नवा शिवधर्म शक्य आहे का?

कुठल्याही धर्माच्या निर्मितीसाठी जे वैचारिक अधिष्ठान, भक्कम पाया असायला हवा तो इथे कुठेच नाही. इतर धर्मातून आयात केलेले विचार, एका धर्माच्या द्वेषापोटी दुसरा धर्म अस्या विचारांची रसमिसाळ करून धर्म स्थापला जाऊ शकतो पण तो रुजवला जाऊ शकत नाही.


धर्मनिर्मीती/स्थापना हि संकल्पनाच पुरातन आणि संक्रमणशील आहे, धर्मनिर्मितीची कल्पना जेव्हा हजारो वर्षापूर्वी धर्माच अस्तित्व नव्हतं तेव्हाच गरजेपोटी उत्पन्न झाली होती, तो काळ त्यास पूरक होता. आजचा काळ "धर्म निर्मिती" स पूरक तर नाहीच, शिवाय नवीन कुठलासा धर्म निर्माण केल्या शिवाय आपण जगूच शकणार नाही असे धर्माचे अवडंबर आज गरजेचेही नाही. धर्मविचार, धर्मसंस्कृति हळू हळू मागे पडत आहे, नावापुरता फक्त धर्माभिमान तेवढा शिल्लक आहे.

धर्म स्थापणे हि पुरातन आणि अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणूनच हि मंडळी "शिवधर्म स्थापणा" न म्हणता मुद्दामहून "शिवधर्म प्रकटणं" असे संबोधतात, म्हंजे हाही धर्म पुरातनच आहे, तो फक्त पुन्हा प्रकट होतो आहे असा भ्रम देऊ पाहत आहेत. कारण पुरातन असल्याशिवाय धर्मांबद्दल ओढ, आपुलकी निर्माण होणे सहज शक्य नाही.

धर्मांतर, धर्मनिर्मीती किंवा तत्सम प्रकटीकरणात जितकी ऊर्जा वाया जाईल ति ऊर्जा आहे ति धर्म सुधारण्यात खर्ची घातली तर उपयुक्त ठरले. पण तसे केले जात नाही करणं त्या मागे काही "धार्मिक आणि राजकीय गणिते" नक्की जुळविलेली आहेत.

शिवधर्माने मांडलेल्या तत्त्वांचा लेखाजोखा करायचा म्हटला तरी त्यात कैक न पटणारे विचार आढळतात. शिवधर्माचे जे स्वताचे पुरोगामी विचार आहेत ते या जागतिक उदारीकरणाच्या या जगात ते पुरातनच वाटताहेत.

शिवधर्माची घोषणा होवून आठ वर्षे तरी नक्की झाली असतील, दरवर्षी लाखो लोक धर्मात येताहेत असे भासवले जात होते. आज किती जन या धर्माचे अनुयायी झाले आहेत हे कळेल काय?




साळसूद पाचोळा.

वैदिक यज्ञबळी

महाराजा बळी ने यज्ञ केले होते, म्हंजे तोही वैदिकच होता. इतर असुरांप्रमाणे तोही शिवाचा उपासकच होता. आता महाराजा असलेल्या बळीला यज्ञ बळजबरीने "करायला" लावले हे म्हणणे कितीसे पटू शकते....वैदिक लोकांनी सांगितले आणि पटत नसतानाही बळिराजेने ते एकले असे म्हणायचे आहे काय? महाराजा पेक्षा त्याकाळचे वैदिक उपासक मोठे होते काय?.


आणि हो, यज्ञात प्राण्यांची आहुती द्या, असे नसून आपण जे काही अन्न म्हणून भक्षण करतो त्यातला काही भाग देवासही द्या हि संकल्पना आहे ति.
रानटी अवस्थेत राहणाऱ्या समाजाचे सिव्हिलायझेशन करण्याची ती प्रक्रिया होती. नरभक्षण करणाऱ्या समाजाला हळूहळू वनस्पती भक्षणाकडे आणण्याची ति प्रक्रिया होती. जेव्हा एक मानव दुसऱ्या मानवाचे भक्षण करितं होता, तेव्हा तुम्ही त्याला जाऊन "आज पासून माणसे खायचे सोडून वनस्पती खा" असे एकदम म्हणाल तर तो ऐकेल काय?

नरभक्षणाकडुन प्राणी भक्षणाकडे, त्यातही नंतर ठराविक प्राणी खाऊ नका, त्याहिपुढे जाऊन मग ठराविक काळात मांस खावु नका, आणि नंतर वनस्पती खा असे हे रानटी अवस्थेतून नागरीकरणाकडे आणण्याची प्रकिया फार विचारपूर्वक वैदिक ऋषींनी राबविली होती. (ज्या प्राण्यांची संख्या कमी होती, जे उपयुक्त आहेत ते न खाण्यास सांगितले आहे. ज्या विषव्रुत्तिय प्रदेशात हरणे जास्त होती, वनस्पतीसही जी नुकसानकारक होती ती खावीत, त्यांचीच मृगया (शिकार) ) करा. (शिकार करणे, यातही मृग = हरिण, या = जाणे, घालविणे, असेच आहे). ह्यात ज्या हरणाची काहीही चूक नसतानाही मृगया केली जायची, इतर प्राण्यांचा जीव वाचावा म्हणून हा कठोर निर्णयही त्यावेळी फार विचारपूर्वक घेण्यात आला.. त्या हरणांची क्षमाही मागितली जाते, यज्ञाच्या वेळी हरणाच्या कातड्यावर बसून यज्ञ केला जायचा की ज्या मागे हि भावना होती की ह्या यज्ञाचे पुण्य त्याच्या मृतात्म्यासही मिळो. हवन म्हणून नरबळी, प्राणी बळी सोडून आज यज्ञात तीळ, जवस, गहू, इ. वाहिले जाते हे पाहवे... थोडक्यात काय तर जे तुम्ही भक्षण कराल तेच देवासहि अग्नीमार्फत अर्पण करा हेच जे सांगितले होते ते चूक नव्हतेच, हे ध्यानी घ्यावे.

बाकी , चंद्रावर तेच गेले, मंगळावर तेच गेले, इंग्रजांशी संधान त्यांनीच बांधले, तेच शिकले, तेच पुढे गेले, त्यांनी क्षत्रिय राजांना मांडलिक बनविले, त्यांनीच मुसलमानांची भीती घातली हे सगळे आरोप आजतरी १००% निरर्थक आहेत... आणि ह्या आरोपाने काहीही रचनात्मक बदल होणार नाही हे आपणही खास जाणता... तरीही हेच मुद्दे वारंवार का मांडले जातात हेच मला समजत नाही.

कासची ट्रीप

ह्या शनिवार, रविवारी कासचं पठार, सज्जनगड, ठोसेघर, वाई, पाचगणी आणि मेणवली अशी दोन दिवसांची मस्त सुट्टी मारून आलो. सुजीत, कमळ्या, विशाल, आम्या आणि मी सगळे सोमवारी F5 (रिफ्रेश) झालेलो होतो.

[कासचे जागतिक किर्तीचे पठार]
सुज्याची इंडिगो होती, आणि सगळं मार्गक्रमणही त्यानेच केलं. पण त्याचं ड्रायव्हिंग प्रचंड जोरात आणि बेभरंवशाचं असल्याने मी जरा सावधच होतो. मिळेल तेव्हा मिळेल तस्सं आम्ही सुज्याला त्याच्या ड्रायव्हिंग वरून ठोकतच होतो. मी तर त्याला नुसते  उपदेशाचे कडक ढोस  पाजत होतो, ते त्याचं ड्रायव्हिंग सुधारावं म्हणून नव्हे तर आम्हाला त्यानं पुण्यापर्यंत पोहचवावं, सुखरूप. म्हणून.

पहिला मुक्काम साताऱ्याला विशालच्या घरीच होता.  सुज्या महंजे सपक भाज्या चघळणारा कोकणी. विशालच्या आईनं केलेल्या वांग्याच्या भाजीने त्याच्या कानातून धूरच काढला. "आम्ही सातारकर" हा काय तिखट प्रकार असतो तो त्या बेट्याला आणि आम्हालाही पहिल्याच झटक्यात तिथेच कळला. पण सुज्याची प्रचंड मदत झाली या ट्रीप मध्ये... म्हंजे तो आमचा ड्रायव्हर तर होताच शिवाय गाडीही त्याचीच होती, शिवाय आम्ही सगळॅ संपूर्ण प्रवासात त्याचाच शाब्दिक घाम काढण्याची संधी सोडत नव्हतो. आणि तरीही तो हे सगळं हसण्यातच विलीन करीत होता. असो, कास म्हंजे भन्नाट च आहे. कैक प्रकारच्या फूट भर उंच वाढणाऱ्या, रानटी तरीही नाजुक फुलंच लांबलचक पठार. ३०-३५ प्रकारची फुल त्यावेळी तिथं असावीत.  जाताना दुर्बीण घेऊन जा.  रस्त्याच्या दुतर्फा फक्त फुलंच फुलं.... आणि जिकडे पाहवे तिकडे नुसते कैमेरेच कैमेरे. अगदी दुकानात पाहिले नसतील इतक्या प्रकारचे कैमेरे पाहायला मिळतील ते फक्त कासलाच. निसर्ग फोटोग्राफिला तात्पुरते का होईना पण प्रचंड "उधाण" आलेलं आहे हे मला तिथं कळलं... निसर्ग चित्रणाचा अगदी सुळसुळाट झाला होता.

सुजीत आणि विशालही याच्यातही तोच "सुळसुळाट" संचारला होता. मिळेल ते फुलं ते कैमेऱ्यात टिपत होते...

[विशालची छुपी फोटोग्राफी]
विशल्या... फुलं पाहायला आलेली "फुलं" चोरून टिपण्यात अगदी माहिर. म्हजे तो त्याचा चळच.  स्वतःच्या फ्लैट मधून समोरची अंटी कैक प्रकारे त्याने कैमेऱ्यात टिपलेली होती. असो, कास हे ठिकाणही सुचविण्याचं डोकं मात्र त्याचंच. अर्थात त्या निमित्ताने त्याला साताऱ्याला त्याच्या घरीही जाता येणार होतेच. (एकाच दगडात दोन पक्षी) तो रानफुलांचे फोटो कैमेऱ्यात बंदिस्थ करण्यात बेभान झाला होता. शेवटी जेव्हा त्याचा कैमेरा जड झाला तेव्हा फोटो सेशन थांबले आणि गाडी कासच्या तलावाकडे ढाळा-ढाळाने निघाली....  तलावावरून माघारी सज्जनगड गाठला.

