मराठ्यांचा शेवटचा सरलष्कर

"आबा, गाठू ना आपण शिरकान येळेवर?"
"आरं?, निस्त पोचून काय कामाचं? येळ आली तर शीर काटून ठिवाया लागय, शिवाजीऱ्हाज्याचा अंकुर जपाया!"
मराठी दोलत डुबवू पाहणाऱ्या त्या भयाण काळरात्री तो म्हातारा आपल्या दोन बांड्या पोरांसह जीवाच्या आकांतानं दौडत होता... पन्हाळ्यावरून.. संगमेश्वराकडे.... घाट-पांदीतून... गचपानातून...., कारण त्यांच्याही पुढे औरंग्याचा मुकर्रबखान सावज टिपायला उरफोडीनं दौडत होता...
मध्यरात्र उलटली नसेल तोच सपासप शांतता भेदीत दोन घोडाइत सरदेसायांच्या वाड्यात घुसले...खबर ऐकून कनोजाचा थरकाप उडाला... कसेबसे सावरीत ते सुखदालनाकडे झेपावले... महाराजांना जागे केले.

"को S ण ?"

"वकुत न्हाई..  घोडा फेकत एक फौज रानांतनं दौड घेतिया.. धन्यांनी खिन्नभर देरी न करता ह्याच वक्तीला संगमेश्वर सोडावं" - "इथल्या पांगपरास दौडीत लैई घोडा हाय.. तड न्हाई लागाय्ची" भेदरलेले खबरे एकापाठोपाठ बोलते झाले.

"शिर्क्यांची, शिर्क्यांची माणसं असतील ती, गनीमाची काय बिशाद ह्या गचपानात घुसायची? " महाराज जराश्या गाफीलपणानं बोलले....काळोखातल्या गाफीलपणाचा अंदाज त्यांना नीटसा आलाच नव्हता, अरेरे... चुटपुटत खबरे बाहेर पडले.
.
कोंबडं आरवायच्या आत,... अन दैव बलवत्तर म्हणून मुकर्रबखानाच्याही काही घटका अगोदर, आडवाटेनं जीवाची पर्वा न करता म्हातारा संमेश्वराच्या वेशीत शिबंदीसह घुसला... वायू वेगाने संगमेश्वराला घेर टाकत पांगणाऱ्या शिबंदीतून नरड्याच्या घाटा फुटून थरकाप उडविणाऱ्या कैक किलकिल्या उडाल्या.... " हाS र हाS र म्हादेव!!! ".... अन.. त्या विरायच्या आत... आली... घुसली...बेभान, बेलाग, शिवपुत्राच्या रक्तासाठी पिछाडलेली गनीमांची फौज धुरळा उडवीत वेशीच्या आत घुसली. "धीS न धीS न" आरोळ्या, कालवा, टापां साऱ्यांचा चिखल झाला...

भयकातर झालेले कुलेश, राया, अंता छत्रपतींना गदगदा हालवत किंचाळले "घात झाला... इळभर थांबू नगासा, घात झालाया.. हत्यार घ्या नि भाईर पडा... निघा.. निघा"

गर्रकन वळत.. म्यानातील तलवार सर्रकन उपसत.. म्यान तिथंच फेकून देत... त्याच हातात शंभुराजे ढाल तोलते झाले. " चला, भाईर व्हा, गाव येरगटलाय गनीमानं". राया, अंता, कुलेश, अर्जोजी, महाराज एकाच आवेगानं वाड्या बाहेर पडले... घोडी धरलेले मोतदार जीव डोळ्यात आणून टकमका दरवाज्याकडेच पाहत होते.. मराठ्यांचा राजा बाहेर काढण्यासाठी... वाचविण्यासाठी.

 पण एव्हाना म्हाताऱ्याची फळी फोडून दहा-पंधरा हसम आत घुसले होते... पाठोपाठ पिसाळलेला इखलासखानही पिछाडीला शे-पाचशे हशम घेऊन महाराजाच्या अंगावर धडकला..
.पण म्हाताऱ्याचा सारा "जीव" महाराजांत अडकल्याने, जिवाची अन गनीमांच्या वारांची दोघांचीही पर्वा न करता म्हातारा संताजी-बहिर्जीसह पुढे झेपावलाच.... इखलासखानाला ते मोठ्या जिकरिने दरवाज्यापासीच आडवे आले...... झालं, टापा, आरोळ्या, खणाखणाट करत.. दरवाज्यावरच कुरुक्षेत्र पेटलं!

