२००९- आले आणिक तसेच गेले.

हेही वर्ष मागच्या सारखेच संपले. भरभराट काहीच झाली नाही. वर्ष संपले, दुःख तसेच राहिले. नवीन वर्षही यापेक्षा काय वेगळे असणार?. (म्हणूनच वर्षारंभाचे काही देणं घेणं नाही, त्याबाबतही अगदी साळसूद आहोत)


कसाबची गैंग लाटेवर स्वार होवून सावधपणे बेसावध मुंबैत घुसली, त्यांनी मुंबई धुतली. किलकिल्या डोळ्यांचे आर. आर. बोलपाटिल बोलून फसले, आणि मंत्रालयात पोहचायच्या आत त्यांची उपमुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्याचीही खुर्ची गायब झाली. पण २००९ चा पायगुण चांगला म्हणून "फिरून परत भोपळे चौकात" तसे आर. आर. परत गृहमंत्री झाले.

हलक्या फुलक्या विलासरावांनाही मुख्यखुर्चीतून मेणबत्तीवाल्यांनी खाली ओढलेच. २००९ ने त्यांना "अवजड" मंत्री करून सांत्वन (डिग्रेडेशन म्हटलं तरी चालेल, नाहीतर महाराष्टातून राजकीय हद्दपारीच म्हणा) केले. एव्हाना शिवराज पंaपाटलांनाही आपल्या साऱ्या सुटांसह नातवंडांना संभाळण्या साठी लातूरलाच धाडण्यात आले. (मिडिया आणि मेणबत्ती वाल्यांची ही कारागिरी)

हे मेणबत्ती वाले नंतर (मतदानाच्या दिवसी) दिसलेच नाहीत. (अन्यथा पुन्हा कांग्रेस आली असती काय? )

यावर्षी नारायण राणेंनी बरीच (म्हंजे अनेक) राजकीय वादळे उठविली, मात्र दुसऱ्यांचे छप्पर उडायच्या ऐवजी त्यांचे २-३ समर्थक आमदार तंबुसोडून पळाल्यामुळे राणेंचेच वासे कोलमडले. या वर्षात कैक वेळा ते घोड्यावर बसून दिल्ली ला गेले पण मैडमने त्यांना गाढवावर बसवून माघारी पाठवले. मुख्यमंत्रिपद दूर पण हद्दपारीचा लखोटा मात्र मिळाला. २००९ मध्ये रानेंच्या "स्वाभिमानाची" शेपटी हालविणारी शेळी झालेली दिसली.

यावर्षी पावसाचा अंदाज आलाच नाही. वाऱ्याची दिशा कशी, कुठे, कधी बदलली ते कळलेच नाही. राजकीय वारं हि तसेच होते. अशोक चव्हाण परत मुख्यमंत्री झाले आणि आमचं ते प्रथम मुख्यमंत्री झाले होते तेव्हा "आ" झालेलं तोंड अजूनही आवासुनच आहे. महाराष्टाचा मुख्यमंत्री कसा नसावा ह्याचं अप्रतिम उदाहरण म्हणेन मी. हायकमांड म्हंजे काय असते तेही समस्त महाराष्टाला यांच्या दूर-दुष्टी मुळे कळले.

मराठा आरक्षणाची गणगवळण यावर्षी फडावर आली होती, पण त्यांना गर्दी काही खेचता आली नाही. निवडणुकांचा बाजार संपताच अ-विष्णुअवतारी खेडेकर, मेटे आदी मंडळीच्या तोंडून आरक्षणातला "आ" देखिल परत ऐकायला आला नाही.

वरळी च्या सी लिंक वर स्व. राजीव गांधीनी स्व. स्वा. वीर सावरकरांवर कुरघोडी केली. अगदी डॉ. आंबेडकर, पुं. ल. देशपांडे आदी रेस मध्ये होते पण परत एकदा महाराष्टाची पवार, चव्हाण, देशमुख यांच्या साक्षीने उपेक्षा झाली.

लोकसभेने पवारांच्या रा. कॉ. ला चांगला दणका दिला. राजू शेट्टी आणि सदाशिवराव मंडलिक तर हात धुऊन पवारांच्या मागे लागले होते. लवासा उर्फ लेक सिटी, अजितदादांचा हवामहल,सडका गहू, महागाई, कर्जमाफी, ऊसाची टिपरं, (मोफत? )वीज, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कैक मुद्दे पवारांना गुद्दे देत होते, आता पवार संपताहेत की काय असं वाटत होतं पण विधानसभेला सावरले ते. खा. पद्मसिंह पाटलांना वर्षाच्या मध्यावर थोडासा मनस्थाप भोगावा लागला. पण आता ते वरदहस्तामुळे सुखरूप बाहेर निघताहेत असे दिसते.

पैसा, फोडाफोडी, उसनवारी आणि निवडून येईल त्याला उमेदवारी ह्या गोष्टीचा महाराष्टाच्या राजकारणात यावर्षी चंगळवाद झाला. बराच तरून वर्ग यावर्षी राजकारणात सक्रिय झाला. ( तरुण म्हंजे राजकारण्यांची मुले एवढाच अर्थ) नितेश राणेंचा (आणि त्यांची कुठलीशी संघटना आहे तिचा) इथे विशेष उल्लेख करावा लागेल.

२३ ऑक्टोबरला सकाळपर्यंत उद्ववाचेच सरकार येणार असे वाटत होते पण दुपारी ते गाजर आहे हे स्पष्ट झाले. जनता जनार्धानाला परत आघाडीचेच "अजब" सरकार हवे होते. सेनेसाठी २००९ २००४ सारखाच दुर्दैवी ठरला, तर ह्याच वर्षी राजठाकरेंनी आपली तटबंदी मजबूत असून मनसेचा मारा किती पल्ल्यांचा आहे हेही दाखवून दिले. वर्षभर ते बऱ्याच ठाण्यांना हजेरी लावत फिरत होते. बिहार, उ. प्रदेश, हरियाना इकडून देखिल वर्षभर त्यांना हजेरीसाठी निमंत्रणे येत होती. हिंदी बोलणारे कलावंत मराठी स्टेजवर (उत्सफुर्तपणे? ) यायला लागले आणि न विसरता "मी महारष्टियन आहे" असंही मोडक्या मराठीत सांगायला लागले. हा या वर्षीचा सकारात्मक बदल म्हणावा लागेल. काठ्या वाटपा पासून ते मार खाई पर्यंत अनेक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय आबू आझमींनी हजेरी लावली.

नोव्हेंबराला बाळासाहेबांवर टिका केली म्हणून शिवसैनिकांनी निखिल वागळेंना मारले. ते निर्भीड पत्रकार आहेत हे महाराष्टाला यावर्षी पुन्हा एकदा कळले. (९ वेळा हल्ला झाला तरी ते पत्रकारितेचा "हेका" सोडत नाहीत याला म्हणतात निर्भीड.) आम्ही निरपेक्ष, आम्ही लोकशाहीचा चोथा खांब म्हणताना "पेड पत्रकारितेवर" हा निर्भीड पत्रकार एक चकार शब्दही बोलला नाही.

महाराष्टासाठी अजून एक अभिमानाची बाब घडली. नितीन गडकरींना भाजपाचे राष्टिय अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. आता २०१० मध्ये त्यांनी स्वतःचे पोट कमी करून आपल्याला मान आहे हे दाखवून दिले पाहिजे.


अश्या कैक राजकीय घटना या वर्षी होवून गेल्या. महाराष्टाचा "विकास" झाला असं म्हणण्यासारखं विशेष असं काही ह्या वर्षी घडलेलं दीसलं नाही. वर्ष संपले, महाराष्ट मात्र परत तस्साच राहिला.

तुकोबांची देहू

ह्या आठवड्याचा शनिवार तुकोबामय होता, अजूनही मनात त्याच गोष्टी घोळत होत्या म्हटलं चला एकदा ते सारं उतरून टाकूयात.

आई-दादा,खेडेकर काकू, रुपालीसह नील, भजन शिकणारी छोटी मंडळी समृद्धी, निशांक, निनाद आणि निर्मिती हि सरासरी दुसरी-तिसरीतील छोटी मंडळी. त्यांना संत तुकाराम पाहायचा होताच पण भंडारा हा डोंगर आहे आणि आपल्याला डोंगरावर जायचे आहे म्हणून आतून खूश होती. भंडारा ला ते वारंवार भराडी म्हणत होते. (भराडी नावाचा एक डोंगर आमच्या गावी आहे म्हणून)

जिथे तुकोबांची गाथा बुडविली त्याच ठिकाणी साऱ्यांनी पवित्र भावनेने पाणी पायावर घेतले. जिथे पवित्र गाथा बुडविली, जिथे ती पुन्हा बाहेर आली तिथेच ४-५ देहुकर बाया "तुकारामाशी घेणे-देणे नाही, आमचा धुणं धुण्याशी मतलब" अश्या सामूहिक निर्विकारी भावनेनं गोधड्यांची घाण धुण्याचं कर्म करत होत्या. त्यांमुळे रुपालीने सांगूनही मी पाण्यात उतरलो नाही. दादांनी मुलांना तुकोबरायाची जमेल तसी "बायोग्राफी" सांगायला एव्हाना सुरुवात केलेली होती.

गाथा बुडविल्यानंतर तुकोबराय अन्नपाण्यावाचून १३ दिवस ज्या शीळेवर बसले होते तीही शेजारीच आहे. आता तिथे विठू-माउलीचं छोटंसं मंदिर आहे. "मग गाथा पाण्यात का बुडविल्या? " ह्या मुलांच्या प्रश्नाला मला तितकंसं योग्य उत्तर देता आले नाही पण मी वेळ मारून नेली.