वडापाव आणि ताकाचा एक एक ग्लास रितवून सज्जनगड सर केला. समर्थांच्या वापरातील वस्तू आणि समाधीचं दर्शन घेतलं. समाधीपुढं शांत बसलो तोच सुजितं आणि कमळ्याने प्रसादालयाकडे नजर फिरवून,  प्रसादाच्या नावाखाली जेवणाचा कार्यक्रम (फुकटात) उरकायचा हे ठरवून टाकले.

[ठोसेघर]
कमळ्या...फिरायची याला लै हौस, नुसता खादाड माणूस. गर्दीमुळे प्रसादालयात जेवण मिळाले नाही. तर म्हणे "तिकडे भक्त निवास दिसतो आहे तिकडे जाऊ यात... मिळेल तिथे" शेवटी गड उतरणीला लागण्यापूर्वी हॉटेलात घुसवून त्याची पेटपुजा करवून घेतली. ठोसेघरलाही प्रत्येकी २ उकडलेली अंडी मागविली होती, त्यातीलही माझ्या वाटणीच्या एका अंड्यावरही ह्याच हरामीने गुपचुप ताव मारलेला होता. शेवटापेर्यंत ह्यानं गाडीतील किन्नरची जागा काही सोडली नाही. हा नुसताच मजा करायला आला होता. ठोसेघरचे दोन उंच धबधबे  आकर्षक आहेत पण त्याच्या जवळ जाता येत नाही हि खंतही आहेच. सुज्या आणि आंम्या वर अतिबाका प्रसंग आल्यांमुळे ते मागेच थांबून "तुळस लावण्यासाठी" जागा शोधत होते. शेवटी लेडिज संडासात जावून हे बहाद्दरांनी पोट रिते केले.

[ट्रिपचे मेंबर]
अम्या... नुसता सलमानच्या स्टाइलने स्वतःचे फोटो काढून घेण्यावर त्याचा भर.  त्याच्या सगळ्या पोझ सलमानसारख्याच.  पाचगणीला ह्याचा मामा असतो, सलमानच्या दबंग च्या शूटिंगचे लोकेशन दाखविण्याचं काम त्यांनी केलं. आम्हीही कुठल्याश्या मालिकेच्या शुटिंग्ची आणि त्यांतील नट्या पाहण्याची मजा घेतली. मुंबईचा असलेल्या आम्याचा भामटेपणा कामी आला आणि "शूटिंगसाठी आलोय" असं खोटंच सांगून पावती न फाडता,   टेबल पांईट पाहायला मिळाला. वाईत मुक्काम केला.  आमितच्या मामाचा गाव आणि बगाड, आणि आमितच्या जुन्या सामानाचं (मैत्रिणीच) घरही पाहायला मिळालं. क्रुष्णामाई मधील ढोल्या गणपतीचे दर्शन घेतले. (तो गणपती सुज्या आणि कमळ्या पेक्षाही जास्त ढोल्या आहे. ) कृष्णामाई इथे बिलकुल संथ वाहत नव्हती.  पुढे नाना फडणविसांचा मेणवलीतिल वाडा गाठला.  ह्या आम्याला इतिहासातील काही कळत नाही असा माझा पक्का समज झाला आहे. एतिहाशिक वास्तू, चर्चा यांच्या बाबतीत तो न्युट्रल आहे.  म्हंजे "तुमचं चालू द्या, मी ऐकतो" ह्या प्रकारातला... तर सुज्या आणि कमळ्या निगेटिव्ह आहेत, म्हंजे "चला, बास करा, निघू" ह्या प्रकारातील.

वाईच्या जवळच १७८० चा फडणविसांचा वाडा आहे. दुरवस्थेत आहे पण नक्की पाहवा असा आहे. वाड्यामागून क्रुष्णामाई वाहते त्या घाटावर स्वदेशचं शूटिंग झालेलं आहे.

मी, त्यातल्या त्यात ह्यांच्यात एकमेव समजूतदार आणि जबाबदार आणि विश्वासपात्र होतो, म्हणून हिशेब आणि कॉंट्री माझ्या कडे होती.

गणी गण गणात बोते बाते - अर्थ

दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ह्या चरित्रग्रंथात त्या अभंगाचा अर्थ दिला आहे...

त्या सूत्रमय भजनाचा। अर्थ ऐसा वाटतो साचा।
गणी या शब्दाचा। अर्थ, मोजी हाच असे।।
जीवात्मा म्हणजे गण। तो ब्रह्माहून नाही भिन्न।
हे सुचवावया कारण। गणात हा शब्द असे।।
बोते हा शब्द देखा। अपभ्रंश वाटे निका।
बाते हा शब्द ऐका। तेथे असावा नि:संशय।।
बा या शब्दे करून। घेतले पाहिजे मन।
ते हे आहे सर्वनाम। गण शब्दाऐवजी आलेले।।
म्हणजे मना दिसे नित्य। जीव हा ब्रह्मास सत्य।

यात स्पष्ट अर्थ दिला आहेच... मुळातच हे एक सूत्रमय भजन आहे असे दासगणू महाराज म्हणताहेत हे ध्यानी घ्यावे, ते शब्द एकमेकांशी सूत्राप्रमाणे संबंधित आहे...
.
तरीही यापुढे जाऊन पटवून द्यायचे झाले तर ....
.
गण शब्दाचा सरळ अर्थ म्हंजे लोक, (त्या अर्थानेच गणराज्य= लोकांचे राज्य, गननायक- लोकांचा नायक, देवगण = देवलोक, वृषीगण = वृषिलोक) गण म्हंजे लोक हा अगदीच तांत्रिक अर्थ झाला.

आता थोडासा आध्यात्मिक दृष्टीने पाहताना, गण किंवा लोक म्हंजेच जीवात्मा. (जीवात्मा म्हंजे फक्त माणूस असा संकुचित अर्थ नव्हे तर सृष्टीतील सगळे चैतन्य असलेले प्राणी असे सूत्र/अर्थ आहे)

गुरुवर्य टागोरांच्या "जण गण मन अधिनायक... " चा अर्थ ही "लोकांवर, आत्मावर, मनावर राज्य करणारा... " असाच आहे.

ऋग्वेदामधील सूक्तांमध्ये गणपतीचे वर्णन करताना म्ह्नटले आहे..
'ओम गणानां त्वां गणपती हवामहे।'
तो गणांचा पती आहे, त्यांना मार्ग दाखवणारा नेता आहे. गणपती हा गणांचा (लोकांचा, जीवात्म्यांचा) अधिपती मानला जातो.

त्याअर्थी गण म्हंजे जीवात्मा असाच अर्थ इथे अभिप्रेत आहे..

गणांत म्हंजे गण+आत असा साधा अर्थ आहे. जो जीवात्म्यांच्या आत असतो, जीवात्म्यांशी एकरूप असतो तो परमात्मा. म्हंजेच ब्रह्म असा "गणांत" शब्दाचा अर्थ निघतो.

सत्य आणि स्वप्न !!

सत्याची, वास्तवाची जाणीव बुद्धी वारंवार आपल्याला करून देत असतेच तरीही मन मात्र देहमान विसरून स्वप्नांच्या भराऱ्या मारण्यात दंग असते.


"मन एवढं, एवढं..... आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात" मनानं आपला "मुक्तपणा आणि आवाका" अधोरेखित करण्यासाठी मुद्दामहून म्हटलं. अल्लड मनाची हि टिका वैचारिक,परिपक्व बुद्धीला कळायची, पण त्याचवेळी तिला मनाच्या स्वप्नद्रुष्टीचं, कल्पनाविलासाचं कौतुकही वाटायचं. म्हणून बुद्धी संयम राखत शांतच राहायची. पण बुद्धीचं अपत्य असलेल्या कडू सत्याला ते टोचलं. सत्याने लगेच तोफ डागली..... " हो... हो, आभाळात सहज जाता पण पाय भुईवर नसतात त्याचे काय? " सत्य कडू असतं हे पुन्हा मनाला पटलं.

" अरे आम्ही तर पृथ्वीवर राहून स्वर्गातही फेरफटका मारून येऊ शकतो" आता मनाची कड घ्यायला स्वप्न कुठसं जागं झालं.

"हो स्वर्गात फिरायला सगळे उत्साही असतात हो!.... पण मरायला कोनीच तयार नसतो त्याचे काय?" सत्याने स्वप्नाला अजून एक वास्तववादी टोला हाणला.

"मी म्हणतो, जर क्षितिजाच्या पलीकडे पाहण्याचं स्वप्न आणि दृष्टी असेल तरच क्षितिज गाठता येऊ शकते,... हे निर्वादित सत्य आहे" स्वप्नाने ताकद दाखविली.

