शिवाजीराव आढळराव, शरद पवार आणि शिरुर लोकसभा.

आजचा "शिरूर" (पूर्वीचा खेड) लोकसभा मतदारसंघ म्हणजे शहाजीराजे भोसले याना दक्षिणेचा अदिलशाही कडून मिळालेला पुणे-सुपा परगणा होय. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, भोसरी, शिरूर आणि हडपसर हे विधानसभा मतदार ह्याच्या अखत्यारीत येतात. ह्याच "जुन्नर प्रांती" महाराष्ट्राच्या महादेवाने, स्वराज्याच्या उषःकालाचा आरंभ करण्यासाठी १६३० ला अवतार घेतला होता......

ह्याच प्रांतात, दोन्ही काँग्रेसची परंपरागत मजबूत ताकद असतानाही, २००४ च्या लढाईत तो विक्रमी मताधिक्याने सेनेकडे खेचून आणण्याची किमया शिवाजी दादा आढळराव पाटलांनी वादळवाटेच्या झंझावाताप्रमाणेच केली.. हो झंझावातच म्हणावा लागेल याला.. जवळ फौजफाटा नसतानाही बजाजी बांदलाच्या हातून शिवरायांनी १६४४ साली रोहिडा जिंकून यशाची अजिंक्य मेढ जशी रोवली, तश्याच परिस्थितीत, "सेनाबळ" कमी असतानाही, आयुष्यातील पहिल्याच निवडणूकीत २००४ ला भगव्याची मुहूर्त मेढ खेड मध्ये रोवण्याचा पराक्रम आढळरावांनी करून दाखवला.... पुऱ्या आयुष्यातील पाहिलीच निवडणूक!!! तिही खासदारकीची?.....

"एकच वादा.... शिवाजीदादा" ची गर्जना करत जनता जनार्दनाने ह्या तोफेस गर्वाने खांद्यावर उचलून घेतले... आणि मग हि मुलूखमैदानी तोफ आढळपणे शिवनेरी वरून धडधडायला लागली... दिल्ली शिवनेरीच्या पल्ल्यात आली.!!! ग्रामीण प्रश्नांची बत्ती देत ह्या तोफेच्या जबड्यातून निघालेले तोफगोळे दिल्ली दरबारी पडू लागले... एक, दोन, तीन नव्हे तर.... तब्बल १२५१ तोफगोळे... १२५१ प्रश्न विचारून आढळरावांनी १४व्या लोकसभेचा उच्चांक केला... आणि अख्ख्या भारतवर्षातल्या साऱ्या खासदारांमध्ये दादा अव्वलस्थानी पोहचले...

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यत बंदी, ग्रामीण उद्योजकता, शेती व उत्पादन, गरीब निराधारांच पुनर्वसन, नदी जोड प्रकल्प, नदीच्या तळातील गाळ काढणे, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून केलेले कार्य, वाडी-वस्त्या पर्यंत पोहचण्याची पद्धत, गरजूंना अर्थसाहाय्य, खेड्यामध्येही शहरांच्या तोडीस तोड शिक्षणाची सुविधा, दुरध्वनी जोडणी, रस्ते, पाणी, पायाभूत सुविधा, अश्या कैक कामांची शृंखला चढत असतानाही दादा सामान्याच्या झोपडीतही डोकावायलाही कधी विसरले नाहीत, तेथूनच ते नागरिकांच्या हृदया पर्यंत अगदी अलगद हळुवार पोहचले....... शिवसेनेला त्यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रासाठी भक्कम पर्याय मिळाला....
२००९च्या उमेदवारीचा अश्वमेध आढळरावांनी केव्हाचं "शिरूर" मतदारसंघात सोडलाय,.. पण तो पकडण्या, थांबविण्या, आणि दादा विरुद्ध लढण्या कुणी हि धजवत नाही, कैक जनांना राष्टवादीने पुढे केले,... पण मतदारांची चाचणी, सर्व्हे केल्यानंतर साऱ्यांनी माघार घेतली...... कुणीच दादां विरुद्ध उभे राहण्यास धजवेना... उमेदवारच सापडेना?.. दबाव टाकून दादांना राष्ट्रवादी कडे खेचण्याचा डावही फोल ठरला.... शेवटी "आता एकच माणूस आढळरावांच्या विरोधात उभा राहू शकतो........ पवारसाहेबच!!... होय खाशा शरदराव पवार" असा सुर विरोधकांत निघू लागला..... आणि तो अगदी संयुक्तिकही होता... करणं " स्थानिक राजकीय दिवाळखोरी"