त्याच्या शेजारी ह, भ. प. पांडुरंग घुले यांच्या प्रयत्नातून साकारलेलं "गाथा मंदिर" आहे. मध्यभागी तुकोबरायांचं ६/७ फूट बैठं शिल्प आहे. मंदिरातील दोन्ही मजल्यांवर गाथेतिल अंदाजे ५००० अभंग कोरलेले आहेत. पण ते वाचणारे फारच कमी होते. (एवढे अभंग कोरण्यापेक्षा दृश्य (चित्र, शिल्प) स्वरूपात ते लोकांसमोर ठेवले असते तर ते लवकर आणि जास्त लोकापर्यंत पोहचले असते अशी प्रतिक्रिया मी आमच्यातच नोंदवून दिली). नरसिंहाने फाडलेला हिरण्यकशपू, प्रल्हादावरचे अत्याचार,विष्णू, रामाने सेतू बांधण्यासाठी सागरास केलेले आवाहन ही ३ शिल्पे आहेत.. अप्रतिम आहेत ती. पण ह्या शिल्पांचा इथे काय संबंध असा मूळ प्रश्न कैक जणांच्या मेंदूत येतो, माझ्याही आलाच. ( नरसिंह, राम हे विष्णू अवतार आहेत, विठ्ठल म्हंजे विष्णूचेच एक रूप असा मी साधा संबंध लावला, आणि तो खराही निघाला. ) शिल्पांची इत्थंभूत (मला माहीत होती तेवढी) माहिती इतरांना देण्याच काम मी चोख केले आणि इथून बाहेर पाडण्यापूर्वी नील ने माझ्या पैंटवर "ओला प्रसाद" देऊन मला धन्यवाद देण्याचं काम चोख केलं.

गाथा मंदिरानंतर आम्हाला (मला) निळोबाराय भेटले, तुकोबांचे हे आवडते शिष्य मला तुकोबांपेक्षाही सहज भावले. हेच ते निळोबाराय ज्यांच्या साठी तुकोबा पुन्हा धरतीवर आले होते. तुकोबांनी सदेह वैकुंठ गमणं केल्यानंतर, इंद्रायणी काठी जिथे गाथा परत सापडल्या होत्या त्याच ठिकाणी संत निळोबाराय तुकोबांच्या भेटीसाठी अन्नपाण्यावाचून बसले. साक्षात विठ्ठल त्याच्या समोर प्रकट झाले तर " तुला कुणी बोलावले?, मला फक्त माझ्या तुकोबांनाच भेटायचे आहे" म्हणत त्यांनी डोळे बंद केले. आणि शेवटी तुकोबांना यावंच लागलं. तुकोबांपुढे भगवंतालाही डावलणारा, दुय्यम स्थान देणारा हा निस्मिम भक्त मनाला अलगद भिडला.

इंद्रायणीचे पाणी आळंदीपेक्षा इथे मात्र शुद्ध आहे. बोटिंगची सोयही आहे. पण आम्ही ती सोय न वापरता पैसे आणि वेळ वाचवला.

इथुनच खेडेकर काकुंनी नील ला "मायेने" खेळणं घेतलं, दोन दिवस झालेत अजून ते त्याने तोडलं नाहि.

देहुतिल मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील गरूडावर बसलेल्या तुकारामांकडे पाहताना मुलं "आरे हे ह्या गरूडावर बसून गेलते काय? " म्हणून विचारत होती. दर्शन जरा घाईतच झाले, पण तुकाराम आणि शिवराय याची जिथे भेट जाली तिथे मात्र मी आवर्जून थांबलो.

बाजारपेठेकडे पाहताना त्या मुंबाजीचा वाडा आणि वंशज पाहण्याची सुप्त इच्छा जाली होती, पण विचारायचे कसे आणि कुणाला हे कळत नव्हते.

इंद्रायणीचा वन वे ब्रिज पार करून भंडारा गाठला. मध्येच संत जगनाडे महाराज, ज्यांनी तुकोबारायांचे सारे अभंग लिहले त्यांचे सुदुबरे गाव लागले. घाट मस्त आहे. डोंगरमाथ्यावरून पिंपरी-चिंचवड, चाकण आणि मावळ तालुक्याचा मस्त एरिअल देखावा दिसतो. उत्तरेला भाम डोंगरही दिसतो. ह्याच डोंगरांनी तुकोबांना हवा असलेला एकांत दिला होता. ह्या दिवसात तिथे सप्ताह चालू असतो. मंडपात प्रवचनकाराचे आध्यात्मिक डोस चालू होते, मंडपाबाहेर आम्ही भेळ-बिस्किटांचा अल्पोपाहार करत होतो. पूर्वी इथे काळ्या कौलांचा मोठा वाडा होता त्यात तुकोबराय, विट्ठल-रुक्मिणी इ. मुर्त्या होत्या. तो जतन करायच्या ऐवजी सरकारने वाडा पाडून सिमेंट मध्ये बिनकळसाचे मंदिर बांधून आपला आध्यात्मिक दृष्टिकोन दाखवून दिला आहे.

चला.... जीवनातिल अजून एक दिवस सार्थकी लागल्याचा आनद अजुनही आहेच.

कबीर- तेजाचा उत्सव.

संत कबीर आपल्या मुक्तीचा उत्सव प्रकट करताना म्हणताहेत.


लाली मेरे लाल की, जित देखू तित लाल।
लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल ॥


जो अनुभवता येतो पण शब्दात उतरवता येत नाही असा ब्रह्मानंद, कबीर इथे रंग-प्रतिमाच्या माध्यमातून साकारताहेत.

लाल रंग म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा उत्सव!! आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, आत्मा हा परमात्म्याचाच साक्षात्कार आहे. हा अपूर्व सोहळा ते फक्त "लाल" रंगाच्या प्रतिमेतून जिवंत करू पाहताहेत.

परमात्मा, परब्रह्म "तेजाचा संचय" आहे. साहजिकच ते तेज साध्या डोळ्यांनी पाहणे किंवा हदयात साठविणे अशक्यच आहे. आणि म्हणूनच प्रत्येक भक्त ह्या "तेजाला" रंग, रूप, आकार, गूण देऊन आपल्या-आपल्या देवतेच्या रूपात पाहतो. (कुणी त्याला ईश्वर, कुणी बुद्ध, तर कुणी येशूचं नाव देतं). तेजाचा साक्षात्कारही मग आपण याच रूपात अनुभवतो.

तेजाचा अनुभव म्हंजे "शुद्धतेचा अनुभव".

कबीर हे पुर्वजन्मी शुक मुनी होते, त्यामुळे या ज्ञानी संताची सुररवातच निर्गुण साधनेने झाली होती. मुक्ताई, ज्ञानदेव, सौपण, निवृत्ती ह्यांनाही हे ज्ञानपण जन्मताच लाभले होते. हनुमंताने जन्मातच सूर्यबिंबाकडे झेप घ्यावी, उड्डाण घ्यावे असी ही जन्मजात पुण्याई.

अशी हि पुण्याई फार थोड्या महायोग्यांच्या वाट्याला येते. कबीर त्यापैकीच एक. ते प्रभू रामचंद्रांकडे चरित्र, चारित्र्य, गुण यांपुढेही जाऊन एक निखळ ब्रह्मानंद म्हणून पाहायचे.

परमात्म्याचं तेज पाहता पाहता ते स्वतःच त्यात विलीन होताहेत,...... एकरूप होताहेत........ त्या तेजाचाच एक अंश बनून जाताहेत.



(हा दोहा मला प. पू. आण्णासाहेब मोरे, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी ह्यांच्या आध्यात्मिक लिखाणातून अर्थासह मिळाला, त्यातला सारांक्ष मी देतो आहे. साध्या शब्दांमागे दडलेला प्रचंड अर्थ असंच मी ह्या दोह्याबददल म्हणेन.)



सचिन, नारायणांव, पुणे, १९/१२/२००९

कबीर -बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.

.
मुंड मुंडाए हरी मिले सब कोई ले मुंडाय,
बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.

हा "मुंडणावरिल" अजून एक दोहा आमचे एक मनोगती शरद कोर्डे यांनी अर्थासह सुचवला. मलाही तो खूपच आवडला.
मुंडण (हजामत) करून परमेश्वरप्राप्ती होत असेल तर सर्वांनी मुंडण करावं. (पण लक्ष्यात घ्या) वारंवार केस (लोकर) कापल्याने (कापूनही) मेंढी स्वर्गाला जात नाही.
.
इथेही कबीर साधे, रोखठोक आणि सहज पटणारे उदाहरण देऊन प्रबोधन करताहेत की वैकुंठप्राप्ती साठी असल्या कर्म-कांडांची काडीमात्र गरज नाहीये. त्यात उगाच जीवन व्यर्थ घालवू नका.
.

(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

सचिन, नारायणगांव, १6/१२/२००९.

कबीर- केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार.

केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार

मन को काहे न मुंडिए, जामें विषे विकार.
.

कबीर ह्या दोह्यातून समाजप्रबोधनाबरोबरच तत्कालीन दृष्टचालीरितींवरही टिका करत असावेत असे वाटते.

कबीरजी वेद, कुराण, धर्म ह्या गोष्टी बाजूला ठेवून, निसर्गनियमाला धरून आपल्या स्वतःच्या तर्काने प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायचे. त्यांचा जन्म जरी ज्ञात नसला तरी कालावधी १४४०-१५१८ हा होता. त्याकाळी स्त्री विधवा झाल्यास, भावकीतिल कुणी मृत झाल्यास किंवा कुठल्याही धार्मिक हेतूने मुंडण करणे बंधनकारक होते. चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथातही दीक्षा घेतलेल्या साध्वींना मुंडासे करावे लागते. क्रित्येक भट-भिक्षुकही ज्ञानधारनेसाठी मुंडण करीत. केस अपवित्र झालेत, सुतकी झालेत म्हणून धर्म सांगतो म्हणून आपण त्यांचे मुळासकट उच्चाटन करतो, तेही वारंवार. पुजारीही देवप्राप्तीसाठी सदैव मुंडण करतात. कबीर नेमकेपणाने इथेच बोट ठेवताहेत. तसं पाहिले तर केसांनी शरीराचं काहीही बिघडवलेलं नसते, तरीही आपण आपलं पावित्र्य, इस्वरप्राप्ती, ध्यान-ज्ञान इ. इ. साठी विनाकारण केसांचे उच्चाटन करतो.