"अरे पण क्षितिजाला अंत नसतो,... म्हणून आपलं क्षितिज आपणच ठरवायचं असतं, आप आपल्या ताकदीप्रमानं..... " सत्याचा सल्ला. स्वप्नाजवळ असलेल्या कल्पनाशक्तीची वास्तवाशी सांगड घातली की यश हमखास ह्याची सत्याला जाण होती.
"स्वप्न म्हणजे सुखद वाऱ्याची झुळुक, अंगावरून गेली की अमाप सुख देऊन जाते. स्वप्नाविना जीवन भकास, ऑक्शिजन वींना जळणारी काडी विझते तसं स्वप्नांविना जीवन विझून जाते" स्वप्नानं आपलं महत्त्व गायलं. सत्याला ते जरासं पटलं पण त्यानं आपला हेका न सोडता म्हटलं. " पण स्वप्न जर साकार झालं नाही तर त्याचा सारखा वैरी नाही, मग ते तुम्हाला उध्वस्थ करते. वास्तवहीन स्वप्न पाहिलेली कैक जन उध्वस्थ झालेत ना" हळूहळू चर्चा रचनात्मक होवू लागली होती.
"डोनाल्ड कर्टिस म्हणाले होते We are what and where we are because we have first dreamed it. स्वप्न पाहणे किती महत्त्वाचे आहे बघ? " स्वप्नाने आपली बाजू पुन्हा लावून धरली
.
"स्वप्न तर आपण झोपेतही पाहतो, क्षणोक्षणी, पदोपदी पाहतो, पण असली स्वप्ने नंतर आठवतही नाहीत. स्वप्न म्हणजे जे आपण झोपेत पाहतो ते नव्हे तर जे आपण जागेपणी पाहतो आणि जे आपली झोप उडविते ते, "जागेपणी" म्हंजे फक्त डोळे उघडलेले असे नाही तर आपला आवाका, आर्थिक आणि शारीरिक ताकद, ते साकारण्यासाठी हवी असलेली वास्तववादी बुद्धी यांची पुरती कल्पना असणे होय" सत्याने त्याचे तत्त्वज्ञान मांडले. स्वप्नाला हळू हळू वास्तवाची जाण ठेवण्याचं महत्त्व पटू लागले.

"स्वराज्याचं स्वप्न शिवरायांनीही पाहिलं, पण ते साकारताना त्यांनी सदैव वास्तवाचं भान ठेवले होते. मुघल, आदिल यांच्या घासालाही आपण पुरणार नाहीत हे वास्तव स्वराज्याच्या स्वप्ना बरोबरच त्यांनी सदैव ध्यानी ठेवले होते. कधी माघार, कधी तह, तर कधी आक्रमण करत त्यांनी स्वप्न साकार केलेच.... श्वासात भिनलेलं स्वप्न ठेचा लागल्यानं वाऱ्यावर सोडून दिलं नाही.. स्वप्नाच स्थित्यंतर ध्येयात व्हायला पाहिजे. " सत्यानं स्वप्नाला दाखला दिला.

दोघांनाही एकमेका सोबत गेल्याशिवाय यश मिळणार नाही याची खात्री झाली.

" भान ठेवून स्वप्न, ध्येय ठरवायचे आणि बेभान होवून त्याची अंमलबजावणी करायची... "स्वप्नाने अनुमोदन दिले.

मराठ्यांचा शेवटचा सरलष्कर

"आबा, गाठू ना आपण शिरकान येळेवर?"
"आरं?, निस्त पोचून काय कामाचं? येळ आली तर शीर काटून ठिवाया लागय, शिवाजीऱ्हाज्याचा अंकुर जपाया!"
मराठी दोलत डुबवू पाहणाऱ्या त्या भयाण काळरात्री तो म्हातारा आपल्या दोन बांड्या पोरांसह जीवाच्या आकांतानं दौडत होता... पन्हाळ्यावरून.. संगमेश्वराकडे.... घाट-पांदीतून... गचपानातून...., कारण त्यांच्याही पुढे औरंग्याचा मुकर्रबखान सावज टिपायला उरफोडीनं दौडत होता...
मध्यरात्र उलटली नसेल तोच सपासप शांतता भेदीत दोन घोडाइत सरदेसायांच्या वाड्यात घुसले...खबर ऐकून कनोजाचा थरकाप उडाला... कसेबसे सावरीत ते सुखदालनाकडे झेपावले... महाराजांना जागे केले.

"को S ण ?"

"वकुत न्हाई..  घोडा फेकत एक फौज रानांतनं दौड घेतिया.. धन्यांनी खिन्नभर देरी न करता ह्याच वक्तीला संगमेश्वर सोडावं" - "इथल्या पांगपरास दौडीत लैई घोडा हाय.. तड न्हाई लागाय्ची" भेदरलेले खबरे एकापाठोपाठ बोलते झाले.

"शिर्क्यांची, शिर्क्यांची माणसं असतील ती, गनीमाची काय बिशाद ह्या गचपानात घुसायची? " महाराज जराश्या गाफीलपणानं बोलले....काळोखातल्या गाफीलपणाचा अंदाज त्यांना नीटसा आलाच नव्हता, अरेरे... चुटपुटत खबरे बाहेर पडले.
.
कोंबडं आरवायच्या आत,... अन दैव बलवत्तर म्हणून मुकर्रबखानाच्याही काही घटका अगोदर, आडवाटेनं जीवाची पर्वा न करता म्हातारा संमेश्वराच्या वेशीत शिबंदीसह घुसला... वायू वेगाने संगमेश्वराला घेर टाकत पांगणाऱ्या शिबंदीतून नरड्याच्या घाटा फुटून थरकाप उडविणाऱ्या कैक किलकिल्या उडाल्या.... " हाS र हाS र म्हादेव!!! ".... अन.. त्या विरायच्या आत... आली... घुसली...बेभान, बेलाग, शिवपुत्राच्या रक्तासाठी पिछाडलेली गनीमांची फौज धुरळा उडवीत वेशीच्या आत घुसली. "धीS न धीS न" आरोळ्या, कालवा, टापां साऱ्यांचा चिखल झाला...

भयकातर झालेले कुलेश, राया, अंता छत्रपतींना गदगदा हालवत किंचाळले "घात झाला... इळभर थांबू नगासा, घात झालाया.. हत्यार घ्या नि भाईर पडा... निघा.. निघा"

गर्रकन वळत.. म्यानातील तलवार सर्रकन उपसत.. म्यान तिथंच फेकून देत... त्याच हातात शंभुराजे ढाल तोलते झाले. " चला, भाईर व्हा, गाव येरगटलाय गनीमानं". राया, अंता, कुलेश, अर्जोजी, महाराज एकाच आवेगानं वाड्या बाहेर पडले... घोडी धरलेले मोतदार जीव डोळ्यात आणून टकमका दरवाज्याकडेच पाहत होते.. मराठ्यांचा राजा बाहेर काढण्यासाठी... वाचविण्यासाठी.

 पण एव्हाना म्हाताऱ्याची फळी फोडून दहा-पंधरा हसम आत घुसले होते... पाठोपाठ पिसाळलेला इखलासखानही पिछाडीला शे-पाचशे हशम घेऊन महाराजाच्या अंगावर धडकला..
.पण म्हाताऱ्याचा सारा "जीव" महाराजांत अडकल्याने, जिवाची अन गनीमांच्या वारांची दोघांचीही पर्वा न करता म्हातारा संताजी-बहिर्जीसह पुढे झेपावलाच.... इखलासखानाला ते मोठ्या जिकरिने दरवाज्यापासीच आडवे आले...... झालं, टापा, आरोळ्या, खणाखणाट करत.. दरवाज्यावरच कुरुक्षेत्र पेटलं!

संभाजीराजांनी कसाबसा चंद्रावत माडांखाली घेतला.. लागलीच म्हाताऱ्याने स्वतःचा घोडा धन्यापासी नेला... भिंगरी सारखा तो धन्याभोवती फिरवत... वार झेलत.. वार करत.. म्हातारा ओरडत होता.. "धनी...धनी..भांगा काढा धनी.. नावडी.. व्हडक्यात बसून निघा.. जीवाची बाजी लावू आमी".. म्हाताऱ्याच्या मुखातून मराठी दोलत अक्षरशः आक्रोशत होती..

हातचे हत्यार सपासप फिरवत संभाजीराजे भांगा मिळेल तसा चंद्रावत घुसवत होते.

"म्हातारा, संताजी, बहिर्जी, कुलेश, अर्जोजी असे जानकुर्बान मराठे वादळातून दिवली जपून न्यावी तसे शिवाजीऱ्हाज्याच्या अंकुराला, शिवपुत्राला, मराठ्यांच्या राजाला नेण्याची पराकाष्टा करत होते. पाठीवरून घामाच्या धारा फुटल्या होत्या, नरड्याला कोरड पडली होती तरीही म्हातारा एकाही गनीमास राज्यांच्या जवळ फिरकू देत नव्हता... जीव गेला तरी बेहत्तर पण राजा वाचवायचाच या इर्षेने तो पेटला होता, अगदी बाजीप्रभू देशपांड्यांप्रमानं.."
काफरांच्या राज्याच्या अंगलटी भिडण्याच्या आड हा थेरडा येतो आहे हे हेरलेला इखलास म्हाताऱ्याकडे बोट दाखवत खाटिकाप्रमाने किंचाळला "घेर डालो, बुढ्ढेको.. घ्रेर डालो". ....आणि महाराजांची कड धरून असलेल्या म्हाताऱ्याला चवताळलेल्या हशमांनी लागलीच घेरून टाकलं... महाराजांच्या फळीपासून त्याला तोडून एकटं केलं जाऊ लागले... तरीही अजूनही हत्यार अन बुढी बोली कडकडत होती " धनी, नावडी, व्हडकी"...

पण आता?.... म्हाताऱ्याच्या अंगावर जागाच नव्हती जखम झेलायला..
आणि झालाच.. ...
शेवटचा हाशमी वार.. . जाड पात्याच्या हाशमी तेगीचा...
म्हाताऱ्याच्या छाताडावर.. !!!!

म्हातारा जनावरावरून खाली कोसळला... धाडकन.
दोलतिचा पाचवा मर्दांना सरलष्कर कोसळला.... ...."म्हलोजी घोरपडे" कोसळला.

.


साळसूद पाचोळा.
आधार- "छावा- शिवाजी सावंत"

"किंमत मोजावी लागेल"- सुप्रियाताई पवार.

काही प्रश्न विचारायचे राहिले म्हणून नवीन पोस्ट...


लवासासाठी आपण बेमालूम पाने जंगलाची कत्तल करता आहात त्याची किंमत केव्हा चुकवणार?

अनेक औषधी वनस्पती काटून आम्हाला विनाशाकडे ढकलता आहात त्याची किंमत केव्हा चुकवणार?

जंगले समूळ उद्ध्वस्त करून आणि डोंगरमाथे व उतार यावर बुल्डोझर फिरवून पाणलोटक्षेत्राचा विध्वंस केल्याची किंमत कोण चुकवणार?

