कासची ट्रीप

ह्या शनिवार, रविवारी कासचं पठार, सज्जनगड, ठोसेघर, वाई, पाचगणी आणि मेणवली अशी दोन दिवसांची मस्त सुट्टी मारून आलो. सुजीत, कमळ्या, विशाल, आम्या आणि मी सगळे सोमवारी F5 (रिफ्रेश) झालेलो होतो.

[कासचे जागतिक किर्तीचे पठार]
सुज्याची इंडिगो होती, आणि सगळं मार्गक्रमणही त्यानेच केलं. पण त्याचं ड्रायव्हिंग प्रचंड जोरात आणि बेभरंवशाचं असल्याने मी जरा सावधच होतो. मिळेल तेव्हा मिळेल तस्सं आम्ही सुज्याला त्याच्या ड्रायव्हिंग वरून ठोकतच होतो. मी तर त्याला नुसते  उपदेशाचे कडक ढोस  पाजत होतो, ते त्याचं ड्रायव्हिंग सुधारावं म्हणून नव्हे तर आम्हाला त्यानं पुण्यापर्यंत पोहचवावं, सुखरूप. म्हणून.

पहिला मुक्काम साताऱ्याला विशालच्या घरीच होता.  सुज्या महंजे सपक भाज्या चघळणारा कोकणी. विशालच्या आईनं केलेल्या वांग्याच्या भाजीने त्याच्या कानातून धूरच काढला. "आम्ही सातारकर" हा काय तिखट प्रकार असतो तो त्या बेट्याला आणि आम्हालाही पहिल्याच झटक्यात तिथेच कळला. पण सुज्याची प्रचंड मदत झाली या ट्रीप मध्ये... म्हंजे तो आमचा ड्रायव्हर तर होताच शिवाय गाडीही त्याचीच होती, शिवाय आम्ही सगळॅ संपूर्ण प्रवासात त्याचाच शाब्दिक घाम काढण्याची संधी सोडत नव्हतो. आणि तरीही तो हे सगळं हसण्यातच विलीन करीत होता. असो, कास म्हंजे भन्नाट च आहे. कैक प्रकारच्या फूट भर उंच वाढणाऱ्या, रानटी तरीही नाजुक फुलंच लांबलचक पठार. ३०-३५ प्रकारची फुल त्यावेळी तिथं असावीत.  जाताना दुर्बीण घेऊन जा.  रस्त्याच्या दुतर्फा फक्त फुलंच फुलं.... आणि जिकडे पाहवे तिकडे नुसते कैमेरेच कैमेरे. अगदी दुकानात पाहिले नसतील इतक्या प्रकारचे कैमेरे पाहायला मिळतील ते फक्त कासलाच. निसर्ग फोटोग्राफिला तात्पुरते का होईना पण प्रचंड "उधाण" आलेलं आहे हे मला तिथं कळलं... निसर्ग चित्रणाचा अगदी सुळसुळाट झाला होता.

सुजीत आणि विशालही याच्यातही तोच "सुळसुळाट" संचारला होता. मिळेल ते फुलं ते कैमेऱ्यात टिपत होते...

[विशालची छुपी फोटोग्राफी]
विशल्या... फुलं पाहायला आलेली "फुलं" चोरून टिपण्यात अगदी माहिर. म्हजे तो त्याचा चळच.  स्वतःच्या फ्लैट मधून समोरची अंटी कैक प्रकारे त्याने कैमेऱ्यात टिपलेली होती. असो, कास हे ठिकाणही सुचविण्याचं डोकं मात्र त्याचंच. अर्थात त्या निमित्ताने त्याला साताऱ्याला त्याच्या घरीही जाता येणार होतेच. (एकाच दगडात दोन पक्षी) तो रानफुलांचे फोटो कैमेऱ्यात बंदिस्थ करण्यात बेभान झाला होता. शेवटी जेव्हा त्याचा कैमेरा जड झाला तेव्हा फोटो सेशन थांबले आणि गाडी कासच्या तलावाकडे ढाळा-ढाळाने निघाली....  तलावावरून माघारी सज्जनगड गाठला.

