा निस्मिम भक्त मनाला अलगद भिडला.

इंद्रायणीचे पाणी आळंदीपेक्षा इथे मात्र शुद्ध आहे. बोटिंगची सोयही आहे. पण आम्ही ती सोय न वापरता पैसे आणि वेळ वाचवला.

इथुनच खेडेकर काकुंनी नील ला "मायेने" खेळणं घेतलं, दोन दिवस झालेत अजून ते त्याने तोडलं नाहि.

देहुतिल मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील गरूडावर बसलेल्या तुकारामांकडे पाहताना मुलं "आरे हे ह्या गरूडावर बसून गेलते काय? " म्हणून विचारत होती. दर्शन जरा घाईतच झाले, पण तुकाराम आणि शिवराय याची जिथे भेट जाली तिथे मात्र मी आवर्जून थांबलो.

बाजारपेठेकडे पाहताना त्या मुंबाजीचा वाडा आणि वंशज पाहण्याची सुप्त इच्छा जाली होती, पण विचारायचे कसे आणि कुणाला हे कळत नव्हते.

इंद्रायणीचा वन वे ब्रिज पार करून भंडारा गाठला. मध्येच संत जगनाडे महाराज, ज्यांनी तुकोबारायांचे सारे अभंग लिहले त्यांचे सुदुबरे गाव लागले. घाट मस्त आहे. डोंगरमाथ्यावरून पिंपरी-चिंचवड, चाकण आणि मावळ तालुक्याचा मस्त एरिअल देखावा दिसतो. उत्तरेला भाम डोंगरही दिसतो. ह्याच डोंगरांनी तुकोबांना हवा असलेला एकांत दिला होता. ह्या दिवसात तिथे सप्ताह चालू असतो. मंडपात प्रवचनकाराचे आध्यात्मिक डोस चालू होते, मंडपाबाहेर आम्ही भेळ-बिस्किटांचा अल्पोपाहार करत होतो. पूर्वी इथे काळ्या कौलांचा मोठा वाडा होता त्यात तुकोबराय, विट्ठल-रुक्मिणी इ. मुर्त्या होत्या. तो जतन करायच्या ऐवजी सरकारने वाडा पाडून सिमेंट मध्ये बिनकळसाचे मंदिर बांधून आपला आध्यात्मिक दृष्टिकोन दाखवून दिला आहे.

चला.... जीवनातिल अजून एक दिवस सार्थकी लागल्याचा आनद अजुनही आहेच.

1 प्रतिक्रया:

ANAND GODSE ने कहा…

लेख आवडला

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..