पर्यावरण विषयक, प्रदूषण विषयक, आदिवासी जमीन हक्क, कमाल शेतजमीन धारणाविषयक सारे कायदे धाब्यावर बसवून, शासनाच्या जमिनी सवलतीच्या दरात घेऊन, सार्वजनिक धरणक्षेत्रात हस्तक्षेप करण्याची परवानगी घेऊन, कोटय़वधीच्या मुद्रक शुल्काच्या सवलती घेऊन लवासा लेकसिटी बांधली जात आहे...बिनदिक्कतपणे ती योजना पुढे रेटली जात आहे. हे कसे घडू शकते आणि ....त्याची किंमत किती आणि कोन चुकवणार?

"किंमत मोजावी लागेल"- सुप्रियाताई पवार.

आता खऱ्या अर्थाने ताई शरद पवारांच्या कन्या आणि बारामतीकर वाटू लागल्या. बारामतीकर दुसऱ्यांना संपविण्यासाठीच आहेत. फक्त पवारांनी न धमकावता, न बोलता अगदी नियोजनबद्ध कारस्थाने रचत विरोधक आणि स्वकीयांना देखिल न चुकता "किंमत" चुकवायला लावली. ताईंकडे तो छुपागूण काही दिसत नाही.
"आ. शिवतारे हे ताई सारखे जन्मताच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले नाहीत, हे खरे असले तरी शिवतारे बापूंनाही लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिलेले आहे हेही ताई कदाचित विसरलेल्या नसतील पण आपण पवार साहेबांच्या कन्या आहोत, आणि आपण काहीही बोलू/करू शकतो हा अहंभाव त्याच्यात आहे हे मात्र नक्की झाले. "
लवासा आणि तत्सम कैक प्रकरणे जर त्या दाबू शकतात तर शिवतारे सारखा सामान्य आमदार दाबायला कितीसा काल असा काहीसा भ्रम ताईंचा झाला तर नसेल ना? मुळातच शिवतारे राजकारणात पैसा कमावण्यासाठी आलेले नाहीत हे ताईंनी लक्षात घेतले नाही. त्यांच्या कडे पवारांपेक्षा कमी पैसा आहे, तसे असूनही पेश्यासाठी राजकारण करणार नाही हे ते निक्षून सांगताहेत, तसे वागताहेत देखिल. मुळातच त्यांना "पुरंदरचा बुलंद" आवाज बनायचे आहे हे पैसा आणि सत्ता मिळविण्यात मशगुल झालेल्यांना कळलेलं दिसत नाहीये. आणि म्हणूनच ते त्याच तडफिणे पुरंदरचे प्रश्न मांडताहेत. पुरंदर म्हंजे पुणे महानगर पालिकेचा कचरा डेपो नाही, त्यांनी उचलेल्या या भूमिकेला तेथील खासदार म्ह्ननून आपणही आधार देऊन "लोकप्रतिनिधी" पदाची आब राखायला हवी होती. ते का केले नाही याचे स्पष्टीकरण देणे आपण का टाळता आहात. पुरंदर मधून आपणास कमी मताधिक्य मिळाले म्हणून असे वागत असाल तर पुढच्या वेळी अजून बिकट अवस्था होईल कारण पुरंदरची जनता "पवारांना" बांधील नाही हे न विसरणे. आणि आपल्या सारखेच फाडफाड इंग्लिस शिवतारे आणि इतरांनाही बोलता येते हे ही न विसरणे आणि राग आला तरी मातृभाषाच वापरायलाही न विसरणे.

"ताईसारखे खासदार असलेले लोकप्रतिनिधी जर सरकारी अधिकाऱ्यांची बाजू घेऊन, अधिकाऱ्यांना सुरक्षित करू पाहत असतील तर हा "लोकप्रतिनिधी" ह्या पदाचा सरळ सरळ घनघोर अपमान आहे..."

आयुतांना कडून उत्तर अपेक्षित असताना एका लोकप्रतिनिधीने दुसऱ्या लोकप्रतिनिधीचा त्यांच्याच मतदार संघातील प्रश्नांसाठी अवमान करणे म्हनेजे जनतेचा अपमान करण्यासारखे नाही काय?.


आपण मुळी त्यांना निवडून देतो ते आपले प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडावेत म्हणूनच ना? प्रश्न विचारले तर म्हणे मोठी किंमत चुकवावी लागेल, हा काय प्रकार? आवाज चढवलेला तुम्हाला आवडत नाही, तर मग दुसरं कुणी बोलत असताना मध्येच तोंड घालणे कसे काय बरे आवडते?

सुप्रिया ताईंना पुरंदर मध्ये मते मागण्यासाठी यावे लागते, शिवतारेंना बारामतीत जावे लागत नाही त्यामुळे ताईंनी संयमाने घेतलेले त्यांच्याच फायद्याचे आहे. अजित दादा आणि ताईंचा "वर्चस्वाचा" लढा चालू झाला आहेच तेव्हा भविष्यात दादा शिवतारेंचा उपयोग ताईंच्या मुसक्या आवळण्यासाठी करू शकतात हेही लक्षात घ्यावे.
.

link- http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=75616&boxid=1263915&pgno=7&u_name=0
link - https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitOSg6Hs7vwwon4FwdYpGgsnebbzR0gDrZ7saGFDZsMGLLoqzJCHjFTXg-DgwTb-dl3FGuLNP_QNOfY6Me3ezljKj3R_PuyNGl4lESkPRlpTOufeqshSd3PXrr29NatfY_anEjA92d3jEc/s1600-h/235318531.jpg

मी काही ज्योतिषी नाही

ते माहित्यं आमाला साहिब, तुमास्नी ते कळं असतं तर कांग्रेस सोडून, पंतप्रधानाच्या कुर्ची साठी ससेहोलपट करण्याची पाळी(व्येळ) तुमच्यावर आलीच नस्ती.. अन तुम्ही देवलसी बी नाइत, पंधरवड्यास्नी लस घ्याया इलायतेला जाया लाग्त हे बी ठाऊक हाय साऱ्यांसी.
मागं नाशकात तुमी कांद्यावर बोलला नाहीत तर लोकांनी कांदं फेकलं होतं तुमच्यावर नाही का साहेब? बरं झालं तुम्ही काही का व्हहिना पण साखरेवर बोल्लात ते, नायतर ऊसाची टिप्परं मारली असती लोकांनी?... लोकांचा काय नेम घेता?


तुमी कृषी अन पुरवठा मंत्री हात, तुमचा एरिया म्हंजी क्रिटेट, ओलंपिक, ई. ई... कृषीमंत्र्याचा आण महागाईचं काय बाय संबंध तरी हाय का? मायाबहंजी कडं तुम्या चेंडू टाकलाच त्याबरोबर संरक्षण नाय्तर रेल्वे बिल्वे मंत्री जबाबदार हाइत असं म्हटलं अस्त तरी झ्याक झालं अस्तं, "ग्लोबल वार्मींग" हे कारणं चालतं मग हे बी चालून गेल्यं असत कि? अस्सं बोलून पब्लिक गोंधळून सोडायचं अन मग मूळ मुद्दा आपसूक बाजूला सारायचा हे आता आमच्यासारख्या बीन अकलेच्यानं तुमच्या सारख्या जाणत्या राजाला सांगायची गरज बी नाय म्हणा. साखर खाली कधी येणार हे तुमास ठाऊक नाय, पण ती वर जाणार हे भविष्य निवडणुकीच्या काळात आपणच साम्गतली व्हतं, पार तंतोतंत खरं निघालं बुवा ते? आपल्या क्रुर्पेने यापारी अन साठेबाजां लै कमावलं म्हणत्यात. म्हंजे अगुदर २० रु किलू नि हिच साखर निर्यात केली आणि आता तिच साखर मागात आयात करताय ना?

मागं इदरभात लै शेतकरी जीवांनिशी मेलं, पण तुम्ही कामाच्या व्यापामुळं तिकडं बी फिरकला नाहीत. मनमोहनजी आले तेव्हा त्यांच्या बरोबर "निमंत्रण" नव्हते तरी आला व्हता. मयतिला अन दशकियेला जायला निमंत्रणाची गरज नस्तीच म्हणा.

आता कच्ची साखर बाहेरून येणार, इथले कारखाने तिच्यापासून पक्की साखर बनवणार. अन मग ऊस पिकवणारा शेतकरी परत मरणार असं दिसतंय... तुमी म्हण्ल्याप्रमानं मग आमी २-३ ज्योतिंशांकडं जाऊन आलो, पण ज्योतिषशास्त्रात साखरेला भविष्य नसतं अस म्हणत्यात त्ये. रस्त्यावरचेच ज्योतीशी ते त्यांना काय तुमच्यागत अक्कल हाय व्हय...?
असू द्या, बरं बाकीचं जाऊ द्या यावर्षी ऊसाला तरी यवस्थित भाव द्या म्हंजे झालं साहिब. आप्ला बी दोन-चार एकर हाय आवंदाच्याला म्हनुन.
.
.

आप्ला साळसूद पाचोळा. (ध्यान असु द्या)

२००९- आले आणिक तसेच गेले.

हेही वर्ष मागच्या सारखेच संपले. भरभराट काहीच झाली नाही. वर्ष संपले, दुःख तसेच राहिले. नवीन वर्षही यापेक्षा काय वेगळे असणार?. (म्हणूनच वर्षारंभाचे काही देणं घेणं नाही, त्याबाबतही अगदी साळसूद आहोत)


कसाबची गैंग लाटेवर स्वार होवून सावधपणे बेसावध मुंबैत घुसली, त्यांनी मुंबई धुतली. किलकिल्या डोळ्यांचे आर. आर. बोलपाटिल बोलून फसले, आणि मंत्रालयात पोहचायच्या आत त्यांची उपमुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्याचीही खुर्ची गायब झाली. पण २००९ चा पायगुण चांगला म्हणून "फिरून परत भोपळे चौकात" तसे आर. आर. परत गृहमंत्री झाले.