पण... त्याच शरीराचा एक भाग असलेलं मन की ज्यात वेळोवेळी दूषित, अपवित्र, विषारी, विषयी (भौतिक) विचार जमा होतात. षड्रिपूंचे वास्तव्य तेथेच असते. अध्यात्माच्या सानिध्यात गेल्याने तात्पुरते हे सारे मनविकार साफ होतातही पण पुन्हा ते जोमाने वाढू लागतातच. आणि म्हणूनच केसांना दोष देत त्यांचे शंभर वेळा मुंडण करण्यापेक्षा ह्या विषारी मनाचे सतत मुंडन व्हायला हवे, मगच तुम्ही पवित्र व्हाल, ईश्वराच्या जवळ जाऊ शकाल.

(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

सचिन, नारायणगांव, ११/१२/२००९.

कबीर - चलती चक्की देखकर ..

चलती चक्की देखकर दिया कबीरा रोए,
दुई पाटन के बीच में शाबुत बचा ना कोए.


कबीर ह्या दोह्यातून निसर्गाचं एक विदारक पण वास्तववादी सत्य मांडताहेत. चक्की म्हंजे जाते, जे जुण्याकाळात धान्य दळण्यासाठी वापरलं जायचं. त्याला दोन पाटे (पाटन किंवा चाके) असतात, एक जमिनीत स्थिर असते तर दुसरे त्यावर गरगर फिरत असते. चलती चक्की प्रमाणे हे जीवन गतिमान आहे, आणि त्यात शाश्वत असे काहीही नाही. सारं काही त्यात भरडले जाणार आहे, असाच साधा अर्थ आपणास कळतो.
पण.....,
कबीरा फिरणारं जातं पाहून रडताहेत कारण..... ..
त्यांना याद्वारे निसर्गातील एक अन्यायकारी सत्याची जाणीव झालीय. पृथ्वी आणि आकाश या निसर्गाच्या दोन चाकांमध्ये जे काही येईल मग सुख- दुःख, प्रेम-राग, न्याय-अन्याय, मान-अपमान सारं काही भरडून निघणार आहे. इथे दुर्जनाबरोबर आणि "दुर्जनांप्रमाणेच" सज्जनाचाही शेवट ठरलेला आहे. (सुक्या बरोबर ओलं ही जळते) दोघांनाही अंतिम न्याय एकच आहे. निसर्गाची गती शाबूत ठेवण्यासाठी हा "बदल" आवश्यकच आहे ह्या अगतिकतेमुळे कबीरांना वाईट वाटते आहे.
.
जीवनातील अश्वाश्वतता आणि गतिशीलता दाखविण्यासाठी सामान्य, साध्या जात्याचं उदाहरण देतात. बऱ्याच वेळा ते बहिणाबाईंसारखेही वाटतात.
.
(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ मी देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

कबीर- तेरा साई तुझमें.

जैसे तिल में तेल है जो चकमक में आग,

तेरा साई तुझमें है तू जाग सके तो जाग.


कैक वर्ष माणूस देव, अंतिम सत्य, आत्मा या गोष्टी शोधू पाहतो आहे, कबीरजीं ह्या दोहयातून भगवंत आहे, आणि त्यापर्यंत पोहचता देखिल येते, हे सत्य सउदाहरण सांगताहेत.

जसं बि (तिल) मध्ये तेल असते, ते आपणास बाहेरून दिसत नाही. तसेच गारगोटी (चकमक) बाहेरून निर्जीव वाटते, पण एकमेकांवर घासल्यास त्यातून आगीच्या ठिणग्या बाहेर पडतात. म्हणजे गारगोटिच्या आतही ऊर्जा, चैतन्य असते आणि तेच अंतिम सत्य आहे.

अगदी त्याचप्रमाणं, तू ज्या ईश्वराला शोधण्यासाठी अहोरात्र, दाहिदिशा फिरतो आहे, तो तुझ्या आतच आहे. आणि म्हणून तू जागा हो, स्वतःच्या मी पणातून बाहेर ये, आणि तुझ्या आत, अंतर्मनात त्याचा शोध घे. तुझं बाह्य रूप म्हणजे तू नाहीसच हे तुला आपसूक उमगेल. हनुमंताने नव्हते का त्याच्या प्रभूला अंतर्मनातच शोधले.

ईश्वर बाहेर सापडणे अशक्य आहे कारण तो आपल्या आतच वास्तव्यास आहे. त्याला इतरत्र शोधण्यात मिळालेलं जीवन वाया घालवू नकोस, अन्यथा तू सदैव असत्याच्या गाढ झोपेतच राहशील अशी "जाग सके तो जाग" म्हणून दाट समजही देताहेत.

चला आपणही दिवसातून कधीतरी, दोन क्षण का होईना अंतर्मनातील ईश्वराला शोधण्या साठी नक्की देऊयात.

(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ मी देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)

नील - वय वर्षे ६ महिने.

नील, आता सहा महिन्याचा झालाय. सहा महिने चिमणपाखरासारखे कसे भुरकणं निघून गेले हे कळलेच नाही. तो या जगात प्रवेशीत व्हायच्या अगोदरच आम्ही त्याचं नाव ठरवून ठेवलं होतं, कसे कुणास ठाऊक पण रुपालीला (प्रत्येक स्त्री प्रमाणे) मनोमन वाटायचं की मुलगाच होणार म्हणून. आमच्या घरातील साऱ्या मुलांची नावे "नि" ने चालणारीच आहेत, म्हणजे निशांक, निनाद, निर्मिती...... आणि आता नील.
.
नील म्हंजे निळा किंवा एक रत्न असा साधा अर्थ माझ्या मनी होताच. त्याच बरोबर नल-नील ह्या रामायणातील व्यक्तिरेखाही आहेत. पुराण काळात भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ज्ञ होते. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते होते. प्रभू श्रीरामाला लंकेत प्रवेश करण्यासाठी "रामसेतू" बांधण्याची संकल्पना पुढे आली. रामसेतू बांधण्याचं कार्य नल आणि नील या वास्तुतज्ञांनी विश्वकर्माच्या मार्गदशनाखाली केलं होतं. स्वर्गाचा अधिपती इंद्र याच्या कानातील मण्याला "नीलमणी" किंवा "नील" असही म्हटले जाते.
हनुमंताने संजीवनी वनस्पती साठी द्रोणागिरी पर्वत उचलून नेताना त्याचा काही भाग खाली पडला, तो पडलेला भाग म्हंजे "पुरंदर" किल्ला. पुरंदर म्हंजे इंद्राचेच एक नाव. पुराणात या किल्ल्याचा उल्लेख "इंद्र नीलपर्वत" असाच आहे. पुराणकालीन संदर्भ असल्याने आम्ही हेच नाव फिक्स केलं. तसेच नील आर्मस्ट्रॉग, नील मुकेश हि आलिकडची नावेही माहीत होतीच.
.
३ किलो असलेला नील आज ७ किलोचा झाला आहे. सुरवातीला तो नुसताच प्रकाशाच्या दिशेने टक लावून पाहायचा, आवाज झाला की जागीच हालायचा. आता मात्र आवाजाचा दिशा हि तो ओळखतो आहे. आपल्याला "नील" म्हणतात हेही तो ओळखतो, कारण नील म्हटलं की तो नक्की वळून पाहतोच आणि हलकंसं हसून किंवा हुंकार देत प्रतिक्रियाही देतो. एकटाच छताकडे पाहत खेळत बसतो,रडणं अगदीच कमी. पण आता हळूहळू हट्टी व्हायला लागलाय, त्याच्या हातातील वस्तू, खेळणं काढून घेतलं की त्याला प्रचंड राग येतो. बाहेर, टेरेसवर फिरायला नेलं की येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट-टेललाईट त्या दिसेनाश्या होईपर्यंत पाहत राहतो. आई त्याला कसली तरी बडबड गीतं (स्वतःच्या रचना) एकवीत असते. म्हंजे "कावू, कावू ये ये, नीलला खाऊ दे दे वैगेरे वगैरे. तसा तो ओळख विसरत नाही, परवाच माझे वडील २ आठवड्यांनातर आले होते, त्यांच्याकडे कित्येक वेळ विचित्र नजरेनं पाहत होता, ओळख आठवण्याचा प्रयत्न करीत होता, ओळखल्या नंतर मात्र बाबांशी जाम हसायला, खेळायला लागला. कानाजवळ हलूच आवाज केला तर लहान मुलं झोपेत देखिल हसतात हे एक नवलच आहे.
.
ऑफिस मधून घरी गेल्यावर मी त्याला झोपेतून हमखास जागा करतो, आणि मग त्याची झोप मोड केली म्हणून त्याच्या आईचा शाब्दिक मार खातो.

