जाहीरनामा-- - रद्दीत जमा.

जाहीरनामा म्हंजे तो पाळलाच पाहिजे असे काही बिलकुल नाही. किंबहुना "न पाळणाऱ्या आश्वासनांची जाहीर यादी" म्हणजे जाहीरनामा. (जो निवडणूकीनंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकायचा असतो. )

मागच्या जाहीरनाम्यात फुक्कट वीज देतो असा लिखित शब्द आघाडीने दिला होता, पाळला नाही, (फुक्कटच काय पण विकतही २४ तास वीज देण्याची यांची लायकी नाही हे नंतर कळले. ) वर "अश्या थापा निवडणूकीच्या तोंडावर मारायच्या असतात, त्या पाळण्यासाठी थोड्याच असतात" हेही विलासराव आणि सुशिलभाउ या हंसाच्या जोड्याने स्वच्छ अश्या निर्लज्जपणाने हसत सांगितले होते, त्याचबरोबरीने "२००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करू" हेही आश्वासनही ती "प्रिटींग मिस्टेक" म्हणत झटकले होते, तेव्हाच जाहीरनामा पाळण्यासाठी नसतोच हे आम्हांस पटले. (पण मग, तो का छापतात ते कळत नाही)


यावेळी जरा नवीन शक्कली लढवल्यात,म्हंजे मागच्या वेळी गूगली टाकली होती आता गुल्ले पिसलेत.


जनतेला डायरेक्ट "लखपती" करण्याचे आश्वासन आघाडीने दिले आहे. ३५-४० हजार दरडोई उत्पन्न १ लाखांपर्यंत वाढविले जाणार आहे. (ते कसे? ते अजून ठरविलेले नाही.... शेअरबाजार, सट्टाबाजार, मटका नाहीतर जुगारात पैसा लावला तर १ लाखाचा आकडा नक्की गाठता येईल)
यावेळीही पुन्हा फिरून त्याच भोपळे चौकात येत सालाबादप्रमान "भारनियमन मुक्त महाराष्टाची" घोषणाही त्यात आहेच. (पुढच्या किती निवडणुकांत हे तोंडीलावायला असेल कुणास ठाऊक? )
५ वर्षात १० लाख घरे बांधणार हेही एक आश्वासन आहे. (आणि त्या घरांत ५० लाख जनता राहणार) चांगले आश्वासन आहे पण १० लाख जरा अतीच झाले नाही का? ( कदाचित १ काचे प्रिटींग मिस्टेकंमुळे १० झाले असावेत, तरीही हि मिस्टेक मतदानानंतर मान्य करणार असतील)
पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असाही एक विचित्र मुद्दा त्यात घुसडलेला आहे, तो कशासाठी हे काही मला कळले नाही बुवा. (म्हंजे मतांचा आणि त्याचा संबंध असेल असे वाटत नाही म्हणून)
शिवराय, आंबेडकर यांचे सागरी स्मारक उभारणार, हे मात्र छान गाजर दाखवले आहे. पुतळ्यांमध्ये ३००-३०० करोड घालायला पैसा आहे, विदेश दोऱ्यांसाठी पैसा आहे, स्वतःच्या सुरक्षेसाठी पैसा आहे, मग गरीबांना, शेतकऱ्यांना द्यायच्या वेळीच तिजोरीत खडखडाट का असतो बरे?
शेतकऱ्यांना ३% व्याजाने कर्जे देताहेत, अगोदर त्यांची कर्जेमाफीची मागणी तर पूर्णं करा.
मुलींना जन्मताच सव्वालाख रु देणार. (इथेही युतीच्या वचननाम्याची ढापा ढापी) ह्या साठी दरवर्षी कमीत कमी ३०० करोड वेगले टेवावे लागतील याचा विचार कोण करणार?

अजूनही बराच २१ कलमी कार्यक्रम आहे, असल्या हास्यास्पद जाहीरनाम्यामुळे आघाडीचाही कार्यक्रम लागू शकतो.
महाराष्टात जी लाखो बेरोजगारांची फौज तयार होते तिच्यासाठी मात्र इथे जागा नाहीच. कदाचित ते सैन्य ते प्रचारासाठी राखून ठेवणार असतील...