हलक्या फुलक्या विलासरावांनाही मुख्यखुर्चीतून मेणबत्तीवाल्यांनी खाली ओढलेच. २००९ ने त्यांना "अवजड" मंत्री करून सांत्वन (डिग्रेडेशन म्हटलं तरी चालेल, नाहीतर महाराष्टातून राजकीय हद्दपारीच म्हणा) केले. एव्हाना शिवराज पंaपाटलांनाही आपल्या साऱ्या सुटांसह नातवंडांना संभाळण्या साठी लातूरलाच धाडण्यात आले. (मिडिया आणि मेणबत्ती वाल्यांची ही कारागिरी)

हे मेणबत्ती वाले नंतर (मतदानाच्या दिवसी) दिसलेच नाहीत. (अन्यथा पुन्हा कांग्रेस आली असती काय? )

यावर्षी नारायण राणेंनी बरीच (म्हंजे अनेक) राजकीय वादळे उठविली, मात्र दुसऱ्यांचे छप्पर उडायच्या ऐवजी त्यांचे २-३ समर्थक आमदार तंबुसोडून पळाल्यामुळे राणेंचेच वासे कोलमडले. या वर्षात कैक वेळा ते घोड्यावर बसून दिल्ली ला गेले पण मैडमने त्यांना गाढवावर बसवून माघारी पाठवले. मुख्यमंत्रिपद दूर पण हद्दपारीचा लखोटा मात्र मिळाला. २००९ मध्ये रानेंच्या "स्वाभिमानाची" शेपटी हालविणारी शेळी झालेली दिसली.

यावर्षी पावसाचा अंदाज आलाच नाही. वाऱ्याची दिशा कशी, कुठे, कधी बदलली ते कळलेच नाही. राजकीय वारं हि तसेच होते. अशोक चव्हाण परत मुख्यमंत्री झाले आणि आमचं ते प्रथम मुख्यमंत्री झाले होते तेव्हा "आ" झालेलं तोंड अजूनही आवासुनच आहे. महाराष्टाचा मुख्यमंत्री कसा नसावा ह्याचं अप्रतिम उदाहरण म्हणेन मी. हायकमांड म्हंजे काय असते तेही समस्त महाराष्टाला यांच्या दूर-दुष्टी मुळे कळले.

मराठा आरक्षणाची गणगवळण यावर्षी फडावर आली होती, पण त्यांना गर्दी काही खेचता आली नाही. निवडणुकांचा बाजार संपताच अ-विष्णुअवतारी खेडेकर, मेटे आदी मंडळीच्या तोंडून आरक्षणातला "आ" देखिल परत ऐकायला आला नाही.

वरळी च्या सी लिंक वर स्व. राजीव गांधीनी स्व. स्वा. वीर सावरकरांवर कुरघोडी केली. अगदी डॉ. आंबेडकर, पुं. ल. देशपांडे आदी रेस मध्ये होते पण परत एकदा महाराष्टाची पवार, चव्हाण, देशमुख यांच्या साक्षीने उपेक्षा झाली.

लोकसभेने पवारांच्या रा. कॉ. ला चांगला दणका दिला. राजू शेट्टी आणि सदाशिवराव मंडलिक तर हात धुऊन पवारांच्या मागे लागले होते. लवासा उर्फ लेक सिटी, अजितदादांचा हवामहल,सडका गहू, महागाई, कर्जमाफी, ऊसाची टिपरं, (मोफत? )वीज, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कैक मुद्दे पवारांना गुद्दे देत होते, आता पवार संपताहेत की काय असं वाटत होतं पण विधानसभेला सावरले ते. खा. पद्मसिंह पाटलांना वर्षाच्या मध्यावर थोडासा मनस्थाप भोगावा लागला. पण आता ते वरदहस्तामुळे सुखरूप बाहेर निघताहेत असे दिसते.

पैसा, फोडाफोडी, उसनवारी आणि निवडून येईल त्याला उमेदवारी ह्या गोष्टीचा महाराष्टाच्या राजकारणात यावर्षी चंगळवाद झाला. बराच तरून वर्ग यावर्षी राजकारणात सक्रिय झाला. ( तरुण म्हंजे राजकारण्यांची मुले एवढाच अर्थ) नितेश राणेंचा (आणि त्यांची कुठलीशी संघटना आहे तिचा) इथे विशेष उल्लेख करावा लागेल.

२३ ऑक्टोबरला सकाळपर्यंत उद्ववाचेच सरकार येणार असे वाटत होते पण दुपारी ते गाजर आहे हे स्पष्ट झाले. जनता जनार्धानाला परत आघाडीचेच "अजब" सरकार हवे होते. सेनेसाठी २००९ २००४ सारखाच दुर्दैवी ठरला, तर ह्याच वर्षी राजठाकरेंनी आपली तटबंदी मजबूत असून मनसेचा मारा किती पल्ल्यांचा आहे हेही दाखवून दिले. वर्षभर ते बऱ्याच ठाण्यांना हजेरी लावत फिरत होते. बिहार, उ. प्रदेश, हरियाना इकडून देखिल वर्षभर त्यांना हजेरीसाठी निमंत्रणे येत होती. हिंदी बोलणारे कलावंत मराठी स्टेजवर (उत्सफुर्तपणे? ) यायला लागले आणि न विसरता "मी महारष्टियन आहे" असंही मोडक्या मराठीत सांगायला लागले. हा या वर्षीचा सकारात्मक बदल म्हणावा लागेल. काठ्या वाटपा पासून ते मार खाई पर्यंत अनेक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय आबू आझमींनी हजेरी लावली.

नोव्हेंबराला बाळासाहेबांवर टिका केली म्हणून शिवसैनिकांनी निखिल वागळेंना मारले. ते निर्भीड पत्रकार आहेत हे महाराष्टाला यावर्षी पुन्हा एकदा कळले. (९ वेळा हल्ला झाला तरी ते पत्रकारितेचा "हेका" सोडत नाहीत याला म्हणतात निर्भीड.) आम्ही निरपेक्ष, आम्ही लोकशाहीचा चोथा खांब म्हणताना "पेड पत्रकारितेवर" हा निर्भीड पत्रकार एक चकार शब्दही बोलला नाही.

महाराष्टासाठी अजून एक अभिमानाची बाब घडली. नितीन गडकरींना भाजपाचे राष्टिय अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. आता २०१० मध्ये त्यांनी स्वतःचे पोट कमी करून आपल्याला मान आहे हे दाखवून दिले पाहिजे.


अश्या कैक राजकीय घटना या वर्षी होवून गेल्या. महाराष्टाचा "विकास" झाला असं म्हणण्यासारखं विशेष असं काही ह्या वर्षी घडलेलं दीसलं नाही. वर्ष संपले, महाराष्ट मात्र परत तस्साच राहिला.

तुकोबांची देहू

ह्या आठवड्याचा शनिवार तुकोबामय होता, अजूनही मनात त्याच गोष्टी घोळत होत्या म्हटलं चला एकदा ते सारं उतरून टाकूयात.

आई-दादा,खेडेकर काकू, रुपालीसह नील, भजन शिकणारी छोटी मंडळी समृद्धी, निशांक, निनाद आणि निर्मिती हि सरासरी दुसरी-तिसरीतील छोटी मंडळी. त्यांना संत तुकाराम पाहायचा होताच पण भंडारा हा डोंगर आहे आणि आपल्याला डोंगरावर जायचे आहे म्हणून आतून खूश होती. भंडारा ला ते वारंवार भराडी म्हणत होते. (भराडी नावाचा एक डोंगर आमच्या गावी आहे म्हणून)

जिथे तुकोबांची गाथा बुडविली त्याच ठिकाणी साऱ्यांनी पवित्र भावनेने पाणी पायावर घेतले. जिथे पवित्र गाथा बुडविली, जिथे ती पुन्हा बाहेर आली तिथेच ४-५ देहुकर बाया "तुकारामाशी घेणे-देणे नाही, आमचा धुणं धुण्याशी मतलब" अश्या सामूहिक निर्विकारी भावनेनं गोधड्यांची घाण धुण्याचं कर्म करत होत्या. त्यांमुळे रुपालीने सांगूनही मी पाण्यात उतरलो नाही. दादांनी मुलांना तुकोबरायाची जमेल तसी "बायोग्राफी" सांगायला एव्हाना सुरुवात केलेली होती.

गाथा बुडविल्यानंतर तुकोबराय अन्नपाण्यावाचून १३ दिवस ज्या शीळेवर बसले होते तीही शेजारीच आहे. आता तिथे विठू-माउलीचं छोटंसं मंदिर आहे. "मग गाथा पाण्यात का बुडविल्या? " ह्या मुलांच्या प्रश्नाला मला तितकंसं योग्य उत्तर देता आले नाही पण मी वेळ मारून नेली.

त्याच्या शेजारी ह, भ. प. पांडुरंग घुले यांच्या प्रयत्नातून साकारलेलं "गाथा मंदिर" आहे. मध्यभागी तुकोबरायांचं ६/७ फूट बैठं शिल्प आहे. मंदिरातील दोन्ही मजल्यांवर गाथेतिल अंदाजे ५००० अभंग कोरलेले आहेत. पण ते वाचणारे फारच कमी होते. (एवढे अभंग कोरण्यापेक्षा दृश्य (चित्र, शिल्प) स्वरूपात ते लोकांसमोर ठेवले असते तर ते लवकर आणि जास्त लोकापर्यंत पोहचले असते अशी प्रतिक्रिया मी आमच्यातच नोंदवून दिली). नरसिंहाने फाडलेला हिरण्यकशपू, प्रल्हादावरचे अत्याचार,विष्णू, रामाने सेतू बांधण्यासाठी सागरास केलेले आवाहन ही ३ शिल्पे आहेत.. अप्रतिम आहेत ती. पण ह्या शिल्पांचा इथे काय संबंध असा मूळ प्रश्न कैक जणांच्या मेंदूत येतो, माझ्याही आलाच. ( नरसिंह, राम हे विष्णू अवतार आहेत, विठ्ठल म्हंजे विष्णूचेच एक रूप असा मी साधा संबंध लावला, आणि तो खराही निघाला. ) शिल्पांची इत्थंभूत (मला माहीत होती तेवढी) माहिती इतरांना देण्याच काम मी चोख केले आणि इथून बाहेर पाडण्यापूर्वी नील ने माझ्या पैंटवर "ओला प्रसाद" देऊन मला धन्यवाद देण्याचं काम चोख केलं.