आपला मतदारसंघ पोरीला वारसाहक्काप्रमाणे "आंदण" दिल्यामुळे त्यांना "दुसरीकडे" घुसखोरी करावी लागणारच होती.... त्यासाठी त्यांनीही मोर्चा "शिरूर" कडे वळविण्यास तयारी दाखविली.... पण पवारसाहेब असो किंवा कुणीही असो,... घरचा उमेदवार आणि लादलेला उमेदवार हा फरक असतोच ना? समाजमनाचा विश्वास, जिव्हाळा, आदर, आधार, आशा आणि अभिमान जिंकलेल्या आढळरावांविरुद्ध लढताना पवारांनाही आपले पाय "शिरूर" मध्येच घट्ट रोवून ठेवावे लागतील.... "
महाराष्ट्रात इतरत्र त्यांना प्रचारासाठी फिरणे अवघड होईल...... आणि म्हणूनच आढळराव विरुद्ध पवार अशी लढाई झालीच तर आढळरावांचं जितकं नुकसान होईल त्यांपेक्षा जास्त नुकसान पवारांच्या राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात इतरत्र होईल... हे पवार साहेब जाणतंच असतील..... १६८०-१६८९ पर्यंत धर्मवीर संभाजीराजांनी औरंग्याला सतत ९ वर्षे एकट्या दख्खन मध्ये झुंजत ठेवले. त्याला इतरत्र ध्यान देण्यास वेळच मिळाला नाही, परिणामातः तिकडे उत्तरेत, पंजाब, राजस्थान, काश्मीर मध्ये त्याच्या हातून सत्ता गेली.... पवार इथेच शिरूर मध्ये अडकले तर राष्ट्रवादीचे इतरत्र काय होईल ?.... आणि कदाचित म्हणूनच, पवार साहेब हे बोलत नसले तरी शिरूर ऐवजी राजकीय दृष्ट्या जास्त सुरक्षित अश्या माढ्यात जाणे त्यांनी गुपचुप पसंत केले असावे. हाच आढळरावांच्या वर्चस्वाचा विजय आहे असे म्हटले पाहिजे... पवारांनी स्वतःसाठी शिरूर ची चाचपणीही केली, ३-४ सभाही केल्या, अंदाज घेतला आणि माढा मतदारसंघ स्वतःसाठी योग्य समजला... सेना-राष्ट्रवादी युती, पवार-उद्धव भेट हा सारा घटनाक्रम होत असताना, चार महिने हि राजकीय कुरघोडीची धूळवड चालू असतानाही आढळराव न डगमगता "राज्यसभा नाही, विधानसभाही नाही, मावळ मधूनही नाही, मी लढणार ति फक्त लोकसभाच, आणि तिही शिरूर मधूनच!!!" असे म्हणतं आढळ भूमिकेत राहिले.. परिणामातः आपसूकच हा सारा मतदारसंघ उमेदवाराऐवजी "मतदारानेच" ताब्यात घेऊन टाकला आहे. १५ व्या लोकसभेचा शिरूरचा खासदार कोण हे आपसूकच आणि अलिखितपणे ठरले आहे..

शिवाजीरावांच्या प्रचाराच्या फेऱ्या एव्हाना पूर्णं हि झाल्या असतील, अजून समोरचा उमेदवार ठरणे बाकीच आहे. उद्या कदाचित विलास लांडे, प्रकाश म्हस्के, पोपटराव गावडे किंवा दिलीप वळसे पाटीलही रणांगणात असतील,.. पण जो शिवाजीराव, पवारासारख्या मातब्बराशी लढायला डगमगत नव्हता, त्याच्या हिंमतीच एक बुरूज तरी यांना फोडता येईल काय हे विचार करायला लावणारे आहे?


सचिन, नारायणगाव, पुणे. २६/२/२००९
चित्रे - गुगल इमेजेस आणि विकिमेडिया. ओराजी मधून साभार.

2 प्रतिक्रया:

बाल-सलोनी ने कहा…

sachin

khupach chaan maahiti kaLalee aadhalravaan baddal.
keep it up!

HAREKRISHNAJI ने कहा…

I remembered you and your post on election result day.

Congrats

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..