जुलै १९९५ ला मी पुण्याच्या अभिनव कला मंदिरात प्रवेश घेतला... पहिल्यांदाच खेड्या-पाड्यातून उच्चभ्रू जगात आल्यावर आपला गावंढळ साधेपणा सतत आपल्या दरिद्री मनाला टोचत असतो, हिणवत असतो। माझ्याही अवस्था या नियमाच्या बाहेर नव्हती. पण त्याबद्दल मी कधीतरी लिहीलच...
.
हा,॥ तर कॉलेजचा प्रवेश घेतला, पण हॉस्टेलाची मात्र सोय होत नव्हती। रिक्षावाल्यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे विद्यार्थी गुह, मराठा हॉस्टेल, अशी दोन चार स्वस्तातील हॉस्टेल पाहिली पण कुठेही सोय झाली नाही. थकलो होतो त्यापेक्षा निराश च जास्त झालो होतो...
शेवटी मी, आई, आणि दादा तिघांनीही खडकवासला गाठला। मामानं "आत्माराम शंकर नलावडे (गुरुजी)" यांच्या नावे एक चिट्टी लिहून दिली होती. "मुलाची वसतिगृहात सोय होईपर्यंत २-३ दिवस तुमच्याकडे ठेवावे. " दादांनी वर्गावर्गात जाऊन नलावडे गुरुजी कोण असी विचारपूस केली, आई तसी त्यांना पुसटसी ओळखायची. दादांनी त्रयस्थासारखी निमुटपने फक्त चिट्ठी पुढे केली. (ओळख नसतानाही "मुलाला ठेवा" अशी विनंती करायलाही त्यांना मुलासाठी कमीपणा वाटला नसता, तरीही चिट्टी मुळे आपलं काम सोपं होईल म्हणून ते बोलले नसावेत. )
गुरुजी पडवीत उभे राहून चिट्टी वाचत होते आणि आई, दादा मूकपणाने त्यांच्याकडे थकलेल्या आशेने पाहत होते। आई-दादांकडे पाहताना मी मात्र केविलवाणा झालो होतो. दादा काही बोलणार नव्हते, आईनेच गुरुजींना ति व इंदुबाई (गुरुजींची बायको) यांच्यातील नात्याची ओळख सांगावी आणि विनंती करावी असे सांगून ठेवलेले होतेच. पण तेही सांगण्याची गरज नव्हती, कारण काकांनी आनंदाने चालेल म्हणत मान हालविली होती. वर्ग सोडून ते आम्हाला घरी घेऊनही गेले. तिथेच चिऊ भेटली.
.
नाण्देडफाट्याच्या शाळेत जाऊन लगेच तिघेही इंदुबाईंनां भेटलो। आईला पाहून तिला अनपेक्षित आनण्द झाला. आईला त्या "बाई", तर आई तिला "इंदू मावशी" म्हणून हाक मारायची॥ कुठल्यातरी नात्यानं आइची ती मावशी लागायची... मीही मावशीच म्हणू लागलो. मी तिथे राहणार आहे म्हटल्यावरही तो आनंद तसाच टिकून होता, किंबहुना तिला माझं प्रचंड कौतुकच वाटत होतं. त्याच दिवशी तिनं साऱ्या शाळेत मला कितीतरी कौतुकानं मिरवलं होतं, अगदी हेडमास्तरापर्यंत. ..
माझ्या चेहऱ्यावरून आणि डोक्यावरून फिरणारा तिचा तळवा मज आई जैसाच वाटायचा॥ आयुष्यात आक्समातपणे भेटूनही नीस्वार्थपने मदत करणारी नितळ माणसे मिळणे म्हणजे सुदैवच। मावशी-आणि काका मला तसेच होते.
.
संध्याकाळी मावशीचा मुलगा मनू भेटला, मनु आणि चिवुताई बद्दल कधितरी वेगळं लिहिलच...
.
२-३ दिवसानंतर, पुणे विद्यार्थी गृहात सोय झाली पण काका-मावशीने निक्षून सांगितले की आम्ही याला इथेच ठेवणार, अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळू याला. दादांना वाटायचे हॉस्टेलच बरे उगाच अतिपरिचयात अवज्ञा व्हायची आणि मुलाचा नंतर राग-राग व्हायचा। दादा ऐकत नाहीत म्हटल्यावर काकांनी शेवटी "भेदाचं" शश्त्र काढतं म्हणाले " ठीक आहे, शेवटी तुमचा मुलगा आहे, काय करायचे आहे ते करा पण आम्हांस वाटते इथेच ठेवा। "............. दादांना यापुढे काय बोलावे हे कळेनासे झाले। दोन वर्षे मी तिथे राहिलो पण शब्दच काय पण रागीट नजरेनंही मावशीनं कधी माझ्या कडे पाहिलेलं मला आठवत नाही।
.