गाथा मंदिरानंतर आम्हाला (मला) निळोबाराय भेटले, तुकोबांचे हे आवडते शिष्य मला तुकोबांपेक्षाही सहज भावले. हेच ते निळोबाराय ज्यांच्या साठी तुकोबा पुन्हा धरतीवर आले होते. तुकोबांनी सदेह वैकुंठ गमणं केल्यानंतर, इंद्रायणी काठी जिथे गाथा परत सापडल्या होत्या त्याच ठिकाणी संत निळोबाराय तुकोबांच्या भेटीसाठी अन्नपाण्यावाचून बसले. साक्षात विठ्ठल त्याच्या समोर प्रकट झाले तर " तुला कुणी बोलावले?, मला फक्त माझ्या तुकोबांनाच भेटायचे आहे" म्हणत त्यांनी डोळे बंद केले. आणि शेवटी तुकोबांना यावंच लागलं. तुकोबांपुढे भगवंतालाही डावलणारा, दुय्यम स्थान देणारा हा निस्मिम भक्त मनाला अलगद भिडला.

इंद्रायणीचे पाणी आळंदीपेक्षा इथे मात्र शुद्ध आहे. बोटिंगची सोयही आहे. पण आम्ही ती सोय न वापरता पैसे आणि वेळ वाचवला.

इथुनच खेडेकर काकुंनी नील ला "मायेने" खेळणं घेतलं, दोन दिवस झालेत अजून ते त्याने तोडलं नाहि.

देहुतिल मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील गरूडावर बसलेल्या तुकारामांकडे पाहताना मुलं "आरे हे ह्या गरूडावर बसून गेलते काय? " म्हणून विचारत होती. दर्शन जरा घाईतच झाले, पण तुकाराम आणि शिवराय याची जिथे भेट जाली तिथे मात्र मी आवर्जून थांबलो.

बाजारपेठेकडे पाहताना त्या मुंबाजीचा वाडा आणि वंशज पाहण्याची सुप्त इच्छा जाली होती, पण विचारायचे कसे आणि कुणाला हे कळत नव्हते.

इंद्रायणीचा वन वे ब्रिज पार करून भंडारा गाठला. मध्येच संत जगनाडे महाराज, ज्यांनी तुकोबारायांचे सारे अभंग लिहले त्यांचे सुदुबरे गाव लागले. घाट मस्त आहे. डोंगरमाथ्यावरून पिंपरी-चिंचवड, चाकण आणि मावळ तालुक्याचा मस्त एरिअल देखावा दिसतो. उत्तरेला भाम डोंगरही दिसतो. ह्याच डोंगरांनी तुकोबांना हवा असलेला एकांत दिला होता. ह्या दिवसात तिथे सप्ताह चालू असतो. मंडपात प्रवचनकाराचे आध्यात्मिक डोस चालू होते, मंडपाबाहेर आम्ही भेळ-बिस्किटांचा अल्पोपाहार करत होतो. पूर्वी इथे काळ्या कौलांचा मोठा वाडा होता त्यात तुकोबराय, विट्ठल-रुक्मिणी इ. मुर्त्या होत्या. तो जतन करायच्या ऐवजी सरकारने वाडा पाडून सिमेंट मध्ये बिनकळसाचे मंदिर बांधून आपला आध्यात्मिक दृष्टिकोन दाखवून दिला आहे.

चला.... जीवनातिल अजून एक दिवस सार्थकी लागल्याचा आनद अजुनही आहेच.

कबीर- तेजाचा उत्सव.

संत कबीर आपल्या मुक्तीचा उत्सव प्रकट करताना म्हणताहेत.


लाली मेरे लाल की, जित देखू तित लाल।
लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल ॥


जो अनुभवता येतो पण शब्दात उतरवता येत नाही असा ब्रह्मानंद, कबीर इथे रंग-प्रतिमाच्या माध्यमातून साकारताहेत.

लाल रंग म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा उत्सव!! आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, आत्मा हा परमात्म्याचाच साक्षात्कार आहे. हा अपूर्व सोहळा ते फक्त "लाल" रंगाच्या प्रतिमेतून जिवंत करू पाहताहेत.

परमात्मा, परब्रह्म "तेजाचा संचय" आहे. साहजिकच ते तेज साध्या डोळ्यांनी पाहणे किंवा हदयात साठविणे अशक्यच आहे. आणि म्हणूनच प्रत्येक भक्त ह्या "तेजाला" रंग, रूप, आकार, गूण देऊन आपल्या-आपल्या देवतेच्या रूपात पाहतो. (कुणी त्याला ईश्वर, कुणी बुद्ध, तर कुणी येशूचं नाव देतं). तेजाचा साक्षात्कारही मग आपण याच रूपात अनुभवतो.

तेजाचा अनुभव म्हंजे "शुद्धतेचा अनुभव".

कबीर हे पुर्वजन्मी शुक मुनी होते, त्यामुळे या ज्ञानी संताची सुररवातच निर्गुण साधनेने झाली होती. मुक्ताई, ज्ञानदेव, सौपण, निवृत्ती ह्यांनाही हे ज्ञानपण जन्मताच लाभले होते. हनुमंताने जन्मातच सूर्यबिंबाकडे झेप घ्यावी, उड्डाण घ्यावे असी ही जन्मजात पुण्याई.

अशी हि पुण्याई फार थोड्या महायोग्यांच्या वाट्याला येते. कबीर त्यापैकीच एक. ते प्रभू रामचंद्रांकडे चरित्र, चारित्र्य, गुण यांपुढेही जाऊन एक निखळ ब्रह्मानंद म्हणून पाहायचे.

परमात्म्याचं तेज पाहता पाहता ते स्वतःच त्यात विलीन होताहेत,...... एकरूप होताहेत........ त्या तेजाचाच एक अंश बनून जाताहेत.



(हा दोहा मला प. पू. आण्णासाहेब मोरे, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी ह्यांच्या आध्यात्मिक लिखाणातून अर्थासह मिळाला, त्यातला सारांक्ष मी देतो आहे. साध्या शब्दांमागे दडलेला प्रचंड अर्थ असंच मी ह्या दोह्याबददल म्हणेन.)



सचिन, नारायणांव, पुणे, १९/१२/२००९

कबीर -बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.

.
मुंड मुंडाए हरी मिले सब कोई ले मुंडाय,
बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.

हा "मुंडणावरिल" अजून एक दोहा आमचे एक मनोगती शरद कोर्डे यांनी अर्थासह सुचवला. मलाही तो खूपच आवडला.
मुंडण (हजामत) करून परमेश्वरप्राप्ती होत असेल तर सर्वांनी मुंडण करावं. (पण लक्ष्यात घ्या) वारंवार केस (लोकर) कापल्याने (कापूनही) मेंढी स्वर्गाला जात नाही.
.
इथेही कबीर साधे, रोखठोक आणि सहज पटणारे उदाहरण देऊन प्रबोधन करताहेत की वैकुंठप्राप्ती साठी असल्या कर्म-कांडांची काडीमात्र गरज नाहीये. त्यात उगाच जीवन व्यर्थ घालवू नका.
.

(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

सचिन, नारायणगांव, १6/१२/२००९.

कबीर- केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार.

केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार

मन को काहे न मुंडिए, जामें विषे विकार.
.

कबीर ह्या दोह्यातून समाजप्रबोधनाबरोबरच तत्कालीन दृष्टचालीरितींवरही टिका करत असावेत असे वाटते.

कबीरजी वेद, कुराण, धर्म ह्या गोष्टी बाजूला ठेवून, निसर्गनियमाला धरून आपल्या स्वतःच्या तर्काने प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायचे. त्यांचा जन्म जरी ज्ञात नसला तरी कालावधी १४४०-१५१८ हा होता. त्याकाळी स्त्री विधवा झाल्यास, भावकीतिल कुणी मृत झाल्यास किंवा कुठल्याही धार्मिक हेतूने मुंडण करणे बंधनकारक होते. चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथातही दीक्षा घेतलेल्या साध्वींना मुंडासे करावे लागते. क्रित्येक भट-भिक्षुकही ज्ञानधारनेसाठी मुंडण करीत. केस अपवित्र झालेत, सुतकी झालेत म्हणून धर्म सांगतो म्हणून आपण त्यांचे मुळासकट उच्चाटन करतो, तेही वारंवार. पुजारीही देवप्राप्तीसाठी सदैव मुंडण करतात. कबीर नेमकेपणाने इथेच बोट ठेवताहेत. तसं पाहिले तर केसांनी शरीराचं काहीही बिघडवलेलं नसते, तरीही आपण आपलं पावित्र्य, इस्वरप्राप्ती, ध्यान-ज्ञान इ. इ. साठी विनाकारण केसांचे उच्चाटन करतो.

पण... त्याच शरीराचा एक भाग असलेलं मन की ज्यात वेळोवेळी दूषित, अपवित्र, विषारी, विषयी (भौतिक) विचार जमा होतात. षड्रिपूंचे वास्तव्य तेथेच असते. अध्यात्माच्या सानिध्यात गेल्याने तात्पुरते हे सारे मनविकार साफ होतातही पण पुन्हा ते जोमाने वाढू लागतातच. आणि म्हणूनच केसांना दोष देत त्यांचे शंभर वेळा मुंडण करण्यापेक्षा ह्या विषारी मनाचे सतत मुंडन व्हायला हवे, मगच तुम्ही पवित्र व्हाल, ईश्वराच्या जवळ जाऊ शकाल.

(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

सचिन, नारायणगांव, ११/१२/२००९.

कबीर - चलती चक्की देखकर ..

चलती चक्की देखकर दिया कबीरा रोए,
दुई पाटन के बीच में शाबुत बचा ना कोए.