वडापाव आणि ताकाचा एक एक ग्लास रितवून सज्जनगड सर केला. समर्थांच्या वापरातील वस्तू आणि समाधीचं दर्शन घेतलं. समाधीपुढं शांत बसलो तोच सुजितं आणि कमळ्याने प्रसादालयाकडे नजर फिरवून,  प्रसादाच्या नावाखाली जेवणाचा कार्यक्रम (फुकटात) उरकायचा हे ठरवून टाकले.

[ठोसेघर]
कमळ्या...फिरायची याला लै हौस, नुसता खादाड माणूस. गर्दीमुळे प्रसादालयात जेवण मिळाले नाही. तर म्हणे "तिकडे भक्त निवास दिसतो आहे तिकडे जाऊ यात... मिळेल तिथे" शेवटी गड उतरणीला लागण्यापूर्वी हॉटेलात घुसवून त्याची पेटपुजा करवून घेतली. ठोसेघरलाही प्रत्येकी २ उकडलेली अंडी मागविली होती, त्यातीलही माझ्या वाटणीच्या एका अंड्यावरही ह्याच हरामीने गुपचुप ताव मारलेला होता. शेवटापेर्यंत ह्यानं गाडीतील किन्नरची जागा काही सोडली नाही. हा नुसताच मजा करायला आला होता. ठोसेघरचे दोन उंच धबधबे  आकर्षक आहेत पण त्याच्या जवळ जाता येत नाही हि खंतही आहेच. सुज्या आणि आंम्या वर अतिबाका प्रसंग आल्यांमुळे ते मागेच थांबून "तुळस लावण्यासाठी" जागा शोधत होते. शेवटी लेडिज संडासात जावून हे बहाद्दरांनी पोट रिते केले.

[ट्रिपचे मेंबर]
अम्या... नुसता सलमानच्या स्टाइलने स्वतःचे फोटो काढून घेण्यावर त्याचा भर.  त्याच्या सगळ्या पोझ सलमानसारख्याच.  पाचगणीला ह्याचा मामा असतो, सलमानच्या दबंग च्या शूटिंगचे लोकेशन दाखविण्याचं काम त्यांनी केलं. आम्हीही कुठल्याश्या मालिकेच्या शुटिंग्ची आणि त्यांतील नट्या पाहण्याची मजा घेतली. मुंबईचा असलेल्या आम्याचा भामटेपणा कामी आला आणि "शूटिंगसाठी आलोय" असं खोटंच सांगून पावती न फाडता,   टेबल पांईट पाहायला मिळाला. वाईत मुक्काम केला.  आमितच्या मामाचा गाव आणि बगाड, आणि आमितच्या जुन्या सामानाचं (मैत्रिणीच) घरही पाहायला मिळालं. क्रुष्णामाई मधील ढोल्या गणपतीचे दर्शन घेतले. (तो गणपती सुज्या आणि कमळ्या पेक्षाही जास्त ढोल्या आहे. ) कृष्णामाई इथे बिलकुल संथ वाहत नव्हती.  पुढे नाना फडणविसांचा मेणवलीतिल वाडा गाठला.  ह्या आम्याला इतिहासातील काही कळत नाही असा माझा पक्का समज झाला आहे. एतिहाशिक वास्तू, चर्चा यांच्या बाबतीत तो न्युट्रल आहे.  म्हंजे "तुमचं चालू द्या, मी ऐकतो" ह्या प्रकारातला... तर सुज्या आणि कमळ्या निगेटिव्ह आहेत, म्हंजे "चला, बास करा, निघू" ह्या प्रकारातील.

वाईच्या जवळच १७८० चा फडणविसांचा वाडा आहे. दुरवस्थेत आहे पण नक्की पाहवा असा आहे. वाड्यामागून क्रुष्णामाई वाहते त्या घाटावर स्वदेशचं शूटिंग झालेलं आहे.

मी, त्यातल्या त्यात ह्यांच्यात एकमेव समजूतदार आणि जबाबदार आणि विश्वासपात्र होतो, म्हणून हिशेब आणि कॉंट्री माझ्या कडे होती.