संभाजीराजांनी कसाबसा चंद्रावत माडांखाली घेतला.. लागलीच म्हाताऱ्याने स्वतःचा घोडा धन्यापासी नेला... भिंगरी सारखा तो धन्याभोवती फिरवत... वार झेलत.. वार करत.. म्हातारा ओरडत होता.. "धनी...धनी..भांगा काढा धनी.. नावडी.. व्हडक्यात बसून निघा.. जीवाची बाजी लावू आमी".. म्हाताऱ्याच्या मुखातून मराठी दोलत अक्षरशः आक्रोशत होती..

हातचे हत्यार सपासप फिरवत संभाजीराजे भांगा मिळेल तसा चंद्रावत घुसवत होते.

"म्हातारा, संताजी, बहिर्जी, कुलेश, अर्जोजी असे जानकुर्बान मराठे वादळातून दिवली जपून न्यावी तसे शिवाजीऱ्हाज्याच्या अंकुराला, शिवपुत्राला, मराठ्यांच्या राजाला नेण्याची पराकाष्टा करत होते. पाठीवरून घामाच्या धारा फुटल्या होत्या, नरड्याला कोरड पडली होती तरीही म्हातारा एकाही गनीमास राज्यांच्या जवळ फिरकू देत नव्हता... जीव गेला तरी बेहत्तर पण राजा वाचवायचाच या इर्षेने तो पेटला होता, अगदी बाजीप्रभू देशपांड्यांप्रमानं.."
काफरांच्या राज्याच्या अंगलटी भिडण्याच्या आड हा थेरडा येतो आहे हे हेरलेला इखलास म्हाताऱ्याकडे बोट दाखवत खाटिकाप्रमाने किंचाळला "घेर डालो, बुढ्ढेको.. घ्रेर डालो". ....आणि महाराजांची कड धरून असलेल्या म्हाताऱ्याला चवताळलेल्या हशमांनी लागलीच घेरून टाकलं... महाराजांच्या फळीपासून त्याला तोडून एकटं केलं जाऊ लागले... तरीही अजूनही हत्यार अन बुढी बोली कडकडत होती " धनी, नावडी, व्हडकी"...

पण आता?.... म्हाताऱ्याच्या अंगावर जागाच नव्हती जखम झेलायला..
आणि झालाच.. ...
शेवटचा हाशमी वार.. . जाड पात्याच्या हाशमी तेगीचा...
म्हाताऱ्याच्या छाताडावर.. !!!!

म्हातारा जनावरावरून खाली कोसळला... धाडकन.
दोलतिचा पाचवा मर्दांना सरलष्कर कोसळला.... ...."म्हलोजी घोरपडे" कोसळला.

.


साळसूद पाचोळा.
आधार- "छावा- शिवाजी सावंत"

19 प्रतिक्रया:

रोहन... ने कहा…

दोस्ता...भाषा रांगडी वापरलिस बघ... काटा आलया अंगावर वाचून. जीव काढलास बघ. असा वाटुन राहिले की आम्ही पण तिकडेच होतो त्या क्षणाला.

१ फेब्रुवारी १६८९ हां तो दिवस... ज्यादिवशी शंभू राजे कैद झाले आणि सरनौबत म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले... अजून २ दिवसांनी बरोबर ३२१ वर्षे पूर्ण होत आहेत...

घोरपडे हे पिढीजात आदिलशाहीचे चाकर. पण शिवरायांनी म्हालोजींना आपल्याकडे वळवले. गोवळकोंडा येथून त्यांने म्हालोजी यांना लिहिलेले पत्र येथे वाचू शकता...

http://itihasachyasakshine.blogspot.com/2009/03/blog-post_16.html

साळसूद पाचोळा ने कहा…

रोहनजी....

तो दिवस १ फेब्रुवारी होता, हे माझ्या मनीही नव्हते... बरेच दिवस " म्हलोजी" मनात घोळत होते, अक्षरक्षः स्वामीनिष्टा पाहून मला गदगदून यायचे.. डोळ्याच्या कडा आपसुक ओल्या व्हाय्च्या.. रात्री झोपेतही हेच व्हायचे.... आज उतरवून टाकले सारं. हा विलक्षन योगायोग की तो दिवस परवाच आहे...

