खुडुक पुढारी

कर्माने बदल घडो अथवा न घडो, पण काळाचं आपलं स्वतःच संक्रमण नेहमीच चालू असतं. सत्तेच्या खुर्चीची दावेदारी बदलण्याचा किंवा ती टिकविण्याचा काळ असाच दर ५ वर्षांनी येतच असतो... निवडणुक हे सत्तापरीवर्तनाचं लोकशाहीतील एकमेव साधन.

मंदिराच्या गाभाऱ्यात घुसताना दारातील कासवाला पायदळी तुडविणे अनिवार्य असते त्याप्रमाणेच सामान्य जनतेच्या भावना, आशा, देव, देश, संस्कृती पायदळी तुडवत भुईसपाट करतच ही राजकीय मंडळी विधानभवनात प्रवेशीत होतात. कोंबडीने अंडी आणि खुडुक राजकारण्यांनी खुर्च्या उबवाव्यात, त्यातून जन्माला आलेल्या त्यांच्या घरंदाज पिलावळींचे मन, मिशरुढ फुटायच्या आतच "बापाप्रमाणेच समाजसेवेला" वाहून घ्यायला हावरट झालेलं असते. काय तर म्हणे कलाकारांची मुले कलाकार, तसेच राजकारण्यांची मुले राजकारणी.. किती सोपं आहे नाही?.

सत्ता पुढाऱ्यावर स्वार झाली की सत्तेमुळे त्याचा मुजोरपणा वाढतो, असह्य गरीबांच्या पाठीवर कोरडे ओढण्यात जो माजलेला उन्मत्त आनंद असतो त्याचा ते पुरेपूर उपभोग घेतात. पुऱ्या मतदासंघात गुंडाराज करून धुमाकूळ घालणारे कैक आहेत. विधानभवनात जनतेच्या प्रश्नांना गावकुशीचा रस्ता दाखवून "थोबाडबंद" राहणारे म्हणजे तर कडीच. एकाच कामाचे आळी-पाळीने श्रेय लाटणारेही अनेक, आणि एकाच रस्त्याचे पाच-पाच वेळा नारळ फोडून "नुसतेच" उद्घाटन समारंभ करणारेही अनेक. "खादाड असे माझी भुख, चतकोराने मला न सुख" हा सदगुण तर फारच "सामान्य" आहे, नव्हे तर तो मूळ स्थायीभावच आहे. त्यामुळे नगरसेवक झाला रे झाला की त्याला आमदार/खासदार होण्याचे भुकेलेले वेध लागलेच म्हणून समजावे.
कुठेतरी वाचलं होतं, लाचारी, हुशारी, मगरुरी, निलाजरेपणा, क्रूरपणा या साऱ्याला दिखावुपणाची फोडणी, सत्यनिष्ठा आणि स्वाभिमान शून्य म्हणजे पुढारी. हे प्रताप साऱ्यांकडेच असतात म्हणूनच की काय "या" पिकाला प्रचंड "गळित" मिळते.
दुर्मिळ असले तरी काही पुढारी अजूनही "बरे" आहेत. त्यातल्या त्यात "बऱ्या" असणाऱ्याला "निवडणे" ह्या उपर आपण काय करावे?

हां.. सत्तापरिवर्तन जनताजनार्दनच करतो, पण सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची ताकद त्यात नसते, तो मूकच असते, बऱ्याच वेळा त्याची मुस्कटदाबी केलेली असते, त्याच्या खडखडाट झालेल्या पेटितं पेश्यांचं दान टाकून त्याच्या कडून मतांचा आशीर्वाद बळजबरीने घेतला जातो. ... मतदार म्हंजे एका रात्रीचा राजा, अन नंतर बोकांडी बोजा हे ठरलेलं.
शेवट काय तर... जनतेसाठी हे सारे खुडुकच.

(खुडुक म्हंजे अंडे न देणारी कोंबडी.)


images from- google images.

1 प्रतिक्रया:

Mahendra ने कहा…

Good post. Agree with the con taints..

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..