सूर्यास्त - निळू फुले

निळू भाऊंचा पिक्चर म्हणजे बेरकी नजर, कुरघोडीचं कुटील राजकारण, सत्तेमुळे मुजोर झालेला गावचा सरपंच, स्वार्थानं माखलेला पुढारी नाहीतर मदमत्त झालेला हरामी पाटील हे गणित फिक्स ठरलेलं. असल्या ऐकाऐक व्यक्तिरेखेचे अनेक पैलू निळू भाऊ साकारायचे. मधल्या काळातील जवळ जवळ प्रत्येक चित्रपटाची कथा सारखीच असायची. निळू भाऊंच्या बऱ्याच चित्रपटात बलात्काराचा सीन हा ठरलेला असायचाच. ह्यावर विनोद करताना निळू भावू म्हणायचे " कथा तिच, बलात्कारही तोच, बाई हि तिच,..... कमीत कमी तिची साडी तरी बदला. "
.
लहानपणी त्यांचे चित्रपट पाहताना चित्रपटागणिक त्यांच्याबद्दलची द्वेषभावना, चीड वाढायची. त्याकाळी गावोगावी पुजा, पाची, बारसे, घरभरणी नाहीच झाले तर गणपतीत पडद्यावर पिक्चर पाहायला मिळायचे. निळू फुलेची पडद्यावर एंट्री झाली की आमचा रक्तदाब वाढायचा, श्वासोच्छ्वास इतका मंद व्हायचा की ह्या निळू फुले नामक व्हिलन पिक्चर मध्ये नसावाच असे वाटायचे, असला तरी त्याचा लवकरात लवकर खात्मा व्हावा म्हंजे आम्हाला राहिलेला पिक्चर स्वस्थपणे पाहता येईल असे मनोमन वाटायचे.
बाया-बापड्या तर त्याला सामूहिक शिव्यांची लाखोळी वाहायच्या. आमच्या पदरी त्यांना कधीच आदर नव्हता.
.
पण हळू हळू पडद्यावरचा निळू फुले आणि त्यामागचा निळू भाऊ यांत असलेली प्रचंड तफावत जाणवू लागली. कलाकाराचं सामाजिक जगणे कसे असावे याचा सर्वोत्कृष्ट दाखला म्हंजे निळू भाऊंचे जीवन. प्रचंड आणि सदैव सामाजिक जागरूकता असलेला माणूस हि त्यांची खरी ओळख. त्यांचा खलनायक जितका आठवतो तितकेच हळव्या स्वभावाचे, पाणीदार डोळ्यांचे, हसरे निळू भाऊ आज आठवताहेत.
.


.

.

.... त्या सूर्यास्ताला हि चित्ररूपी श्रद्धांजली.


सचिन, नारायणगाव, २७/८/२००९