आपन पुरविलेली माहिती, पत्रे माझ्यासाठी मोठा साठा आहे... आपले आभार मानन्याची चुक मी करनार नाहि.

साळसुद पाचोळा.

पराग जगताप ने कहा…

apratim! apratim! apratim!!

रोहन... ने कहा…

१ फेब्रुवारी १६८९ - 'छत्रपति संभाजी महाराज' मुघलांच्या तावडीत ... http://marathahistorycalender.blogspot.com/2010/02/blog-post.html Take a look ... !!!

रोहन... ने कहा…

सचिन पुन्हा-पुन्हा इकडे येउन हे वाचतोय बघ ... वाचल्यापासून माझा जीव घूसमटलाय पार. कशात म्हणुन लक्ष्य नाही... नकळत डोळे पाणावतायेत.

एक प्रश्न सतत माझ्या डोक्यात फिरतोय "का? का बलिदान केलं ह्या लोकांनी? ह्या आजच्या महाराष्ट्रासाठी.............?"

साळसूद पाचोळा ने कहा…

रोहनजी,
देहभान विसरून वेडं होवून मृत्युकडे बिनदिक्तपणे ते का दोडले?

गात्रं थकली होती तरी छातीचा कोट करून फक्त त्या तीन ललकाऱ्या एकू येइंपर्यंत बाजीनं का खिंड लढवली?

दिलेर कडून सरदारकी मिळत असतानाही मुरारबाजीनं का स्वतच्या रक्ताचा ओघ सांडवला?

का तान्या पोरांच लगीन सोडून सिहंगडावर मरायला स्वार झाला? का?... असे कैक वीर आहेत... की ज्यांना आम्ही विसरलोय, त्यांच्या बलिदानालाही विसरलोय...

आम्च्या सारखे क्षुद्र स्वार्थी फक्त इतिहास वाचतो... समजून घेत नाहि, अंगी बाणवत नाहि?

Deepak ने कहा…

दोस्त .. अभिमानानं म्हणावं असं वाटलं!

अंगावर रोमांच उभारणारं लिखाण... अतिशय सुंदर, समर्पक!

Kanchan Karai (Mogaraafulalaa) ने कहा…

प्रत्यक्ष तो प्रसंग पहात आहोत असं वाटलं, मित्रा.
पण आता?.... म्हाताऱ्याच्या अंगावर जागाच नव्हती जखम झेलायला..
अंगावर रोमांच उभे राहिले.

मन कस्तुरी रे.. ने कहा…

सरळ सरळ छावा तून कट-पेस्ट केलंत....आणि ते सांगायलाही तयार नाही आपण? का? कोणत्या तोंडानी आपण इमानाचे, प्रामाणिकतेचे गोडवे गायचे मग?
अतिशय तीव्र, जिवंत वर्णन केलंय शिवाजी सावंतांनी....नुसतं ’आधार’ म्हणून स्वतःचंच लिखाण दाखवायला काही वाटत नाही?

खरेच ’साळसूद पाचोळा’ आहात!

Unknown ने कहा…

hummmm....(((aadhar CHHAVA))) nahi tar fakt Chhava kadambaritilach vakay aahet....

Vinamar pane navakhalil (((aadhar))) ha shabad kadun takava........ lokana sangatana swatachi shekhi miravanya pekshya jyache shabad aahet tyalach te samarapit kelele jast yogay....

साळसूद पाचोळा ने कहा…

अगदी मान्य. छावा वरुनच लिहले आहे हे .. संवादाच्या वाक्यांत बदल नाही (कारण ती वाकये मी माझ्या वहित कैक दिवसापासून टेवली आहेत) .. तरीही परिच्छेदात काही बदल आहेत हे जरासं ध्यानी घ्यावे ... लिखाण कुनाच ह्या पेक्ष्हा ते कुनाबद्दल लिहले आहे हे महत्त्वाचे, माझ्या मनात "म्हालोजी" घोलत होते.. त्याम्च्याबद्दल जमेल तितक्या लोकांना कलावं हाच त्यामागचा मुख्य हेतु होता... माझ्या परीनं ते मी करू पाहिले..अर्थात मी सावंताच्या पुढे नाही.. जाणिजे.

माझी ब्लॉग शाळा ! ने कहा…

रांगड्या भाषेतील मराठीचे अजुन एक रूप वाचायला मिळाले... असेच लिहित जा!! निदान इतर मराठी लोकांची नाळ तरी जुळून राहील...