आधार

[कल्पी नामक ओर्कुटिने याचा पूर्वार्ध लिहिला होता.... मी माझ्या मनातील "हा" उत्तरार्ध त्यास जोडला. कारण कुटुंब, बायका-पोरं, आई-वडील यांच्या साठी वेळ न देता कामात अहोरात्र व्यस्त राहणाऱ्यांवर माझा राग आहे.... ]
.
राजन खूपच महत्त्वाकांक्षी बनला होता. स्वतःचा टुमदार बंगला त्याला स्वप्नात दिसायचा. कधी स्वतःच्या गोल्डन बेंझ मधून, अनिता आणि संपदांसह भरधाव धावेल असे त्याला झाले होते. त्याच साठी त्याला पैसाची आस लागली. एप्रिल जवळ आला होता. बिचारा राब राब राबायचा, रात्री उशिरा घरी यायचा, जेवणाच्या टेबलवारही लैपटोप वर कामात मग्न असायचा. तसं त्याचं अनितावर उतू जाईपर्यंत प्रेम होते. पण त्या साठी त्याच्याकडे सध्या वेळ नव्हता. बॉसनेही मग राजनच्याच बोकांडी जास्तीत जास्त कामाचे ओझे टाकायला सुरुवात केली. कंपनीच्या अपेक्षा पूर्णं करणे अवघड होवू लागले, ओझ्याने राजन चे शरीर चेपले, अन मानसिक ताणाने मन. त्याला धड झोपही लागणे अवघड होवू लागले. राजन जाळ्यात पुरता गुरफटून गेला. तरीही त्याचे अनितावर प्रचंड प्रेम होते. आपलं सैंडवीच होतेय हे त्याला बोचत होते. त्याच स्वप्न त्याच्या पासून दूरदूर पळत होती, मृगजळा सारखी.
.
अश्याच एका रात्री उशिरापेर्यंत थांबून तो घरी जात होता. आज बॉसने त्याची खरडपट्टी केली होती. नको तितकी, नको त्या शब्दात. तरीही त्याला मूग गिळून थांबावे लागत होते. डोळे चरचरत होते, रस्त्याच्या प्रकाशानेही डोळे चमकायचे, दुखायचे. पुढचं दिसायचंही नाही. कंपनीच्या कार मध्ये बसताना मात्र त्याला आज काहीतरी भयानक रुतत होतं.... अनिता, संपदा, घर यांजबरोबर आपल्या स्वप्नांपासून प्रचंड दूर गेल्याची घरघर त्याच्या मेंदूत चालू झाली. मनावर हरल्याचा दबाव येऊ लागला....आवेगाने त्याच्या मनाचं संतुलन ढासळत होतं, परत सावरतं होतं. वेग वाढतोय, नव्हे तो नेहमीपेक्षा किती तरी जास्त आहे हे त्याच्या ध्यानी येण्याइतपत शांत तो नव्हताच. कुठल्याश्या दबावानं मन मोकाट सुटलं होतं. पिसाळलेल्या कुत्र्यासारखं.....सुसाट, दिशाहीन, तंद्रीत........ आणि अचानक समोरून येणाऱ्या डंपरचा हेडलाईट राजंनच्या डोळ्यावर चमकला. स्वप्न, वेग, मन सारं त्याच्या नियंत्रणाबाहेर गेलेलं होतं, केव्हाच..!!!
स्वप्नांच्या aया जीवघेण्या प्रवासात केव्हा थांबायचे, केव्हा परतायचे हे त्या बिचाऱ्याला कळलेलंच नव्हते.
.
.
आज, दोन वर्षांनी, अनिता पडवीत उभी राहून झाडाभोवती गुरफटलेल्या वेलीकडॆ बघत होती. नाजुक वेल आधार मिळाला म्हणून सरळ सरळ वाढायला लागली नाहीतर जिकडे रस्ता मिळेल तिकडे बेधुंद माणसाप्रमाणे पसरली असती.
वेलीला आपली सर्वात जास्त आणि नितांत गरज आहे हे त्या झाडाला पक्कं माहीत असावं, नाहीतर "आधाराविना" ती वेलही जमिनीवरच विखुरली असती.
.
सचिन, नारायणगांव, पुणे, २७/११/२००९

निखिल वागळेंची पत्रकारिता?

निखिल वागळेंना मी जेव्हा पासून पाहतोय, वाचतोय तेव्हांपासून मला ते "क्वचितच" कधीतरी निःपक्षपाती वाटले. काही ठराविक लोकांबद्दल ते नेहमीच पुर्वग्रहदोषानेच आणि राजकीय हेकेखोरपणे बोलतात. सामनाही निःपक्षपाती नाही पण तो तसे असल्याची खोटी भूलही देत नाही.
.
काल निखिल वागळेंवर झालेला हल्ला (जो कधीतरी होणारच हे पक्के होते) हा समस्त त्या जातीच्या प्रत्रकारितेवर झालेला हल्ला होता, जी पत्रकारिता तोंडपाटीलकी करत आपलीच सत्ता चालवू पाहते. सातत्याने एकालाच टीकेचे लक्ष करते, ठराविक पक्षाला झुकते माप आणि एखाद्या पक्षाचा द्वेष. बातमीचे, एखाद्या घटनेचे यथार्थ(जसेच्या तसे) वर्णन देतानाही स्वतःच्या मनाचे कलुषित रंग त्यात "बेमालुमपणे" मिसळूनच दिली जाते. विश्लेषण, विवेचन, निष्कर्ष, उपाय सारं काही हेच करून मोकळे होतात. जनता फक्त पाहतच राहते. जनतेच्या रोजच्या जेवणात हळूहळू पण सातत्याने हा विष प्रयोग केला जातो आहे. स्वतःला "बुद्धिजीवी" आणि "निःपक्षपाती" म्हणवून घेणाऱ्या ढोंग्या पत्रकारांनी हे ध्यानी टेवावे. इतके दिवस वागळे सेना, भाजपा, बालासाहेब, मनसे, उद्धव, राज यांच्यावर हल्ला करत होते, काल सेनेने वागळेंवर हल्ला केला. वागळेंनी दूषित शब्दांनी हल्ला केला तर सेनेनं काठ्यांनी.
.
माझी ही ९ वी वेल आहे मार खाण्याचे असे ते गौरवाने सांगत होते, प्रत्येक वेळी आपलीच "धुलाई" का होते ह्याचा त्यांनी जरा "मी" पणाच्या बाहेर येऊन विचार करायला हवाच. पत्रकारिता म्हंजे खूप सोज्वळ मार्ग आहे असे आजचे चित्र बिलकुल नाही, पेड पत्रकारिता हा यांचा पैसा कमाविण्याचा सोपा मार्ग. पैसे घेऊन हे एखाद्याला प्रतिष्ठित बनवून जनतेपुढे पेश करतात तर एखाद्याला प्रतिष्ठितावर चिखल फेक करतात. पुढारीच काय पण पोलिसाकडूनही बंद पाकिटं घेणारे चालू पत्रकारही मी पाहिलेत. आम्ही म्हंजे स्वच्छ, आम्ही म्हणजे लोकशाहीचा ४था स्तंभ, म्हणत यांची मिलिभगत चालू असते. त्यांच्या विरुद्ध आवाज उठविला की सारे "स्वातंत्र्य" नावाखाली एकवटतात. वागळेंनी तर सरळ मुख्यमंत्र्यांना "राजकीय" दम भरला आहे की राऊतांना अटक करा नाही तर मी याला राष्टिय नाही तर आंतरराष्टीय इश्यू बनवील.
मराठी संपादकावर हल्ला, मराठी वाहिनीवर हल्ला, मराठी पत्रकार, मराठी केमेरामन, मराठी रिसेस्पशनिष्टवर हल्ला असं वारंवार ओरडून ते "हा हल्ला मराठी माणसावर आहे" असे काहीतरी "भासवत" होते ... ढोंगी पत्रकारिता म्हणतात ति हिच.
.
वागळेने त्याच्या पत्रकारांना चिथवणी दिली आणि नतर त्यांनी काही शिवसैनिकांना मारहाणही केली.
सेनेला हिंसावादी आणि स्वतःला वागळे अहिंसावादी म्हणवितात ना मग एका गालात मारली तर त्यांनी दुसरा गाल पुढे करायला हवा होता. याउलट ते आपल्या कामगारांनी शिवसैनिकांना मारून जश्यांस तसे उत्तर दिले हे अभिमानाने सांगत होते. याचा अर्थ इतर र्वेळी जे स्वतःकडे गांधीजीच्या तत्त्वाची मक्ते दारी घेतात आणि तोंडपाटीलकी करतात, तेच खरे ढोंगी आहेत..
.
.
सचिन, नारायणगांव, पुणे, २३/११/२००९.

जाहीरनामा-- - रद्दीत जमा.

जाहीरनामा म्हंजे तो पाळलाच पाहिजे असे काही बिलकुल नाही. किंबहुना "न पाळणाऱ्या आश्वासनांची जाहीर यादी" म्हणजे जाहीरनामा. (जो निवडणूकीनंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकायचा असतो. )

मागच्या जाहीरनाम्यात फुक्कट वीज देतो असा लिखित शब्द आघाडीने दिला होता, पाळला नाही, (फुक्कटच काय पण विकतही २४ तास वीज देण्याची यांची लायकी नाही हे नंतर कळले. ) वर "अश्या थापा निवडणूकीच्या तोंडावर मारायच्या असतात, त्या पाळण्यासाठी थोड्याच असतात" हेही विलासराव आणि सुशिलभाउ या हंसाच्या जोड्याने स्वच्छ अश्या निर्लज्जपणाने हसत सांगितले होते, त्याचबरोबरीने "२००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करू" हेही आश्वासनही ती "प्रिटींग मिस्टेक" म्हणत झटकले होते, तेव्हाच जाहीरनामा पाळण्यासाठी नसतोच हे आम्हांस पटले. (पण मग, तो का छापतात ते कळत नाही)


यावेळी जरा नवीन शक्कली लढवल्यात,म्हंजे मागच्या वेळी गूगली टाकली होती आता गुल्ले पिसलेत.


जनतेला डायरेक्ट "लखपती" करण्याचे आश्वासन आघाडीने दिले आहे. ३५-४० हजार दरडोई उत्पन्न १ लाखांपर्यंत वाढविले जाणार आहे. (ते कसे? ते अजून ठरविलेले नाही.... शेअरबाजार, सट्टाबाजार, मटका नाहीतर जुगारात पैसा लावला तर १ लाखाचा आकडा नक्की गाठता येईल)
यावेळीही पुन्हा फिरून त्याच भोपळे चौकात येत सालाबादप्रमान "भारनियमन मुक्त महाराष्टाची" घोषणाही त्यात आहेच. (पुढच्या किती निवडणुकांत हे तोंडीलावायला असेल कुणास ठाऊक? )
५ वर्षात १० लाख घरे बांधणार हेही एक आश्वासन आहे. (आणि त्या घरांत ५० लाख जनता राहणार) चांगले आश्वासन आहे पण १० लाख जरा अतीच झाले नाही का? ( कदाचित १ काचे प्रिटींग मिस्टेकंमुळे १० झाले असावेत, तरीही हि मिस्टेक मतदानानंतर मान्य करणार असतील)
पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असाही एक विचित्र मुद्दा त्यात घुसडलेला आहे, तो कशासाठी हे काही मला कळले नाही बुवा. (म्हंजे मतांचा आणि त्याचा संबंध असेल असे वाटत नाही म्हणून)
शिवराय, आंबेडकर यांचे सागरी स्मारक उभारणार, हे मात्र छान गाजर दाखवले आहे. पुतळ्यांमध्ये ३००-३०० करोड घालायला पैसा आहे, विदेश दोऱ्यांसाठी पैसा आहे, स्वतःच्या सुरक्षेसाठी पैसा आहे, मग गरीबांना, शेतकऱ्यांना द्यायच्या वेळीच तिजोरीत खडखडाट का असतो बरे?
शेतकऱ्यांना ३% व्याजाने कर्जे देताहेत, अगोदर त्यांची कर्जेमाफीची मागणी तर पूर्णं करा.
मुलींना जन्मताच सव्वालाख रु देणार. (इथेही युतीच्या वचननाम्याची ढापा ढापी) ह्या साठी दरवर्षी कमीत कमी ३०० करोड वेगले टेवावे लागतील याचा विचार कोण करणार?

