गणी गण गणात बोते बाते - अर्थ

दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ह्या चरित्रग्रंथात त्या अभंगाचा अर्थ दिला आहे...

त्या सूत्रमय भजनाचा। अर्थ ऐसा वाटतो साचा।
गणी या शब्दाचा। अर्थ, मोजी हाच असे।।
जीवात्मा म्हणजे गण। तो ब्रह्माहून नाही भिन्न।
हे सुचवावया कारण। गणात हा शब्द असे।।
बोते हा शब्द देखा। अपभ्रंश वाटे निका।
बाते हा शब्द ऐका। तेथे असावा नि:संशय।।
बा या शब्दे करून। घेतले पाहिजे मन।
ते हे आहे सर्वनाम। गण शब्दाऐवजी आलेले।।
म्हणजे मना दिसे नित्य। जीव हा ब्रह्मास सत्य।

यात स्पष्ट अर्थ दिला आहेच... मुळातच हे एक सूत्रमय भजन आहे असे दासगणू महाराज म्हणताहेत हे ध्यानी घ्यावे, ते शब्द एकमेकांशी सूत्राप्रमाणे संबंधित आहे...
.
तरीही यापुढे जाऊन पटवून द्यायचे झाले तर ....
.
गण शब्दाचा सरळ अर्थ म्हंजे लोक, (त्या अर्थानेच गणराज्य= लोकांचे राज्य, गननायक- लोकांचा नायक, देवगण = देवलोक, वृषीगण = वृषिलोक) गण म्हंजे लोक हा अगदीच तांत्रिक अर्थ झाला.

आता थोडासा आध्यात्मिक दृष्टीने पाहताना, गण किंवा लोक म्हंजेच जीवात्मा. (जीवात्मा म्हंजे फक्त माणूस असा संकुचित अर्थ नव्हे तर सृष्टीतील सगळे चैतन्य असलेले प्राणी असे सूत्र/अर्थ आहे)

गुरुवर्य टागोरांच्या "जण गण मन अधिनायक... " चा अर्थ ही "लोकांवर, आत्मावर, मनावर राज्य करणारा... " असाच आहे.

ऋग्वेदामधील सूक्तांमध्ये गणपतीचे वर्णन करताना म्ह्नटले आहे..
'ओम गणानां त्वां गणपती हवामहे।'
तो गणांचा पती आहे, त्यांना मार्ग दाखवणारा नेता आहे. गणपती हा गणांचा (लोकांचा, जीवात्म्यांचा) अधिपती मानला जातो.

त्याअर्थी गण म्हंजे जीवात्मा असाच अर्थ इथे अभिप्रेत आहे..

गणांत म्हंजे गण+आत असा साधा अर्थ आहे. जो जीवात्म्यांच्या आत असतो, जीवात्म्यांशी एकरूप असतो तो परमात्मा. म्हंजेच ब्रह्म असा "गणांत" शब्दाचा अर्थ निघतो.