Unknown ने कहा…

सचिन,
प्रथम हे लेखन मी "कॉपी-पेस्ट" केले, मग निवांतपणे वाचले. तुम्ही ,मराठेशाहीची बखर लिहित नाहीय हे लक्षात आले. ती लिहितात समकालीन काळात. जसे यापूर्वीचे पवारसाहेबांच्या संदर्भात लिहिलेले पोस्ट.


तुमच्या या गोष्टीला कमालीचा वेग आहे. केवळ सातशे शब्दात तुम्ही कमालीचे चित्र निर्माण केले आहे. आभार. तरी मला वाटते तुम्ही अधिक पुढे जाऊ शकता:
१ अथपासून इतिपर्यंत हि गॊष्ट आजच्या लोकबोलीत लिहिता आली असती.

२. त्याने लोकबोलीचा पर्यायाने लॊकांचा गौरव झाला असता, आणि मराठी भाषा समृध्द झाली असती.
३. त्यामुळे "कॉपी-पेस्ट"- नक्कल इ. घोळ टळला असता.

४. ही कहाणीने लोककथेचा उच्चांक गाठला असता. (आणि मी याच्या झेरॉक्स काढून भेटेल त्याला अभिमानाने दिल्या असत्या.)
अजूनही प्रयत्न / प्रयॊग करायला हरकत नाही.


काही उतारे सोडले तर मी बखर साहित्य वाचलेले नाही. ते राजवाडे सारख्या विद्वानांचे काम. मी इतिहासाचे आज दिसणारे परिणाम पाहतॊ, व आजच्या काळाची बखर लिहितो.


नक्कल काय?

उदा. १: महाभारताच्या सर्व जगभर कोट्यवधी नकला झाल्या; अजूनही होत आहेत. मालवणात होणारी दशावतारी नाटके दर हंगामात याच्या नकला हमखास करतात, पण महाभारताचे कोण व किती लेखक होते यबध्दल पंडितांचे एकमत नाही.

उदा.२: मॅट्रिकच्या विद्यार्थ्यानी एकदा पं. भीमसेन जोशी याची मुलखत घेतली. त्यांच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना पंडितजी म्हणाले, "इतरांच्या चीजा मी ऐकतो. व त्याना आपल्याशा करून गातो."
अधिक लिहिणे नलगे.

रेमीच्या शुभेच्छा

साळसूद पाचोळा ने कहा…

माझी ब्लॉग शाळा.. धन्यवाद, मी आपल्या बॉगला भेट दिली, मी तिथे कोमेंट टाकत होतो, पन कोमेंटची विंडो येत नव्हति..

रेमीजी.

धन्यवाद,. आपले विचार, सुचना मला शिरसावंद आहेत, त्यांची आंमलबजावनी करण्याचा प्रयत्न करिलच मी.

एखादी, घटना, स्थळ, पुस्तक, कृती आवडली किंवा खटकली की मनाची आवर्तने नेहमी पेक्षा थोडशी वेगळी होतात,.. ब्लॉग मध्ये मनातिल उतरवले की ती पुर्वरत होतात.

Jay ने कहा…

अप्रतिम लिव्हलंयस गड्या..

रोहन... ने कहा…

अजून एक सांगतो ... मुकर्रबखानाचे मुळनाव 'शेख नजीब'. छत्रपति संभाजी राजांना पकडले आणि त्या मोहिमेवर 'मुकर्रब' केले म्हणुन ही पदवी त्याला औरंगजेबाने दिली. शेखनजीबचा मुकर्रबखान झाला.

Unknown ने कहा…

thank you
रांगड्या भाषेतील मराठीचे अजुन एक रूप वाचायला मिळाले... असेच लिहित जा!!
प्रत्यक्ष तो प्रसंग पहात आहोत असं वाटलं....नरड्याला कोरड पडली होती तरीही म्हातारा एकाही गनीमास राज्यांच्या जवळ फिरकू देत नव्हता... जीव गेला तरी बेहत्तर पण राजा वाचवायचाच या इर्षेने तो पेटला होता, अगदी बाजीप्रभू देशपांड्यांप्रमानं.."

subhash patil ने कहा…

mi kahi buluch shakat nahi apalyala jamal aste ka ho pan maran yav tar as

subhash patil ने कहा…

mi kahi buluch shakat nahi apalyala jamal aste ka ho pan maran yav tar as

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..