अजूनही बराच २१ कलमी कार्यक्रम आहे, असल्या हास्यास्पद जाहीरनाम्यामुळे आघाडीचाही कार्यक्रम लागू शकतो.
महाराष्टात जी लाखो बेरोजगारांची फौज तयार होते तिच्यासाठी मात्र इथे जागा नाहीच. कदाचित ते सैन्य ते प्रचारासाठी राखून ठेवणार असतील...

सचिन, नारायणगाव, पुणे.
(इमेजस सोज्यन्य - ग्रफिटी.)

रिडालोस - कशासाठी? कुणासाठी?

राज ठाकरेंनी मनसे ची स्थापना करून एव्हाना २ वर्षे झाली होती. इथपर्यंत सारं काही आलबेल होतं.
पण.....
"महाराष्ट माझा" म्हणत "मराठीपणासाठी" मनसेने आंदोलने पेटवायला सुरुवात केली आणि हुशार कांग्रेस नेत्यांनी इथेच दुरचा विचार करून सुमडित राजकीय डाव टाकायला सुरुवात केली. हि मराठीपणाची आग "पाहिजे तेवढी" आणि "पाहिजे तशी" फोफावी म्हणून मुद्दामहून कॉग्रेसनेच कारवाई करण्यास वेळ लावला हे सर्वश्रुत आहेच. त्यावर आगीत तेल ओतणारे निरुपम, क्रुपाशंकर यांसारख्या आपल्याच तोंडपाटिल नेत्यांची "वाजती घंटा" अहोरात्र वाजवत ठेवली. ज्या मराठी टक्क्यांच्या भरवशावर शिवसेना आणि राष्टवादी सत्तेच्या जवळ जाऊ पाहत होते त्या मतांचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करून त्या दोन्ही "महाराष्टिय" पक्षांना शह देण्याची हि "तिरकस" चाल होती.
सेना, राष्टवादिनेही या चालीकडे काहीसे दुर्लक्षच केले होते.
पण.......
काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत मनसेने अनपेक्षित प्रमाणात "मराठी" मते गोळा करून "कांग्रेशची चाल" किती अचूक होती याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कांग्रेस नं. १ तर राष्टवादी चोथ्या स्थानाला फेकला गेला आणि....... शरद पवार खाडकन जागे झाले. राष्टवादिच्या अस्तित्वावर शंका घेतली जाऊ लागली, विलिनीकरणाची मागणीही झाली.
आता....
कांग्रेसच्या या "तिरकस" चालिला, कांग्रेसच्यच तंबूत राहून, काहीतरी " वाकडी चाल" करून शह देणे गरजेचे होते अन्यथा येणाऱ्या विधानसभेत राष्टवादिची घसरणं थांबविणे अवघड आहे हे पवारांच्या ध्यानी एव्हाना आलेले होतेच.
आणि...... मग शोध चालू झाला वाकडया चालीसाठी वापरायच्या घोडयाचा.... घोडाही ठरला आणि चाल हि.
.
पवारांनी वाकडी चाल खेळण्यासाठी पटावरचे आपलं नेहमीचं, अगतिक असलेलं प्यादं हातात घेतलं. शिर्डीतल्या दारुण पराभवामुळे का होईना पण, त्यांच्यात शिल्लक राहिलेल्या स्वाभिमानाने (? ) लाचारीवर मात केली होती. कांग्रेसकडून पुरते फसवलो गेल्याची पीर-पीर, धुस-फुस दलित नेत्यांमध्ये चालू होतीच. कॉग्रेसची परंपरांगत असलेली "दलित" आणि मुस्लिम मते तोडण्यासाठी ह्यापेक्षा उत्तम प्यादे आणि ह्यापेक्षा उत्तम वेळ(संधी) ह्या राजकीय डावात नाही हे ओळखूनच ह्या प्यादाला वजिराची वस्त्रे चढवून "रिडालोस" ची स्थापना करवून घेण्यात आली.
आता हा वजिर कांग्रेसच्या राजाला शह देण्यास कितपत यशस्वी होतो यावर राष्टवादिचे यशापश बरेच आधारीत आहे.
.
"तुम्ही आमची गाय मारली आम्ही तुमचे वासरू मारू" ह्याच साठी हि नवी आघाडी आहे, हि पवारांचीच एक जातीय+राजकीय खेळी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पण निवडनुकीनंतर, मनसे शिवसेना-भाजपाच्या वळचनीला आणि आठवले मिळतिल तेवढ्या शिलेदारांसह परत कांग्रेस दरबारी मुजऱ्यास गेले तर पवारांच्या राष्टवादिचे भवितव्य परत दोलायमान होणार हेही नक्की.


(रिडालोस - रिपब्लिकन डावी लोकशाही समिती, नाव मुद्दाम नोंद करतो आहे कारण निवडणुका नंतर हिचे अस्तित्व टिकेल का या बाबत शंका आहे. )

सचिन, नारायणगाव, पुणे.

खुडुक पुढारी

कर्माने बदल घडो अथवा न घडो, पण काळाचं आपलं स्वतःच संक्रमण नेहमीच चालू असतं. सत्तेच्या खुर्चीची दावेदारी बदलण्याचा किंवा ती टिकविण्याचा काळ असाच दर ५ वर्षांनी येतच असतो... निवडणुक हे सत्तापरीवर्तनाचं लोकशाहीतील एकमेव साधन.

मंदिराच्या गाभाऱ्यात घुसताना दारातील कासवाला पायदळी तुडविणे अनिवार्य असते त्याप्रमाणेच सामान्य जनतेच्या भावना, आशा, देव, देश, संस्कृती पायदळी तुडवत भुईसपाट करतच ही राजकीय मंडळी विधानभवनात प्रवेशीत होतात. कोंबडीने अंडी आणि खुडुक राजकारण्यांनी खुर्च्या उबवाव्यात, त्यातून जन्माला आलेल्या त्यांच्या घरंदाज पिलावळींचे मन, मिशरुढ फुटायच्या आतच "बापाप्रमाणेच समाजसेवेला" वाहून घ्यायला हावरट झालेलं असते. काय तर म्हणे कलाकारांची मुले कलाकार, तसेच राजकारण्यांची मुले राजकारणी.. किती सोपं आहे नाही?.

सत्ता पुढाऱ्यावर स्वार झाली की सत्तेमुळे त्याचा मुजोरपणा वाढतो, असह्य गरीबांच्या पाठीवर कोरडे ओढण्यात जो माजलेला उन्मत्त आनंद असतो त्याचा ते पुरेपूर उपभोग घेतात. पुऱ्या मतदासंघात गुंडाराज करून धुमाकूळ घालणारे कैक आहेत. विधानभवनात जनतेच्या प्रश्नांना गावकुशीचा रस्ता दाखवून "थोबाडबंद" राहणारे म्हणजे तर कडीच. एकाच कामाचे आळी-पाळीने श्रेय लाटणारेही अनेक, आणि एकाच रस्त्याचे पाच-पाच वेळा नारळ फोडून "नुसतेच" उद्घाटन समारंभ करणारेही अनेक. "खादाड असे माझी भुख, चतकोराने मला न सुख" हा सदगुण तर फारच "सामान्य" आहे, नव्हे तर तो मूळ स्थायीभावच आहे. त्यामुळे नगरसेवक झाला रे झाला की त्याला आमदार/खासदार होण्याचे भुकेलेले वेध लागलेच म्हणून समजावे.
कुठेतरी वाचलं होतं, लाचारी, हुशारी, मगरुरी, निलाजरेपणा, क्रूरपणा या साऱ्याला दिखावुपणाची फोडणी, सत्यनिष्ठा आणि स्वाभिमान शून्य म्हणजे पुढारी. हे प्रताप साऱ्यांकडेच असतात म्हणूनच की काय "या" पिकाला प्रचंड "गळित" मिळते.
दुर्मिळ असले तरी काही पुढारी अजूनही "बरे" आहेत. त्यातल्या त्यात "बऱ्या" असणाऱ्याला "निवडणे" ह्या उपर आपण काय करावे?

हां.. सत्तापरिवर्तन जनताजनार्दनच करतो, पण सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची ताकद त्यात नसते, तो मूकच असते, बऱ्याच वेळा त्याची मुस्कटदाबी केलेली असते, त्याच्या खडखडाट झालेल्या पेटितं पेश्यांचं दान टाकून त्याच्या कडून मतांचा आशीर्वाद बळजबरीने घेतला जातो. ... मतदार म्हंजे एका रात्रीचा राजा, अन नंतर बोकांडी बोजा हे ठरलेलं.
शेवट काय तर... जनतेसाठी हे सारे खुडुकच.

(खुडुक म्हंजे अंडे न देणारी कोंबडी.)


images from- google images.

केविलवाणी राष्टवादी पार्टि. -विधानसभा २००९.


आघाडी व्हावी म्हणून राष्टवादिला आपल्या स्वाभिमानाची सारी कापडे बासनात गुंडाळून कांग्रेसचे उंबरठे झिजवावे लागताहेत. नाहीतरी सत्तेच्या मुजोरपणामुळे त्यांच्या स्वाभिमानाचे घमेंडीत रुपांतर झाले होतेच आणि म्हणूनच २००९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत जनतेने त्यांच्या कपड्यांचे लक्तरात रुपांतर केले.