सचिन, नारायणगाव, पुणे.
(इमेजस सोज्यन्य - ग्रफिटी.)

रिडालोस - कशासाठी? कुणासाठी?

राज ठाकरेंनी मनसे ची स्थापना करून एव्हाना २ वर्षे झाली होती. इथपर्यंत सारं काही आलबेल होतं.
पण.....
"महाराष्ट माझा" म्हणत "मराठीपणासाठी" मनसेने आंदोलने पेटवायला सुरुवात केली आणि हुशार कांग्रेस नेत्यांनी इथेच दुरचा विचार करून सुमडित राजकीय डाव टाकायला सुरुवात केली. हि मराठीपणाची आग "पाहिजे तेवढी" आणि "पाहिजे तशी" फोफावी म्हणून मुद्दामहून कॉग्रेसनेच कारवाई करण्यास वेळ लावला हे सर्वश्रुत आहेच. त्यावर आगीत तेल ओतणारे निरुपम, क्रुपाशंकर यांसारख्या आपल्याच तोंडपाटिल नेत्यांची "वाजती घंटा" अहोरात्र वाजवत ठेवली. ज्या मराठी टक्क्यांच्या भरवशावर शिवसेना आणि राष्टवादी सत्तेच्या जवळ जाऊ पाहत होते त्या मतांचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करून त्या दोन्ही "महाराष्टिय" पक्षांना शह देण्याची हि "तिरकस" चाल होती.
सेना, राष्टवादिनेही या चालीकडे काहीसे दुर्लक्षच केले होते.
पण.......
काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत मनसेने अनपेक्षित प्रमाणात "मराठी" मते गोळा करून "कांग्रेशची चाल" किती अचूक होती याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कांग्रेस नं. १ तर राष्टवादी चोथ्या स्थानाला फेकला गेला आणि....... शरद पवार खाडकन जागे झाले. राष्टवादिच्या अस्तित्वावर शंका घेतली जाऊ लागली, विलिनीकरणाची मागणीही झाली.
आता....
कांग्रेसच्या या "तिरकस" चालिला, कांग्रेसच्यच तंबूत राहून, काहीतरी " वाकडी चाल" करून शह देणे गरजेचे होते अन्यथा येणाऱ्या विधानसभेत राष्टवादिची घसरणं थांबविणे अवघड आहे हे पवारांच्या ध्यानी एव्हाना आलेले होतेच.
आणि...... मग शोध चालू झाला वाकडया चालीसाठी वापरायच्या घोडयाचा.... घोडाही ठरला आणि चाल हि.
.
पवारांनी वाकडी चाल खेळण्यासाठी पटावरचे आपलं नेहमीचं, अगतिक असलेलं प्यादं हातात घेतलं. शिर्डीतल्या दारुण पराभवामुळे का होईना पण, त्यांच्यात शिल्लक राहिलेल्या स्वाभिमानाने (? ) लाचारीवर मात केली होती. कांग्रेसकडून पुरते फसवलो गेल्याची पीर-पीर, धुस-फुस दलित नेत्यांमध्ये चालू होतीच. कॉग्रेसची परंपरांगत असलेली "दलित" आणि मुस्लिम मते तोडण्यासाठी ह्यापेक्षा उत्तम प्यादे आणि ह्यापेक्षा उत्तम वेळ(संधी) ह्या राजकीय डावात नाही हे ओळखूनच ह्या प्यादाला वजिराची वस्त्रे चढवून "रिडालोस" ची स्थापना करवून घेण्यात आली.
आता हा वजिर कांग्रेसच्या राजाला शह देण्यास कितपत यशस्वी होतो यावर राष्टवादिचे यशापश बरेच आधारीत आहे.
.
"तुम्ही आमची गाय मारली आम्ही तुमचे वासरू मारू" ह्याच साठी हि नवी आघाडी आहे, हि पवारांचीच एक जातीय+राजकीय खेळी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पण निवडनुकीनंतर, मनसे शिवसेना-भाजपाच्या वळचनीला आणि आठवले मिळतिल तेवढ्या शिलेदारांसह परत कांग्रेस दरबारी मुजऱ्यास गेले तर पवारांच्या राष्टवादिचे भवितव्य परत दोलायमान होणार हेही नक्की.