कबीर ह्या दोह्यातून निसर्गाचं एक विदारक पण वास्तववादी सत्य मांडताहेत. चक्की म्हंजे जाते, जे जुण्याकाळात धान्य दळण्यासाठी वापरलं जायचं. त्याला दोन पाटे (पाटन किंवा चाके) असतात, एक जमिनीत स्थिर असते तर दुसरे त्यावर गरगर फिरत असते. चलती चक्की प्रमाणे हे जीवन गतिमान आहे, आणि त्यात शाश्वत असे काहीही नाही. सारं काही त्यात भरडले जाणार आहे, असाच साधा अर्थ आपणास कळतो.
पण.....,
कबीरा फिरणारं जातं पाहून रडताहेत कारण..... ..
त्यांना याद्वारे निसर्गातील एक अन्यायकारी सत्याची जाणीव झालीय. पृथ्वी आणि आकाश या निसर्गाच्या दोन चाकांमध्ये जे काही येईल मग सुख- दुःख, प्रेम-राग, न्याय-अन्याय, मान-अपमान सारं काही भरडून निघणार आहे. इथे दुर्जनाबरोबर आणि "दुर्जनांप्रमाणेच" सज्जनाचाही शेवट ठरलेला आहे. (सुक्या बरोबर ओलं ही जळते) दोघांनाही अंतिम न्याय एकच आहे. निसर्गाची गती शाबूत ठेवण्यासाठी हा "बदल" आवश्यकच आहे ह्या अगतिकतेमुळे कबीरांना वाईट वाटते आहे.
.
जीवनातील अश्वाश्वतता आणि गतिशीलता दाखविण्यासाठी सामान्य, साध्या जात्याचं उदाहरण देतात. बऱ्याच वेळा ते बहिणाबाईंसारखेही वाटतात.
.
(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ मी देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

कबीर- तेरा साई तुझमें.

जैसे तिल में तेल है जो चकमक में आग,

तेरा साई तुझमें है तू जाग सके तो जाग.


कैक वर्ष माणूस देव, अंतिम सत्य, आत्मा या गोष्टी शोधू पाहतो आहे, कबीरजीं ह्या दोहयातून भगवंत आहे, आणि त्यापर्यंत पोहचता देखिल येते, हे सत्य सउदाहरण सांगताहेत.

जसं बि (तिल) मध्ये तेल असते, ते आपणास बाहेरून दिसत नाही. तसेच गारगोटी (चकमक) बाहेरून निर्जीव वाटते, पण एकमेकांवर घासल्यास त्यातून आगीच्या ठिणग्या बाहेर पडतात. म्हणजे गारगोटिच्या आतही ऊर्जा, चैतन्य असते आणि तेच अंतिम सत्य आहे.

अगदी त्याचप्रमाणं, तू ज्या ईश्वराला शोधण्यासाठी अहोरात्र, दाहिदिशा फिरतो आहे, तो तुझ्या आतच आहे. आणि म्हणून तू जागा हो, स्वतःच्या मी पणातून बाहेर ये, आणि तुझ्या आत, अंतर्मनात त्याचा शोध घे. तुझं बाह्य रूप म्हणजे तू नाहीसच हे तुला आपसूक उमगेल. हनुमंताने नव्हते का त्याच्या प्रभूला अंतर्मनातच शोधले.

ईश्वर बाहेर सापडणे अशक्य आहे कारण तो आपल्या आतच वास्तव्यास आहे. त्याला इतरत्र शोधण्यात मिळालेलं जीवन वाया घालवू नकोस, अन्यथा तू सदैव असत्याच्या गाढ झोपेतच राहशील अशी "जाग सके तो जाग" म्हणून दाट समजही देताहेत.

चला आपणही दिवसातून कधीतरी, दोन क्षण का होईना अंतर्मनातील ईश्वराला शोधण्या साठी नक्की देऊयात.

(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ मी देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

नील - वय वर्षे ६ महिने.

नील, आता सहा महिन्याचा झालाय. सहा महिने चिमणपाखरासारखे कसे भुरकणं निघून गेले हे कळलेच नाही. तो या जगात प्रवेशीत व्हायच्या अगोदरच आम्ही त्याचं नाव ठरवून ठेवलं होतं, कसे कुणास ठाऊक पण रुपालीला (प्रत्येक स्त्री प्रमाणे) मनोमन वाटायचं की मुलगाच होणार म्हणून. आमच्या घरातील साऱ्या मुलांची नावे "नि" ने चालणारीच आहेत, म्हणजे निशांक, निनाद, निर्मिती...... आणि आता नील.
.
नील म्हंजे निळा किंवा एक रत्न असा साधा अर्थ माझ्या मनी होताच. त्याच बरोबर नल-नील ह्या रामायणातील व्यक्तिरेखाही आहेत. पुराण काळात भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ज्ञ होते. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते होते. प्रभू श्रीरामाला लंकेत प्रवेश करण्यासाठी "रामसेतू" बांधण्याची संकल्पना पुढे आली. रामसेतू बांधण्याचं कार्य नल आणि नील या वास्तुतज्ञांनी विश्वकर्माच्या मार्गदशनाखाली केलं होतं. स्वर्गाचा अधिपती इंद्र याच्या कानातील मण्याला "नीलमणी" किंवा "नील" असही म्हटले जाते.
हनुमंताने संजीवनी वनस्पती साठी द्रोणागिरी पर्वत उचलून नेताना त्याचा काही भाग खाली पडला, तो पडलेला भाग म्हंजे "पुरंदर" किल्ला. पुरंदर म्हंजे इंद्राचेच एक नाव. पुराणात या किल्ल्याचा उल्लेख "इंद्र नीलपर्वत" असाच आहे. पुराणकालीन संदर्भ असल्याने आम्ही हेच नाव फिक्स केलं. तसेच नील आर्मस्ट्रॉग, नील मुकेश हि आलिकडची नावेही माहीत होतीच.
.
३ किलो असलेला नील आज ७ किलोचा झाला आहे. सुरवातीला तो नुसताच प्रकाशाच्या दिशेने टक लावून पाहायचा, आवाज झाला की जागीच हालायचा. आता मात्र आवाजाचा दिशा हि तो ओळखतो आहे. आपल्याला "नील" म्हणतात हेही तो ओळखतो, कारण नील म्हटलं की तो नक्की वळून पाहतोच आणि हलकंसं हसून किंवा हुंकार देत प्रतिक्रियाही देतो. एकटाच छताकडे पाहत खेळत बसतो,रडणं अगदीच कमी. पण आता हळूहळू हट्टी व्हायला लागलाय, त्याच्या हातातील वस्तू, खेळणं काढून घेतलं की त्याला प्रचंड राग येतो. बाहेर, टेरेसवर फिरायला नेलं की येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट-टेललाईट त्या दिसेनाश्या होईपर्यंत पाहत राहतो. आई त्याला कसली तरी बडबड गीतं (स्वतःच्या रचना) एकवीत असते. म्हंजे "कावू, कावू ये ये, नीलला खाऊ दे दे वैगेरे वगैरे. तसा तो ओळख विसरत नाही, परवाच माझे वडील २ आठवड्यांनातर आले होते, त्यांच्याकडे कित्येक वेळ विचित्र नजरेनं पाहत होता, ओळख आठवण्याचा प्रयत्न करीत होता, ओळखल्या नंतर मात्र बाबांशी जाम हसायला, खेळायला लागला. कानाजवळ हलूच आवाज केला तर लहान मुलं झोपेत देखिल हसतात हे एक नवलच आहे.
.
ऑफिस मधून घरी गेल्यावर मी त्याला झोपेतून हमखास जागा करतो, आणि मग त्याची झोप मोड केली म्हणून त्याच्या आईचा शाब्दिक मार खातो.

आधार

[कल्पी नामक ओर्कुटिने याचा पूर्वार्ध लिहिला होता.... मी माझ्या मनातील "हा" उत्तरार्ध त्यास जोडला. कारण कुटुंब, बायका-पोरं, आई-वडील यांच्या साठी वेळ न देता कामात अहोरात्र व्यस्त राहणाऱ्यांवर माझा राग आहे.... ]
.
राजन खूपच महत्त्वाकांक्षी बनला होता. स्वतःचा टुमदार बंगला त्याला स्वप्नात दिसायचा. कधी स्वतःच्या गोल्डन बेंझ मधून, अनिता आणि संपदांसह भरधाव धावेल असे त्याला झाले होते. त्याच साठी त्याला पैसाची आस लागली. एप्रिल जवळ आला होता. बिचारा राब राब राबायचा, रात्री उशिरा घरी यायचा, जेवणाच्या टेबलवारही लैपटोप वर कामात मग्न असायचा. तसं त्याचं अनितावर उतू जाईपर्यंत प्रेम होते. पण त्या साठी त्याच्याकडे सध्या वेळ नव्हता. बॉसनेही मग राजनच्याच बोकांडी जास्तीत जास्त कामाचे ओझे टाकायला सुरुवात केली. कंपनीच्या अपेक्षा पूर्णं करणे अवघड होवू लागले, ओझ्याने राजन चे शरीर चेपले, अन मानसिक ताणाने मन. त्याला धड झोपही लागणे अवघड होवू लागले. राजन जाळ्यात पुरता गुरफटून गेला. तरीही त्याचे अनितावर प्रचंड प्रेम होते. आपलं सैंडवीच होतेय हे त्याला बोचत होते. त्याच स्वप्न त्याच्या पासून दूरदूर पळत होती, मृगजळा सारखी.
.
अश्याच एका रात्री उशिरापेर्यंत थांबून तो घरी जात होता. आज बॉसने त्याची खरडपट्टी केली होती. नको तितकी, नको त्या शब्दात. तरीही त्याला मूग गिळून थांबावे लागत होते. डोळे चरचरत होते, रस्त्याच्या प्रकाशानेही डोळे चमकायचे, दुखायचे. पुढचं दिसायचंही नाही. कंपनीच्या कार मध्ये बसताना मात्र त्याला आज काहीतरी भयानक रुतत होतं.... अनिता, संपदा, घर यांजबरोबर आपल्या स्वप्नांपासून प्रचंड दूर गेल्याची घरघर त्याच्या मेंदूत चालू झाली. मनावर हरल्याचा दबाव येऊ लागला....आवेगाने त्याच्या मनाचं संतुलन ढासळत होतं, परत सावरतं होतं. वेग वाढतोय, नव्हे तो नेहमीपेक्षा किती तरी जास्त आहे हे त्याच्या ध्यानी येण्याइतपत शांत तो नव्हताच. कुठल्याश्या दबावानं मन मोकाट सुटलं होतं. पिसाळलेल्या कुत्र्यासारखं.....सुसाट, दिशाहीन, तंद्रीत........ आणि अचानक समोरून येणाऱ्या डंपरचा हेडलाईट राजंनच्या डोळ्यावर चमकला. स्वप्न, वेग, मन सारं त्याच्या नियंत्रणाबाहेर गेलेलं होतं, केव्हाच..!!!
स्वप्नांच्या aया जीवघेण्या प्रवासात केव्हा थांबायचे, केव्हा परतायचे हे त्या बिचाऱ्याला कळलेलंच नव्हते.
.
.
आज, दोन वर्षांनी, अनिता पडवीत उभी राहून झाडाभोवती गुरफटलेल्या वेलीकडॆ बघत होती. नाजुक वेल आधार मिळाला म्हणून सरळ सरळ वाढायला लागली नाहीतर जिकडे रस्ता मिळेल तिकडे बेधुंद माणसाप्रमाणे पसरली असती.
वेलीला आपली सर्वात जास्त आणि नितांत गरज आहे हे त्या झाडाला पक्कं माहीत असावं, नाहीतर "आधाराविना" ती वेलही जमिनीवरच विखुरली असती.
.
सचिन, नारायणगांव, पुणे, २७/११/२००९

निखिल वागळेंची पत्रकारिता?