लोकसभेच्या जागावाटपापुर्वी राष्टवादिने पवारांना पंतप्रधान पदाचे स्वयंघोषित उमेदवार जाहीर करून, कधी स्वबळाची भाषा करत, तर कधी शिवसेनेशी युती करण्याची धमकी देत कांग्रेसची हुर्ये केली होती. तरीही अवघे ८ (वजा १, म्हणजे उदयनराजे भोसले) खासदार असूनही कांग्रेसने परत शरद पवारांना कृषीमंत्री पद + बोनस २ मंत्रिपदे का दिली हे काही कळत नव्हते.
४ महिन्यांवर आलेल्या महाराष्टच्या विधानसभा निवडुनुका डोळ्यांसमोर ठेवून हे मंत्रिपदाचे जाळे शरद पवारांवर कांग्रेसने फेकले होते.
लोखंडाच्या सळईची एक बाजू बिचकुळ्यात अडकवली की दुसरी बाजू पकडून तिला हवे तसे वाकविता येते. पवारांना मंत्रिपदाच्या बिचकुळ्यात पकडून, राष्टवादिला क्यंटिलिव्हर प्रमाणे वाकविता येईल हे गणित जुन्या जाणत्या कांग्रेसच्या अभियंत्यांनी तेव्हाच केले होते हे नक्की. आघाडी नाही केली तर केंद्रातील मंत्रिपदे जाणार आणि केली तर वाट्याला कमी जागा मिळणार. खिंडीत पकडून आपली कोंडी करण्याचा प्रकार होणार हे ह्या जाणत्या राजाला उमगले कसे नाही हेच कळत नाही.? की पदरात पडणाऱ्या मंत्रिपदांच्या गाजर मोहामुळे त्यांना ते उमगलेच नाही, हे तेच जाणो....

त्यावर कहर म्हणून राष्टवादी हा विचारहीन पक्ष, कालबाह्य झालेले बुजगावणे इ. इ. असून त्याचे कांग्रेस मध्ये विलिनीकरण करा असे सल्ले दिग्विजयसिंहा पासून विलासरावापर्यंत साऱ्यांनी यावेळी मुद्दामहून दिले.

वेगळं अस्तित्व टिकविण्याच्या अट्टाहासाठी आर. आर आणि दादांना बरीच शाब्दिक सारवासारव करावी लागली. जेवणाच्या पंक्तीत वाढपे कमी आणि सूचना देणारे जास्त असा हा एकमेव पक्ष. पवारांनी भरमसाठ पुढारी तयार केले, तेही आपल्या अपेक्षांसह बंडखोरी करणारच.

सत्ते साठी लाचार, त्यासाठी घेतलेल्या कोलांट उड्या यामुळे राष्टवादी हा टवाळीचा विषय होवू पाहत आहे.

विदर्भ-मराठवाड्यात लोणच्या पुरताच असलेल्या राष्टवादीचा आता पश्चिम महाराष्टातही टांगा पलटी होवू पाहत आहे. ऊस, साखरसाठा, महागाई, किडका गहू इ. चे खापर पवारांवर फुटले आहेच. त्यात पद्मसिंह पाटलांच्या शौर्याची भर.
कांग्रेस कडून कितीही मानहानी होत असेली तरी "धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होवू नये म्हणून आघाडी व्हावी" असा ढोंगी पवित्रा आर आर आबा घेताहेत..
ज्या स्वाभिमानी मुद्द्यासाठी वेगळा पक्ष स्थापन केला तो मुद्दाच केव्हाच गळून पडला आणि अवध्या १० वर्षात त्यांचा स्वाभिमान पार लीन, मलिन झाला.
.
या साऱ्याचा फायदा कांग्रेस, आपल्यापद्धतिने पवारांवर कुरघोडी करण्यासाठी न करेल तर नवलच. लालू, पासवान, मुलायम यांच्यावरही थोड्याफार फरकाने हा प्रयोग झालाच आहे..... आणि यशस्वी ही झाला आहे.

सूर्यास्त - निळू फुले

निळू भाऊंचा पिक्चर म्हणजे बेरकी नजर, कुरघोडीचं कुटील राजकारण, सत्तेमुळे मुजोर झालेला गावचा सरपंच, स्वार्थानं माखलेला पुढारी नाहीतर मदमत्त झालेला हरामी पाटील हे गणित फिक्स ठरलेलं. असल्या ऐकाऐक व्यक्तिरेखेचे अनेक पैलू निळू भाऊ साकारायचे. मधल्या काळातील जवळ जवळ प्रत्येक चित्रपटाची कथा सारखीच असायची. निळू भाऊंच्या बऱ्याच चित्रपटात बलात्काराचा सीन हा ठरलेला असायचाच. ह्यावर विनोद करताना निळू भावू म्हणायचे " कथा तिच, बलात्कारही तोच, बाई हि तिच,..... कमीत कमी तिची साडी तरी बदला. "
.
लहानपणी त्यांचे चित्रपट पाहताना चित्रपटागणिक त्यांच्याबद्दलची द्वेषभावना, चीड वाढायची. त्याकाळी गावोगावी पुजा, पाची, बारसे, घरभरणी नाहीच झाले तर गणपतीत पडद्यावर पिक्चर पाहायला मिळायचे. निळू फुलेची पडद्यावर एंट्री झाली की आमचा रक्तदाब वाढायचा, श्वासोच्छ्वास इतका मंद व्हायचा की ह्या निळू फुले नामक व्हिलन पिक्चर मध्ये नसावाच असे वाटायचे, असला तरी त्याचा लवकरात लवकर खात्मा व्हावा म्हंजे आम्हाला राहिलेला पिक्चर स्वस्थपणे पाहता येईल असे मनोमन वाटायचे.
बाया-बापड्या तर त्याला सामूहिक शिव्यांची लाखोळी वाहायच्या. आमच्या पदरी त्यांना कधीच आदर नव्हता.
.
पण हळू हळू पडद्यावरचा निळू फुले आणि त्यामागचा निळू भाऊ यांत असलेली प्रचंड तफावत जाणवू लागली. कलाकाराचं सामाजिक जगणे कसे असावे याचा सर्वोत्कृष्ट दाखला म्हंजे निळू भाऊंचे जीवन. प्रचंड आणि सदैव सामाजिक जागरूकता असलेला माणूस हि त्यांची खरी ओळख. त्यांचा खलनायक जितका आठवतो तितकेच हळव्या स्वभावाचे, पाणीदार डोळ्यांचे, हसरे निळू भाऊ आज आठवताहेत.
.


.

.

.... त्या सूर्यास्ताला हि चित्ररूपी श्रद्धांजली.


सचिन, नारायणगाव, २७/८/२००९

आणाबाबाच कुत्रं .

पाळीव प्राणी किती बहाद्दर, बिलंदर आणि मोकाट सुटलेला असू शकतो याचा भन्नाट नमुना म्हंजे आणाबाबाचं कुत्रं. (आणाबाबा हे त्याच्या मालकाच नाव). दिसायला काळं आणि रगेल करामती यामुळं ते गावंविख्यात झालं होतं. मळ्यातिल सगळ्यांनाच त्याचे कलागुण कलाविष्कारासह पाहायला, अनुभवायला मिळायचे.

त्यानं त्यांचा सारा श्र्वानबंधुभाव बिघडवलेला होताच, त्यामुळे मळ्यातिल कुत्री त्याला त्यांच्यात घेतच नव्हती. आणि आता मनुष्यजमातीची टवाळी करणे हा नवीन धंदा त्यानं चालवला होता. (कुणी निंदा कुणी वंदा, याची त्याला तमा नव्हती)..

अंधारात दूर ढेकळाच्या वावरात बसून ते रात्री बेरात्री आकाशाकडे त्वांड करून बेसुरा राग आळवायला लागलं की चक्क झोपलेले श्रोतेही टक्क जागे होवून बसायचे. आणि "हाड..हाडये,..... याच्यारं आयला,.... आ..य घातली.. या कुत्र्यानं पार वाट लावली झोपेची, तुज्याऱं आता" अश्या शाब्दिक दादींन बरोबर दगडव्रुष्टी ही व्हायची. भोंगा आणि तुतारी यांच्या मधला नाद म्हणजे आनाबाबाच्या कुत्य्राचा जबडा. एक तुतारी द्या मज आणून फुंकीन ती मी स्वप्राणाने (तुतारी फक्त फुटलेली असावी) असला त्याचा नाद....

पहिल्या पहिल्यांदा गप्पा मारणाऱ्याच्या सायकलवर मुतायचं, नंतर नंतर तर गप्पा मारत उभ्या असणाऱ्याच्या पायजम्यावर तंगडी (जमेल तितकी) वर करून ओला प्रसाद द्यायला लागलं. पायाला गरम ओलाव्याचा भास होवून सावरायच्या आत गडी दूर पसार...

विक्षिप्तपणाचा कळस म्हंजे दुपारच्या वेळी हा गडी शेताकडे निघायचा.... शेतात जेवणं झाल्यावर उरलं सुरलेलं पाटीखाली बाभळीच्या सावलीला झाकून ठेवलेलं असायचं. ज्या वावरात माणसं काम करताना दिसायची त्या वावरात याचा प्रवेश व्हायचा. भल्या मोठ्या मळ्यातही मानसांच्या सुगाव्यानं त्याला पाटी नेमकी सापडायची अन मग ती पाटी ओली केल्याशिवाय हा पुढे जायचा नाही.... कधी कधी जेवायच्या अगोदरच आनाबाबाच्या कुत्र्याचं आगमन-आणि गमणं झालेलं असायचं आणि मग साऱ्या कामगारांची जेवणाची सुट्टी घरी जाऊन जेवण्यासाठी लांबायची... शेतमालक शिव्यांची लाखोळी तर कामगार वरवर मात्र शिव्याच द्यायचे.