(रिडालोस - रिपब्लिकन डावी लोकशाही समिती, नाव मुद्दाम नोंद करतो आहे कारण निवडणुका नंतर हिचे अस्तित्व टिकेल का या बाबत शंका आहे. )

सचिन, नारायणगाव, पुणे.

खुडुक पुढारी

कर्माने बदल घडो अथवा न घडो, पण काळाचं आपलं स्वतःच संक्रमण नेहमीच चालू असतं. सत्तेच्या खुर्चीची दावेदारी बदलण्याचा किंवा ती टिकविण्याचा काळ असाच दर ५ वर्षांनी येतच असतो... निवडणुक हे सत्तापरीवर्तनाचं लोकशाहीतील एकमेव साधन.

मंदिराच्या गाभाऱ्यात घुसताना दारातील कासवाला पायदळी तुडविणे अनिवार्य असते त्याप्रमाणेच सामान्य जनतेच्या भावना, आशा, देव, देश, संस्कृती पायदळी तुडवत भुईसपाट करतच ही राजकीय मंडळी विधानभवनात प्रवेशीत होतात. कोंबडीने अंडी आणि खुडुक राजकारण्यांनी खुर्च्या उबवाव्यात, त्यातून जन्माला आलेल्या त्यांच्या घरंदाज पिलावळींचे मन, मिशरुढ फुटायच्या आतच "बापाप्रमाणेच समाजसेवेला" वाहून घ्यायला हावरट झालेलं असते. काय तर म्हणे कलाकारांची मुले कलाकार, तसेच राजकारण्यांची मुले राजकारणी.. किती सोपं आहे नाही?.

सत्ता पुढाऱ्यावर स्वार झाली की सत्तेमुळे त्याचा मुजोरपणा वाढतो, असह्य गरीबांच्या पाठीवर कोरडे ओढण्यात जो माजलेला उन्मत्त आनंद असतो त्याचा ते पुरेपूर उपभोग घेतात. पुऱ्या मतदासंघात गुंडाराज करून धुमाकूळ घालणारे कैक आहेत. विधानभवनात जनतेच्या प्रश्नांना गावकुशीचा रस्ता दाखवून "थोबाडबंद" राहणारे म्हणजे तर कडीच. एकाच कामाचे आळी-पाळीने श्रेय लाटणारेही अनेक, आणि एकाच रस्त्याचे पाच-पाच वेळा नारळ फोडून "नुसतेच" उद्घाटन समारंभ करणारेही अनेक. "खादाड असे माझी भुख, चतकोराने मला न सुख" हा सदगुण तर फारच "सामान्य" आहे, नव्हे तर तो मूळ स्थायीभावच आहे. त्यामुळे नगरसेवक झाला रे झाला की त्याला आमदार/खासदार होण्याचे भुकेलेले वेध लागलेच म्हणून समजावे.
कुठेतरी वाचलं होतं, लाचारी, हुशारी, मगरुरी, निलाजरेपणा, क्रूरपणा या साऱ्याला दिखावुपणाची फोडणी, सत्यनिष्ठा आणि स्वाभिमान शून्य म्हणजे पुढारी. हे प्रताप साऱ्यांकडेच असतात म्हणूनच की काय "या" पिकाला प्रचंड "गळित" मिळते.
दुर्मिळ असले तरी काही पुढारी अजूनही "बरे" आहेत. त्यातल्या त्यात "बऱ्या" असणाऱ्याला "निवडणे" ह्या उपर आपण काय करावे?

हां.. सत्तापरिवर्तन जनताजनार्दनच करतो, पण सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची ताकद त्यात नसते, तो मूकच असते, बऱ्याच वेळा त्याची मुस्कटदाबी केलेली असते, त्याच्या खडखडाट झालेल्या पेटितं पेश्यांचं दान टाकून त्याच्या कडून मतांचा आशीर्वाद बळजबरीने घेतला जातो. ... मतदार म्हंजे एका रात्रीचा राजा, अन नंतर बोकांडी बोजा हे ठरलेलं.
शेवट काय तर... जनतेसाठी हे सारे खुडुकच.

(खुडुक म्हंजे अंडे न देणारी कोंबडी.)


images from- google images.