निखिल वागळेंना मी जेव्हा पासून पाहतोय, वाचतोय तेव्हांपासून मला ते "क्वचितच" कधीतरी निःपक्षपाती वाटले. काही ठराविक लोकांबद्दल ते नेहमीच पुर्वग्रहदोषानेच आणि राजकीय हेकेखोरपणे बोलतात. सामनाही निःपक्षपाती नाही पण तो तसे असल्याची खोटी भूलही देत नाही.
.
काल निखिल वागळेंवर झालेला हल्ला (जो कधीतरी होणारच हे पक्के होते) हा समस्त त्या जातीच्या प्रत्रकारितेवर झालेला हल्ला होता, जी पत्रकारिता तोंडपाटीलकी करत आपलीच सत्ता चालवू पाहते. सातत्याने एकालाच टीकेचे लक्ष करते, ठराविक पक्षाला झुकते माप आणि एखाद्या पक्षाचा द्वेष. बातमीचे, एखाद्या घटनेचे यथार्थ(जसेच्या तसे) वर्णन देतानाही स्वतःच्या मनाचे कलुषित रंग त्यात "बेमालुमपणे" मिसळूनच दिली जाते. विश्लेषण, विवेचन, निष्कर्ष, उपाय सारं काही हेच करून मोकळे होतात. जनता फक्त पाहतच राहते. जनतेच्या रोजच्या जेवणात हळूहळू पण सातत्याने हा विष प्रयोग केला जातो आहे. स्वतःला "बुद्धिजीवी" आणि "निःपक्षपाती" म्हणवून घेणाऱ्या ढोंग्या पत्रकारांनी हे ध्यानी टेवावे. इतके दिवस वागळे सेना, भाजपा, बालासाहेब, मनसे, उद्धव, राज यांच्यावर हल्ला करत होते, काल सेनेने वागळेंवर हल्ला केला. वागळेंनी दूषित शब्दांनी हल्ला केला तर सेनेनं काठ्यांनी.
.
माझी ही ९ वी वेल आहे मार खाण्याचे असे ते गौरवाने सांगत होते, प्रत्येक वेळी आपलीच "धुलाई" का होते ह्याचा त्यांनी जरा "मी" पणाच्या बाहेर येऊन विचार करायला हवाच. पत्रकारिता म्हंजे खूप सोज्वळ मार्ग आहे असे आजचे चित्र बिलकुल नाही, पेड पत्रकारिता हा यांचा पैसा कमाविण्याचा सोपा मार्ग. पैसे घेऊन हे एखाद्याला प्रतिष्ठित बनवून जनतेपुढे पेश करतात तर एखाद्याला प्रतिष्ठितावर चिखल फेक करतात. पुढारीच काय पण पोलिसाकडूनही बंद पाकिटं घेणारे चालू पत्रकारही मी पाहिलेत. आम्ही म्हंजे स्वच्छ, आम्ही म्हणजे लोकशाहीचा ४था स्तंभ, म्हणत यांची मिलिभगत चालू असते. त्यांच्या विरुद्ध आवाज उठविला की सारे "स्वातंत्र्य" नावाखाली एकवटतात. वागळेंनी तर सरळ मुख्यमंत्र्यांना "राजकीय" दम भरला आहे की राऊतांना अटक करा नाही तर मी याला राष्टिय नाही तर आंतरराष्टीय इश्यू बनवील.
मराठी संपादकावर हल्ला, मराठी वाहिनीवर हल्ला, मराठी पत्रकार, मराठी केमेरामन, मराठी रिसेस्पशनिष्टवर हल्ला असं वारंवार ओरडून ते "हा हल्ला मराठी माणसावर आहे" असे काहीतरी "भासवत" होते ... ढोंगी पत्रकारिता म्हणतात ति हिच.
.
वागळेने त्याच्या पत्रकारांना चिथवणी दिली आणि नतर त्यांनी काही शिवसैनिकांना मारहाणही केली.
सेनेला हिंसावादी आणि स्वतःला वागळे अहिंसावादी म्हणवितात ना मग एका गालात मारली तर त्यांनी दुसरा गाल पुढे करायला हवा होता. याउलट ते आपल्या कामगारांनी शिवसैनिकांना मारून जश्यांस तसे उत्तर दिले हे अभिमानाने सांगत होते. याचा अर्थ इतर र्वेळी जे स्वतःकडे गांधीजीच्या तत्त्वाची मक्ते दारी घेतात आणि तोंडपाटीलकी करतात, तेच खरे ढोंगी आहेत..
.
.
सचिन, नारायणगांव, पुणे, २३/११/२००९.

जाहीरनामा-- - रद्दीत जमा.

जाहीरनामा म्हंजे तो पाळलाच पाहिजे असे काही बिलकुल नाही. किंबहुना "न पाळणाऱ्या आश्वासनांची जाहीर यादी" म्हणजे जाहीरनामा. (जो निवडणूकीनंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकायचा असतो. )

मागच्या जाहीरनाम्यात फुक्कट वीज देतो असा लिखित शब्द आघाडीने दिला होता, पाळला नाही, (फुक्कटच काय पण विकतही २४ तास वीज देण्याची यांची लायकी नाही हे नंतर कळले. ) वर "अश्या थापा निवडणूकीच्या तोंडावर मारायच्या असतात, त्या पाळण्यासाठी थोड्याच असतात" हेही विलासराव आणि सुशिलभाउ या हंसाच्या जोड्याने स्वच्छ अश्या निर्लज्जपणाने हसत सांगितले होते, त्याचबरोबरीने "२००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करू" हेही आश्वासनही ती "प्रिटींग मिस्टेक" म्हणत झटकले होते, तेव्हाच जाहीरनामा पाळण्यासाठी नसतोच हे आम्हांस पटले. (पण मग, तो का छापतात ते कळत नाही)


यावेळी जरा नवीन शक्कली लढवल्यात,म्हंजे मागच्या वेळी गूगली टाकली होती आता गुल्ले पिसलेत.


जनतेला डायरेक्ट "लखपती" करण्याचे आश्वासन आघाडीने दिले आहे. ३५-४० हजार दरडोई उत्पन्न १ लाखांपर्यंत वाढविले जाणार आहे. (ते कसे? ते अजून ठरविलेले नाही.... शेअरबाजार, सट्टाबाजार, मटका नाहीतर जुगारात पैसा लावला तर १ लाखाचा आकडा नक्की गाठता येईल)
यावेळीही पुन्हा फिरून त्याच भोपळे चौकात येत सालाबादप्रमान "भारनियमन मुक्त महाराष्टाची" घोषणाही त्यात आहेच. (पुढच्या किती निवडणुकांत हे तोंडीलावायला असेल कुणास ठाऊक? )
५ वर्षात १० लाख घरे बांधणार हेही एक आश्वासन आहे. (आणि त्या घरांत ५० लाख जनता राहणार) चांगले आश्वासन आहे पण १० लाख जरा अतीच झाले नाही का? ( कदाचित १ काचे प्रिटींग मिस्टेकंमुळे १० झाले असावेत, तरीही हि मिस्टेक मतदानानंतर मान्य करणार असतील)
पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असाही एक विचित्र मुद्दा त्यात घुसडलेला आहे, तो कशासाठी हे काही मला कळले नाही बुवा. (म्हंजे मतांचा आणि त्याचा संबंध असेल असे वाटत नाही म्हणून)
शिवराय, आंबेडकर यांचे सागरी स्मारक उभारणार, हे मात्र छान गाजर दाखवले आहे. पुतळ्यांमध्ये ३००-३०० करोड घालायला पैसा आहे, विदेश दोऱ्यांसाठी पैसा आहे, स्वतःच्या सुरक्षेसाठी पैसा आहे, मग गरीबांना, शेतकऱ्यांना द्यायच्या वेळीच तिजोरीत खडखडाट का असतो बरे?
शेतकऱ्यांना ३% व्याजाने कर्जे देताहेत, अगोदर त्यांची कर्जेमाफीची मागणी तर पूर्णं करा.
मुलींना जन्मताच सव्वालाख रु देणार. (इथेही युतीच्या वचननाम्याची ढापा ढापी) ह्या साठी दरवर्षी कमीत कमी ३०० करोड वेगले टेवावे लागतील याचा विचार कोण करणार?

अजूनही बराच २१ कलमी कार्यक्रम आहे, असल्या हास्यास्पद जाहीरनाम्यामुळे आघाडीचाही कार्यक्रम लागू शकतो.
महाराष्टात जी लाखो बेरोजगारांची फौज तयार होते तिच्यासाठी मात्र इथे जागा नाहीच. कदाचित ते सैन्य ते प्रचारासाठी राखून ठेवणार असतील...

सचिन, नारायणगाव, पुणे.
(इमेजस सोज्यन्य - ग्रफिटी.)