मित्राची आंधळी आई पाटाच्या पाण्यावर भांडी धुवत बसायची, त्याचवेळी हे महाशय नेमकं धुतलेल्या भाड्यांवर मुत्रविसर्जन करून ऍटित तिथून रवाना व्हायचे. पारावर गाडलेल्या पाण्याच्या घागरीवर तर याची विशेष नजर, तिच्यातीलच पाणी पिणार आणि त्या थंड उपकाराची परतफेड म्हणून तिच्यावरतीही पाय वर करून ओला आशीर्वाद देणार..., तर कुणाच्या वाळत टाकलेल्या कपड्यावर डाग पाडणार.

त्याला चोपायचं म्हटलं तरी तेही कुना नेमबाज्यांस शक्य नव्हते. दगड किंवा दांडकं कसेही मारा तो ते अगदीच आरामात हुकवायचा वर छद्मीपणे हसत तेथेच थांबायचं जेणेकरून मारेकऱ्याचा रागाचा पारा अजून गरम व्हावा..

अगदी जसपाल राणाच काय घेऊन बसलात पण सुक्ष्मलक्षभेद करून भुंकणाऱ्या कुत्र्याच्या जबड्याचा भेद डोळ्यावर पट्टी बांधून अर्जुनानाने केला होता.. तेव्हा तिथे आणाबाबाचे हे "श्वान" असते तर त्याने अर्जुनास १०१ टक्के धर्नुविद्यापरीक्षेत नापास केले असते. नेमबाजीचा झालेला गर्व अचुकपने धुळीला मिळवून, अर्जुनाच्या डोळ्याची पट्टी सोडायच्या आत आणाबाबाच्या कुत्र्यानं त्याच्याही भरजरी धोतरावर लघुशंका करण्याचा महाभारतिय आनंद लुटला असता.

विन्या, मन्या, आन्या, संत्या, पिंट्या (प्राणी संघटनेच्या भीतीमुळे नावांत बदल केला आहे बरका) यांची भाद्रपदाच्या एका सायंकाळी सदर प्रश्नावर बैठक झाली. राजकीय मुसंड्यांपेक्षाही सरस व्यूहरचना करण्यात आली.

कुत्र्यांच्या प्रणयाचा श्रावणी भाद्रपद असल्याने मळ्यातिल सारेच कुत्रे, कुत्रीभोवतीच लोंढा घोळत असायचे. ठरलं... कुत्रीला रात्रीच्या वेळी दोरीनं शेराच्या झाडाला बांधायचे. साऱ्यांनी दगडं, काठ्या घेऊन चोहोबाजून दबा धरून बसायचं... रात्री ९.३० च्या सुमारास पिठाच्या लोभा पोटी उंदीर जसा पिंजऱ्यात घुसावा तसं आणाबाबाचं कुत्रं चक्रव्यूहात घुसलं आणि कुत्रीशी लघट करायला लागलं... कुत्रीला बांधून ठेवलं म्हणजे नक्कीच काहीतरी काळंबेरं असायला पाहिजे हे त्या गावगुंडाडाच्या ध्यानी आलंच नाही. कामदेवाने त्याला ते सुचू दिलंच नाही.

मुडात यायची वेळ आणि अचानक साऱ्यांनी अकस्मात प्रकट होवून केलेला हल्ला-बोल यानं त्याची पळता भुई थोडी झाली. साऱ्यांनी त्याला पटकन गराडा घालून मग धू धू धुतला आणि बदड बदड बदाडला...

कसं बसं ते वेढ्यातून बाहेर पडलं, तर मागून दगडांचा मारा झाला.

सारी मंडळी दम लागेपर्यंत खाली पडू पडू हसत होती, आणि आणाबाबाच कुत्रं मग दम लागून तोंडाला फेस येइस्तोवर मिळेल त्या दिशेनं, चुकूनही मागं न पाहत जे सन्नाट पळत सुटलं ते परत कुणा मनुष्य जातीच्या जवळ आलंच नाहीच.


सचिन, नारायणगाव, पुणे, ३/६/२००९

कृषीमंत्री-क्रिझ सोडताना...

काही शेतकरी नुकतेच(२ वर्षापूर्वी) मनमोहनसिंगांना भेटले.हात जोडून ते पंतप्रधानांना म्हणाले " मालक, आम्हाला नोकरी द्या, शेती नकोच,........ जगलो वाचलो तर शेती करता येईल". शेतकऱ्यांनी शेतीविषयी एक चक्कार शब्दही काढला नाही. हि उदाहरणे शेती कोमात चालल्याची नाहियेत तर काय आहे? त्याचा संबंध खचितच वीजखात्याशी आणि क्रुषिखात्याशी आहे हे तर सहज समजायला हवेच. शेतकऱ्यांच्या आत्महतेचा दोष मग ह्यांना नाही द्यायचा तर कुणाला द्यायचा? त्या शेतकऱ्यांच्या झोपडीत शिरून त्यांची चौकशी करावी असेही, ह्या मंत्र्यांना कधी वाटले नाही. पंतप्रधान विदर्भात आले तेव्हा त्यांच्या मागून हे विदर्भात आले....

सरदार वल्लभभाई पटेल मान्सून आला की प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना रात्री बेरात्री फोन करून विचारायचे, "पावूस व्यवस्थित आहे का? पेरणी झाली का? "... आणि विशेष म्हणजे ते गृहमंत्री होते, कृषीमंत्री नव्हेते... वल्लभभाईंची ती तळमळ कृषीमंत्र्यांमध्ये कधी दिसलीच नाही.

२५ वर्षापूर्वी देशातील ७०% शेतकरी असलेल्या जनतेचा देशाच्या जी.डी. पी. मध्ये वाटा होता ६०%...आणि आज देशातील ६५% जनता शेतीवर अवलंबून असताना देशाच्या जी.डी.पी. मध्ये शेतीच वाटा २५% पेक्षाही कमी आहे, हे मंत्र्यांची खात्यावर किती आणि कशी पकड आहे हेच तर दाखवतेय... काय परफॉरमंस आहे राव? ६% नि शेतकऱ्यानं कर्ज देतो म्हणाला होतात? कुठे आहे ते? विसरला वाटत? साहेब अजूनही महाराष्टातिल ५५% शेतकऱ्यांवर पर हेड सरासरी १६००० रु कर्ज आहे,.. महागडी औषधे, बी-बियांनी, खते, कीटकनाशके, मशागत खर्च मिळून सरासरी ११००० रु उत्पन्न खर्च, आणि उत्पन्न केवळ १५०००, कसं सुधारायचं आम्ही?

लवकरच तुम्ही पायउतार व्हाल, पण शेतकऱ्यांच्या मानगुटी वरील ह्या अनुत्तरीत प्रश्नांचं काय? ....

ह्या इनिंगची पुरी मैच संपेपर्यंत आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, अगदी एकटक..... मात्र स्कोअर बोर्ड काही हललाच नाहि....

आता क्रिझ सोडण्यापुर्वी, जाता जाता एखांदा चोका-छक्का तरी मारा?
.
.
...सचिन, नारायनगाव, पुणे. 11 may 2009.

एका मावशीची आठवण.

जुलै १९९५ ला मी पुण्याच्या अभिनव कला मंदिरात प्रवेश घेतला... पहिल्यांदाच खेड्या-पाड्यातून उच्चभ्रू जगात आल्यावर आपला गावंढळ साधेपणा सतत आपल्या दरिद्री मनाला टोचत असतो, हिणवत असतो। माझ्याही अवस्था या नियमाच्या बाहेर नव्हती. पण त्याबद्दल मी कधीतरी लिहीलच...
.
हा,॥ तर कॉलेजचा प्रवेश घेतला, पण हॉस्टेलाची मात्र सोय होत नव्हती। रिक्षावाल्यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे विद्यार्थी गुह, मराठा हॉस्टेल, अशी दोन चार स्वस्तातील हॉस्टेल पाहिली पण कुठेही सोय झाली नाही. थकलो होतो त्यापेक्षा निराश च जास्त झालो होतो...
शेवटी मी, आई, आणि दादा तिघांनीही खडकवासला गाठला। मामानं "आत्माराम शंकर नलावडे (गुरुजी)" यांच्या नावे एक चिट्टी लिहून दिली होती. "मुलाची वसतिगृहात सोय होईपर्यंत २-३ दिवस तुमच्याकडे ठेवावे. " दादांनी वर्गावर्गात जाऊन नलावडे गुरुजी कोण असी विचारपूस केली, आई तसी त्यांना पुसटसी ओळखायची. दादांनी त्रयस्थासारखी निमुटपने फक्त चिट्ठी पुढे केली. (ओळख नसतानाही "मुलाला ठेवा" अशी विनंती करायलाही त्यांना मुलासाठी कमीपणा वाटला नसता, तरीही चिट्टी मुळे आपलं काम सोपं होईल म्हणून ते बोलले नसावेत. )
गुरुजी पडवीत उभे राहून चिट्टी वाचत होते आणि आई, दादा मूकपणाने त्यांच्याकडे थकलेल्या आशेने पाहत होते। आई-दादांकडे पाहताना मी मात्र केविलवाणा झालो होतो. दादा काही बोलणार नव्हते, आईनेच गुरुजींना ति व इंदुबाई (गुरुजींची बायको) यांच्यातील नात्याची ओळख सांगावी आणि विनंती करावी असे सांगून ठेवलेले होतेच. पण तेही सांगण्याची गरज नव्हती, कारण काकांनी आनंदाने चालेल म्हणत मान हालविली होती. वर्ग सोडून ते आम्हाला घरी घेऊनही गेले. तिथेच चिऊ भेटली.
.
नाण्देडफाट्याच्या शाळेत जाऊन लगेच तिघेही इंदुबाईंनां भेटलो। आईला पाहून तिला अनपेक्षित आनण्द झाला. आईला त्या "बाई", तर आई तिला "इंदू मावशी" म्हणून हाक मारायची॥ कुठल्यातरी नात्यानं आइची ती मावशी लागायची... मीही मावशीच म्हणू लागलो. मी तिथे राहणार आहे म्हटल्यावरही तो आनंद तसाच टिकून होता, किंबहुना तिला माझं प्रचंड कौतुकच वाटत होतं. त्याच दिवशी तिनं साऱ्या शाळेत मला कितीतरी कौतुकानं मिरवलं होतं, अगदी हेडमास्तरापर्यंत. ..