सकाळी कालेज असायचे। मला तेच सहाला उठवायचे, पण त्याअगोदर माझ्यासाठी अंघोळीच गरम पानी बाथरुम मध्ये काढलेलं असायचे. अंघोळ होईपर्यंत किचन ओट्यावर चहा, बिस्किटे ठेवून काका बाहेर अंगण झाडायला गेलेले असायचे. ज्या ज्या दिवशी घरात बिस्किटे नसायची त्या त्या दिवसी चहा च्या कपाशेजारी दहाची नोट न चुकता ठेवायचे. माझ्या नकळतच सारं काही निमुटपने व्हायचं, जाताना "जाऊ का काका? " एवढाच प्रातःसंवाद व्हायचा...
.
मावशीला माझ्या चित्रकलेचं खास अप्रूप होतं, शेजारी, सारे नातेवाईक आणि घरी येणाऱ्या प्रत्येकास ति आवर्जून माझा उल्लेख करायची। चित्रे दाखवायची. माझ्या नावानंतर "बाळ" हे विशेषण ति बऱ्याचदा वापरायची, अगदी मायेच्या मायेनं. कपड्यानं पासून ते कुठली भाजी करू इतपर्यंत ती मला सामावून घ्यायची. माझ्याकडून कधी- कुठली अपेक्षा मावशीनं ठेवली नव्हती. माझ्या वागण्या-बोलण्यालाही कधी नावं ठेवली नाहीत. कसं वागावं, काय बोलावं ह्याचेही डोस कधी दिले नाहीत. जीवनाचं कुठलंही मामुलीसं तत्त्वज्ञानही तिने मला ऐकविले नाही. पण एखाद्याला जीव कसा लावावा हे मी तिच्या प्रत्येक वागण्यातून, तिच्यानकळत पाहत होतो, अनुभवत होतो. माझ्यावर तिचे अगणित उपकार आजही आहेत, पण तिनं त्याचं प्रदर्शन कधीच केलं नाही. उपकाराच्या भावनेचा हलकासा स्पर्श देखिल तिला कधी शिवलाच नाही. तिच्या साधेपणानं ह्या साऱ्या "मी" पणाच्या दुर्गुणांवर तिच्याही नकळतपणे मात केली होती.
.
मनू आणि चिवुताई ह्या स्वतःच मुलांवर जे तिचे उपजत प्रेम होते तिच सहजता तिने माझ्याबाबतीतही ठेवली होती, सहजतेतून आम्हाला आम्ही सुरक्षित असल्याचा भास व्हायचा। ती सूर्यासारखी नव्हतीच, पण जमेल तेवढा भाग प्रकाशमान करण्यासाठी मिणमिणतं राहणारी पणती मात्र नक्की होती.
.
अशी लोभस मानसं सध्या भेटतच नाहीत, आयुष्यातील कैक मित्रांना मी मावशी बद्दल आवर्जून आत्मीयतेने सांगायचो, अजूनही सांगतो। यापुढेही नक्की सांगत राहिला...
.
.
.
मावशीच्या देहावर पुष्पहार अर्पण करून तिचे शेवटचे अंतदर्शन घेताना, तिच्या हळव्या तळव्यांच्या प्रेमळ स्पर्शाभास होवून डोळ्यांच्या कडा पुन्हा आपसूक ओलावल्या......
.......
सचिन, नारायणगाव, पुणे, ९/५/२००९
सातपाटील कुलवृत्तांत आणी कोसला (अभिवाचन)
4 वर्ष पहले
1 प्रतिक्रया:
HOLA
SOMOS DE LA VOZ DEL HINCHA MIRASOL ARGENTINA Y QUERIAMOS UN INTERCAMBIO DE LINK DESDE YA GRACIAS Y ESPERAMOS TU RESPUESTA
http://www.lavozdelhinchamirasol.blogspot.com
एक टिप्पणी भेजें
..मनापासुन ध्न्यवाद..