माझ्या चेहऱ्यावरून आणि डोक्यावरून फिरणारा तिचा तळवा मज आई जैसाच वाटायचा॥ आयुष्यात आक्समातपणे भेटूनही नीस्वार्थपने मदत करणारी नितळ माणसे मिळणे म्हणजे सुदैवच। मावशी-आणि काका मला तसेच होते.
.
संध्याकाळी मावशीचा मुलगा मनू भेटला, मनु आणि चिवुताई बद्दल कधितरी वेगळं लिहिलच...
.
२-३ दिवसानंतर, पुणे विद्यार्थी गृहात सोय झाली पण काका-मावशीने निक्षून सांगितले की आम्ही याला इथेच ठेवणार, अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळू याला. दादांना वाटायचे हॉस्टेलच बरे उगाच अतिपरिचयात अवज्ञा व्हायची आणि मुलाचा नंतर राग-राग व्हायचा। दादा ऐकत नाहीत म्हटल्यावर काकांनी शेवटी "भेदाचं" शश्त्र काढतं म्हणाले " ठीक आहे, शेवटी तुमचा मुलगा आहे, काय करायचे आहे ते करा पण आम्हांस वाटते इथेच ठेवा। "............. दादांना यापुढे काय बोलावे हे कळेनासे झाले। दोन वर्षे मी तिथे राहिलो पण शब्दच काय पण रागीट नजरेनंही मावशीनं कधी माझ्या कडे पाहिलेलं मला आठवत नाही।
.
सकाळी कालेज असायचे। मला तेच सहाला उठवायचे, पण त्याअगोदर माझ्यासाठी अंघोळीच गरम पानी बाथरुम मध्ये काढलेलं असायचे. अंघोळ होईपर्यंत किचन ओट्यावर चहा, बिस्किटे ठेवून काका बाहेर अंगण झाडायला गेलेले असायचे. ज्या ज्या दिवशी घरात बिस्किटे नसायची त्या त्या दिवसी चहा च्या कपाशेजारी दहाची नोट न चुकता ठेवायचे. माझ्या नकळतच सारं काही निमुटपने व्हायचं, जाताना "जाऊ का काका? " एवढाच प्रातःसंवाद व्हायचा...
.
मावशीला माझ्या चित्रकलेचं खास अप्रूप होतं, शेजारी, सारे नातेवाईक आणि घरी येणाऱ्या प्रत्येकास ति आवर्जून माझा उल्लेख करायची। चित्रे दाखवायची. माझ्या नावानंतर "बाळ" हे विशेषण ति बऱ्याचदा वापरायची, अगदी मायेच्या मायेनं. कपड्यानं पासून ते कुठली भाजी करू इतपर्यंत ती मला सामावून घ्यायची. माझ्याकडून कधी- कुठली अपेक्षा मावशीनं ठेवली नव्हती. माझ्या वागण्या-बोलण्यालाही कधी नावं ठेवली नाहीत. कसं वागावं, काय बोलावं ह्याचेही डोस कधी दिले नाहीत. जीवनाचं कुठलंही मामुलीसं तत्त्वज्ञानही तिने मला ऐकविले नाही. पण एखाद्याला जीव कसा लावावा हे मी तिच्या प्रत्येक वागण्यातून, तिच्यानकळत पाहत होतो, अनुभवत होतो. माझ्यावर तिचे अगणित उपकार आजही आहेत, पण तिनं त्याचं प्रदर्शन कधीच केलं नाही. उपकाराच्या भावनेचा हलकासा स्पर्श देखिल तिला कधी शिवलाच नाही. तिच्या साधेपणानं ह्या साऱ्या "मी" पणाच्या दुर्गुणांवर तिच्याही नकळतपणे मात केली होती.
.
मनू आणि चिवुताई ह्या स्वतःच मुलांवर जे तिचे उपजत प्रेम होते तिच सहजता तिने माझ्याबाबतीतही ठेवली होती, सहजतेतून आम्हाला आम्ही सुरक्षित असल्याचा भास व्हायचा। ती सूर्यासारखी नव्हतीच, पण जमेल तेवढा भाग प्रकाशमान करण्यासाठी मिणमिणतं राहणारी पणती मात्र नक्की होती.
.
अशी लोभस मानसं सध्या भेटतच नाहीत, आयुष्यातील कैक मित्रांना मी मावशी बद्दल आवर्जून आत्मीयतेने सांगायचो, अजूनही सांगतो। यापुढेही नक्की सांगत राहिला...
.
.
.
मावशीच्या देहावर पुष्पहार अर्पण करून तिचे शेवटचे अंतदर्शन घेताना, तिच्या हळव्या तळव्यांच्या प्रेमळ स्पर्शाभास होवून डोळ्यांच्या कडा पुन्हा आपसूक ओलावल्या......

.......
सचिन, नारायणगाव, पुणे, ९/५/२००९

शिवरायांच्या यशाचे श्रेय

"ब्राह्मन नसते तर स्वराज्य मिळाले असते काय, आणि एकतरी हिंदु राजा झाल असता काय?" असे विचार एका मित्राने (अर्थात ब्राह्मण) मांडले। त्यास उत्तर देताना....
.
शिवरायांच्या यशाचे श्रेय तर्कशास्त्र द्र्य्ष्ट्या कुणाला द्यावयाचे झाले तर ते शिवरायांच्या स्वतःच्या कल्पकतेला, धैर्याला, संयमाला आणि त्याबरोबरिने असलेल्या उत्कट इच्छेलाच द्यावे लागेल॥ आई-वडील, गुरू, मार्गदशक, संत, देव, दैव, मराठे, मावळे, ब्राह्मण, मुसलमान सरदार, सैन्य गड, किल्ले, सह्यांद्री ह्यांचाही त्यात सहभाग होता। पण म्हणून ब्राहमण किंवा अमुक अमुक नसते तर स्वराज्य मिळाले नसते असे मानणे म्हणजे मानणाराचा फुसका अहंभाव आहे..
.
एकलव्य आणि कर्णाकडे तरी कुठे होते गुरू, राजपद आणि पैसा? पण तरीही ते शून्यांतून उभे राहिले होतेच ना? विजिगिषू मन असेल तर गड, किल्ले सोडा मानसे देखिल तयार करता येतात..
ब्राहमण नाहीत म्हणून स्वराज्याचे काम थांबले असते असे आपणास वाटतेच कसे॥? स्वराज्य म्हणजे काय सत्यनारायण होता की काय?..
.
शून्य असलेले हेरखाते आणि सागरी आरमार जर महाराज उभारू शकत होते तर "ब्राह्मणी डोकी" तैयार करणे कितीसे अवघड होते? उगाच "सामूहिक मीपणाचा" चा भाव धरणे चुकीचे आहे॥ मी म्हणेन जर ब्राहमानानी राज्य आणि राजकारणात सहभाग घेतला नसता तर त्यांच्या उपजिवेकिचे दुसरे साधन ते काय राहिले असते? त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असती..
.
। ब्राहमणच काय पण क्षुद्राति-क्षुद्र समाजाचाही सहभाग होता हे अगदी मान्य आहे॥ अगदी प्रामाणिक, निष्टापुर्ण सहभाग होता,.. पण म्हणून "फक्त" ब्राहमण होते म्हनून राजे होते हे फारच एकलांगी आणि विषारी विधान आहे..
.
.... कुठे अनंतात विलीन झाला असाल तेथून थोडा वेळ काढून या... आणि माफी मागून हे विष पसरविणे थांबवा..

शापिताचे मरण अटळ.

गेले दोन आठवडे निरस झालेलं रूटीन आजपासून परत पूर्वीसारखं आणि पुन्हा (अर्थात माझ्यामनासारखं) सेट होणार होतं ... मी जाम खूश होतो.
.
बातम्यांचा मी जाम शोकिन.. येन निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात माझा टीव्ही कर्णाच्या शापित रथासारखा चालेनासा (निकामी) झाला होता॥ हो हो शापितच झाला होता टीव्ही...
.
ऑफिस आणि रात्रीची झोप सोडून शिल्लक राहिलेला सारा वेळ लक्षभेद टीव्हीचाच करायचो। अगदी जेवताना देखिल लक्षभेद चुकायचा नाही॥ आपल्या पेक्षा दुसऱ्याच कुठल्यातरी भौतिक वस्तूकडे ध्यान लागलंय आणि आपल्याकडे "दुर्लक्ष" होतोय म्हटल्यावर बायकोने त्र्याग्याच्या अभंगाबरोबरिने टाळ कुटणे चालविलेले होतेच.. अधून मधून टीव्हीमुळे आम्हा-दोघात घंटानादही व्हायचा आणि दोन-दोन दिवस निनादत राहायचा.. तरीही मी काही तीवाही कडे पाठ फिरवत नव्हतो... परिणामतः तिने आपला मोर्चा तिच्याकडेच(टिव्हि) वळविला. तो बंद पडावा, फुटावा, त्याला मुंग्या याव्यात असले शिव्या-शाप ती टिव्हिस देऊ लागली... आणि काय आश्चर्य टिव्हिचा एसएमपीएस जळाला आणि टिव्हि बंद पडला... एसएमपीएस नाही तर पुरं कीट जळल्याच मेकॅनिक ने सांगितल्यावर शाप किती मनःपूर्वक आणि अंतःकरणाच्या तळापासून दिले असावेत याचा अंदाज आलाच... मज वेड्याला शेवटी नव्या टिव्हिची सोय करावी लागलि.
।
.
कुठल्याश्या देशात म्हणे झाड तोडायचे असेल तर त्यास तोडत नाहीत तर सारे गाववाले त्या झाडाभोवती गोळा होतात आणि त्यास शिव्यांची लाखोळि वाहतात, आणि ते शापित झाड झिरून झिरून जळून जाते...
.
सत्यता मनोमन पटली.